१८ फेब्रुवारी या दिवशी सनातनच्या संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांची प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने…
सनातनच्या ४५ व्या समष्टी संत पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी माघ शुक्ल पक्ष सप्तमीला (शनिवार, १ फेब्रुवारी २०२० या दिवशी) सकाळी १०.५० वाजता देहली येथील रुग्णालयात देहत्याग केल्याचे समजले. त्यानंतर देवाच्या कृपेने माझ्याकडून त्यांचा देहत्याग आणि अंत्यसंस्कार या विधींचे झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.
१. पू. मेनरायकाकूंनी रथसप्तमी, या शुभ तिथीला देहत्याग केल्याने मृत्यूत्तर प्रवास करण्यासाठी त्यांच्या लिंगदेहाला सूर्यदेवाकडून तेजतत्त्वाच्या स्तरावरील आध्यात्मिक ऊर्जा आणि चैतन्य मिळाल्याचे जाणवणे
पू. (सौ.) सूरजकांता मेनराय यांनी रथसप्तमीच्या शुभ तिथीला देहत्याग केला. रथसप्तमीच्या तिथीला सूर्यतत्त्व अधिक प्रमाणात कार्यरत असते. त्यांच्या सूरजकांता या नावामुळे त्यांच्या स्थूल आणि सूक्ष्म देहांकडे सूर्याचे दैवी तेज, ऊर्जा आणि चैतन्य अधिक प्रमाणात आकृष्ट झाले. त्यामुळे त्यांनी तेजाच्या बळावर देहत्याग केला आणि त्यांच्या लिंगदेहाला सूक्ष्म उच्चलोकांचा मृत्यूत्तर प्रवास करण्यासाठी सूर्यदेवाकडून तेजतत्त्वाच्या स्तरावरील आध्यात्मिक ऊर्जा अन् चैतन्य मिळाल्याचे जाणवले. त्यांच्या पार्थिव देहाभोवती तेजोमय संरक्षककवच कार्यरत असल्यामुळे पृथ्वीवर सगुण-निर्गुण स्तरावर आक्रमणे करणार्या पाताळातील वाईट शक्तींना पू. मेनरायकाकूंच्या पार्थिव देहावर नियंत्रण मिळवता आले नाही.
२. पू. मेनरायकाकूंचा देहत्याग आणि त्यानंतरचा काळ आध्यात्मिकदृष्ट्या साधनेसाठी अनुकूल असल्याने पाताळातील निर्गुण-सगुण स्तरावर कार्यरत असणार्या मोठ्या वाईट शक्तींना त्यांच्या लिंगदेहाच्या मृत्यूत्तर प्रवासात विघ्ने निर्माण करता न येणे
पू. मेनरायकाकूंच्या मृत्यूच्या वेळी काळ आध्यात्मिकदृष्ट्या साधनेसाठी अनुकूल होता. ही त्यांच्यावरील शिवाची कृपा असल्याचे द्योतक आहे; कारण शिवाचे काळावर अधिपत्य असते. पू. मेनरायकाकूंच्या देहत्यागासाठी काळ अनुकूल असल्यामुळे पाताळातील निर्गुण-सगुण स्तरावर कार्यरत असणार्या वाईट शक्तींना पू. काकूंच्या लिंगदेहाच्या मृत्यूत्तर प्रवासात विघ्ने निर्माण करता आली नाहीत.
३. पू. मेनरायकाकूंचा पार्थिव देह सूक्ष्मातून सोनेरी रंगाचा दिसणे आणि तुळशीचा सुगंध दरवळणे
पू. मेनरायकाकू पतिव्रता धर्माचे काटेकोरपणे पालन करत असल्यामुळे त्यांच्यामध्ये पातिव्रत्याचे तेज आले होते. त्यामुळे त्यांचा पार्थिव देह सूक्ष्मातून सोनेरी रंगाचा दिसत होता आणि त्यांच्या देहातून पावित्र्याचे प्रतीक असणार्या तुळशीचा सुगंध दरवळत होता.
४. हनुमानाची सगुण-निर्गुण स्तरावरील मारक शक्ती पू. मेनरायकाकूंच्या पार्थिव देहाभोवती कार्यरत असणे
पू. मेनरायकाकूंनी शनिवारी देहत्याग केला. त्या नियमितपणे हनुमानचालिसा वाचून हनुमानाची उपासना करायच्या. त्यामुळे त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार विधी होऊन त्यांचा स्थूल देह पंचतत्त्वात विलीन होईपर्यंत हनुमानाची सगुण-निर्गुण स्तरावरील मारक शक्ती त्यांच्या पार्थिव देहाभोवती कार्यरत होती. साक्षात् हनुमान पू. काकूंच्या पार्थिव देहाचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून रक्षण करत असल्याचे जाणवले.
५. पू. मेनरायकाकूंवर शिव आणि विष्णु या दोन्ही देवांची कृपा असणे
पू. मेनरायकाकू शिव आणि विष्णु या दोन्ही देवांच्या भक्त असल्यामुळे त्यांच्यावर हरिहरांची (विष्णु आणि शिव यांची) कृपा होती. त्यांनी शिवाच्या इच्छेने योग्य समयी देहत्याग केला आणि त्यांचा लिंगदेह वैकुंठात घेऊन जाण्यासाठी विष्णुदूत आले होते. त्यामुळे त्यांना मृत्यूसमयी शिवाचे दर्शन होऊन परमशांतीची अनुभूती आली आणि त्यांनी मृत्यूनंतर वैकुंठलोकात गमन केल्यामुळे त्यांना श्रीविष्णूचे साक्षात् दर्शन होऊन त्यांना परमानंदाची अनुभूती आली.
६. पू. मेनरायकाकूंच्या पार्थिव देहाला अग्नि दिल्यावर त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत होऊन चिताग्नीच्या ज्वालांमध्ये ज्वालादेवीचे रूप प्रगट होणे
पू. मेनरायकाकूंमध्ये श्रीवैष्णोदेवीचे ५ टक्के इतके तत्त्व कार्यरत होते. सूर्याकडून मिळालेल्या तेजतत्त्वाच्या स्तरावरील दैवी ऊर्जेमुळे त्यांचा पार्थिव देह तेजतत्त्वमय चैतन्याने भारित झाला होता. त्यामुळे जेव्हा त्यांच्या पार्थिव देहाला अग्नि देण्यात आला, तेव्हा त्यांच्यातील देवीतत्त्व जागृत होऊन चिताग्नीच्या ज्वालांमध्ये ज्वालादेवीचे रूप प्रगट झाले. त्यामुळे त्यांच्या चिताग्नीकडे पहातांना अनेकांना चांगले वाटले.
७. पू. मेनरायकाकूंच्या अंत्यसंस्कार
विधीच्या वेळी सर्वसामान्य व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कार्यरत असणारा क्रव्याद नावाचा अग्नि नसून तो साक्षात् अग्निनारायणातून प्रगट झालेला दिव्य चिताग्नी असल्याचे जाणवणे
त्यांच्या अंत्यसंस्कार-विधीच्या वेळी प्रज्वलित झालेल्या चिताग्नीमध्ये त्यांच्या देहातील निर्गुण-सगुण स्तरावरील चैतन्य कार्यरत झाल्यामुळे तो चिताग्नी विरळ आणि हलका असल्याचे जाणवले. हा चिताग्नी सर्वसामान्य व्यक्तीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी कार्यरत असणारा क्रव्याद नावाचा अग्नि नसून तो साक्षात् अग्निनारायणातून प्रगट झालेला दिव्य चिताग्नी असल्याचे जाणवले. त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी दैवी सुगंध येणे, मनाला उत्साह आणि आनंद जाणवणे, यज्ञ चालू असल्याप्रमाणे वाटणे, अशा विविध अनुभूती साधकांना आल्या.
८. पू. काकूंच्या पार्थिव देहातून विविध देवतांच्या तत्त्वलहरी वातावरणात पसरल्यामुळे तेथे इंद्रधनुष्य दिसणे
अंत्यसंस्काराच्या वेळी पू. मेनरायकाकूंच्या देहातून सप्तरंग बाहेर पडतांना दिसले आणि नंतर त्यांच्या चितेभोवती सूक्ष्मातून इंद्रधनुष्य निर्माण झाल्याचे जाणवले. पवित्र अग्नीचा स्पर्श
पू. काकूंच्या सात्त्विक देहाला झाल्यामुळे त्यांच्यातील देवतांच्या तत्त्वांचे चैतन्य पृथ्वी आणि तेज या स्तरांवर प्रगट होऊन वातावरणात पसरले. त्यामुळे वातावरणात विविध प्रकारचे सुगंध आले आणि त्यांच्या चितेभोवती अन् वायूमंडलात सूक्ष्मातून इंद्रधनुष्य दिसले.
