माघ यात्रेच्या पार्श्‍वभूमीवर पंढरपूर शहर आणि परिसरातील गावांमध्ये २४ घंट्यांसाठी संचारबंदी

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे २३ फेब्रुवारी या दिवशी होणार्‍या माघ वारीच्या पार्श्‍वभूमीवर २२ फेब्रुवारीच्या रात्री १२ पासून ते २३ फेब्रुवारीच्या रात्री १२ वाजेपर्यंत २४ घंट्यांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनामुळे यात्राकाळात भाविकांना शहर प्रवेश बंदी असणार आहे; मात्र या काळात बस सेवा चालू रहाणार आहे. ही संचारबंदी संपूर्ण शहरासह परिसरातील १० गावांमध्ये असणार आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदीचे आदेश दिले आहेत.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने माघ एकादशी आणि द्वादशी या दिवशी श्री विठ्ठल मंदिर मुखदर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २२ आणि २३ फेब्रुवारी या दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी यांचे मुखदर्शन बंद रहाणार असून २४ फेब्रुवारीपासून मुखदर्शन सुरळीत करण्यात येणार आहे. संचारबंदीच्या काळात श्री विठ्ठलाचे सर्व नित्योपचार चालू रहाणार आहेत.