बंगालमध्ये बॉम्बच्या एका आक्रमणात तृणमूल काँग्रेस सरकारमधील राज्यमंत्री झाकीर हुसेन गंभीररित्या घायाळ झाले आहेत. या वेळी तृणमूल काँग्रेसचे २२ हून अधिक कार्यकर्तेही घायाळ झाले. त्यांपैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. बंगालमध्येच काही दिवसांपूर्वी भाजपच्या नेत्यावर बॉम्ब फेकून गोळीबार करण्यात आला होता. यात हे नेते बचावले होते; मात्र त्यांच्या वाहनाची पुष्कळ हानी झाली होती. बंगालमध्ये एका राज्यमंत्र्यावर ते रेल्वेस्थानकावर आल्यावर बॉम्बफेक होते आणि ते घायाळ होतात, यातून बंगालमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अस्तित्वातच नसल्याचे लक्षात येते. महत्त्वाचे म्हणजे स्वतःच्या राज्यमंत्र्यावर आक्रमण झाल्यावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तोंड उघडत या बॉम्ब आक्रमणामागे भाजपचा हात असल्याचे म्हटले आहे. गेली काही वर्षे बंगालमध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यांचा बळी जात आहे. त्याला उत्तरदायी कोण ? याचे उत्तर देण्याचे मात्र ममता(बानो) यांनी टाळले आहे.
अन्वेषण यंत्रणांना दहशत !
काही वर्षे मागे गेल्यास बंगालमध्ये चिटफंड आणि अन्य घोटाळे यांचे अन्वेषण केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, अंमलबजावणी संचालनालयाचे अधिकारी करत होते. तेव्हा त्यांना प्रतिदिन तेथील तृणमूल काँग्रेसचा प्रभाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये बॉम्बचे साठे सापडायचे, शस्त्रास्त्रांचे साठे सापडायचे. गुंडांच्या टोळ्याच येथे कार्यरत आहेत, असे लक्षात यायचे. ज्या ठिकाणी तपासासाठी कार्यालय स्थापन केले होते, त्या ठिकाणी काही अंतरावर बॉम्बस्फोट करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्नही केला गेला. सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालय यांच्या अधिकार्यांमध्ये या गुंडांनी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला, यावरून त्यांचा उद्दामपणा लक्षात येतो. त्यांच्यात एवढे धारिष्ट्य कुठून आले ? सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या पाठिंब्याविना हे करणे शक्य नाही, हे सांगायला कुठल्या राजकीय तज्ञाची आवश्यकता नाही. यातून बंगालमध्ये कशी परिस्थिती असेल, याची कल्पना येते. तेव्हा तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्य राखीव दलाच्या २ तुकड्या या यंत्रणांच्या अधिकार्यांच्या सुरक्षेसाठी पाठवल्या होत्या. सुरक्षादले येऊनही यंत्रणांच्या अधिकार्यांना त्यांच्या जिवाला धोका वाटत होता. बंगालमधील गुन्हेगारीची घाण जेवढी बाहेर काढू तेवढी ती अल्पच आहे, हे अधिकार्यांनी सांगितले. बंगालमधील या दु:स्थितीची तत्कालीन भाजप नेतृत्वाने नोंद घेतली होती आणि चिंता व्यक्त केली होती. जेथे कार्य करण्यास प्रशासकीय यंत्रणा आणि सुरक्षायंत्रणा यांच्यावर दबाव आणला जातो, तिथे स्थानिक पोलीस सर्वसामान्यांची काही सुरक्षा करू शकत असतील का ?
बंगालमधील विदारक स्थिती !
दोन वर्षांपूर्वी म्हणजे वर्ष २०१९ मध्ये केंद्राच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या कालावधीत बंगालमध्ये काही अघटित घडत आहे, अशा बातम्या सामाजिक प्रसारमाध्यमांतून येत होत्या. तेथे प्रतिदिन जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडत होत्या; मात्र स्थानिक प्रसारमाध्यमांमध्ये त्याच्या बातम्या प्रसिद्ध होत नव्हत्या. एका पोलिसाचा तेथील हिंसाचारामुळे स्वत:चे एक निवेदन रडत सांगतांनाही एक व्हिडिओ प्रसारित झाला होता. तेथील काही छायाचित्रे आणि व्हिडिओ प्रसारित झाले, त्यामध्ये रस्त्यावर केवळ तरुणच नव्हे, तर बायका आणि लहान मुले त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळत आहेत, असे दिसले. बंगालच्या तत्कालीन राज्यपालांनी या घटनांची गंभीर नोंद घेत बंगालमध्ये भयावह स्थिती असून राष्ट्रपती राजवट लागू करावी लागण्याची परिस्थिती असल्याचे सांगितले होते; मात्र बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना जुमानले नाही. बंगालमधील सर्व भीषण परिस्थितीला ममता(बानो) याच उत्तरदायी आहेत.
देशाच्या एखाद्या राज्यात एवढी भीषण परिस्थिती जम्मू आणि काश्मीर नंतर बंगालमध्येच आहे, असेच म्हणावे लागेल. त्या खालोखाल केरळ येथेही तशी स्थिती आहे; मात्र बंगालमध्ये याची व्याप्ती मोठी झाली आहे. या तीनही ठिकाणांचे साम्य म्हणजे जिहादी तत्त्वे ! जम्मू आणि काश्मीर येथे अन् केरळमध्ये तेथील धर्मांधांनी हिंदूंची नृशंस हत्याकांडे घडवून आणली आहेत. धर्मांधांच्या या हिंसाचाराचा फटका बंगाल येथील हिंदूंना बसला आहे. हिंदूंना त्रास देण्यात स्थानिक आणि बांगलादेशातून अवैधरित्या आलेले घुसखोर दोघेही सहभागी आहेत. केरळ आणि बंगाल हे साम्यवाद्यांचे गड ! त्यातील बंगालमध्ये जिहादी तत्त्वांशी युती करून तृणमूल काँग्रेसने साम्यवाद्यांच्या गडाला सुरुंग लावला. साम्यवाद्यांचे वर्चस्व असल्यापासूनच बंगाल अशांत आणि अस्थिर आहे. त्यात तृणमूल काँग्रेसने जिहाद्यांशी युती केल्यावर आणखी अशांत बनला आहे. ही अशांती आणि अस्थिरता दूर करण्यासाठी ममतांच्या हाती असलेली राज्याची सूत्रे राष्ट्रपतींच्या हाती सोपवणे आवश्यक आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा असोत कि गृहमंत्री अमित शहा असोत दोघांनी त्यांच्या रॅलीमध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून झालेल्या आक्रमणाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे त्यांनी आणखी वाट न पहाता बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी, ही राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे.