विवाह समारंभ, मंगल कार्यांसाठी ५० जणांचीच मर्यादा ! – डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी

उल्लंघन झाल्यास मंगल कार्यालय आस्थापना आणि कार्यक्रमांचे यजमान दोघांवरही कारवाई

सांगली – राज्यात कोरोनाचा धोका पुन्हा वाढत असून संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना काटेकोरपणे करण्यात येत आहेत. सध्या लग्न सराईचे दिवस चालू असून विवाह समारंभ, मंगल कार्य यांसाठी लोक मोठ्या प्रमाणावर गर्दी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. शासनाने विवाह समारंभ आणि मंगल कार्य यांसाठी ५० लोकांचीच मर्यादा ठरवून दिली आहे. याचे काटेकोर पालन मंगल कार्यालये आणि कार्यक्रमांचे यजमान अशा दोघानींही करणे अनिवार्य असून उल्लंघन झाल्यास दोघांवरही कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सामाजिक अंतर पाळणे, योग्य पद्धतीने मास्कचा वापर, वारंवार साबणाने हात धुवावेत, सॅनिटायझरचा वापर करावा, गर्दी टाळणे, अनावश्यक बाहेर न जाणे या बाबींचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.