८ अ. पू. मेनरायकाकूंच्या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी त्यांच्या चितेतून प्रगट झालेले संबंधित देवतातत्त्व, त्यांचा सूक्ष्म गंध (पृथ्वीतत्त्वमय चैतन्य) आणि सूक्ष्म रंग (तेजतत्त्वमय चैतन्य)
९. पू. मेनरायकाकूंच्या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी अनेक साधकांना चांगल्या अनुभूती येणे आणि सर्वांना आध्यात्मिक स्तरावर लाभ होणे
अंत्यसंस्कार विधीच्या वेळी पू. मेनरायकाकूंच्या पार्थिव देहाकडून प्रक्षेपित झालेली श्रीवैष्णोदेवीची तारक-मारक शक्ती आणि सगुण-निर्गुण स्तरावरील चैतन्य यांमुळे संपूर्ण वातावरणाची शुद्धी झाली अन् उपस्थित साधकांवरील त्रासदायक आवरण नष्ट होऊन त्यांच्यावर आध्यात्मिक उपाय झाले. त्यामुळे पू. मेनरायकाकूंच्या अंत्यसंस्कार विधीच्या वेळी अनेक साधकांना चांगल्या अनुभूती आल्या आणि सर्वांना आध्यात्मिक स्तरावर लाभ झाला.
१०. देहत्यागानंतर पू. मेनरायकाकूंचा लिंगदेह वैकुंठात गेल्यामुळे भगवान श्रीकृष्णाला आनंद होऊन त्याने बासरी वाजवल्याचे जाणवणे
त्यांचा अंत्यसंस्कार विधी चालू असतांना वातावरणात देवीतत्त्व जाणवत होते. देहत्यागानंतर त्यांचा लिंगदेह वैकुंठात गेल्यामुळे भगवान श्रीकृष्णाला आनंद होऊन तो बासरी वाजवत असल्याचे जाणवले. तेव्हा श्रीकृष्णाच्या बासरीचे सुमधुर सूर माझ्या कानी पडले आणि माझे ध्यान लागले.
११. पू. मेनरायकाकूंची आत्मज्योत शिव आणि विष्णु यांच्यामध्ये विलीन होणे, नंतर हरिहर एकरूप झाल्याने त्यांच्या हृदयात पू. मेनरायकाकूंची पिवळसर-पांढर्या रंगाची आत्मज्योत तेवत असल्याचे जाणवणे
पू. मेनरायकाकूंच्या आत्मज्योतीचे दोन भाग होऊन पिवळसर रंगाची ज्योत श्रीविष्णूमध्ये आणि पांढर्या रंगाची ज्योत शिवामध्ये विलीन झाल्याचे जाणवले. त्यानंतर शिव आणि विष्णु एकरूप झाल्याचे दृश्य मला दिसले अन् त्यांच्या हृदयात पू. मेनरायकाकूंची पिवळसर-पांढर्या रंगाची आत्मज्योत तेवत असल्याचे जाणवले. या अनुभूतीमुळे हरिहरांची एकरूपता पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाली.
१२. पू. मेनरायकाकूंचे पृथ्वीवरचे तप पूर्ण होऊन आता त्यांचे वैकुंठात तप चालू झाले आहे, असे देवाने सांगणे
पू. मेनरायकाकू समष्टी संत असल्यामुळे त्यांचा लिंगदेह वैकुंठात गेला आणि त्याला सायुज्य मुक्ती मिळाली, म्हणजे त्यांचे सूक्ष्म रूप श्रीविष्णूच्या सगुण रूपाशी एकरूप झाले आहे. त्यांच्याकडून आणखी समष्टी कार्य होणार असल्यामुळे त्यांना काही काळानंतर मोक्ष मिळणार आहे, म्हणजे काही काळानंतर त्यांचे सूक्ष्म रूप श्रीविष्णूच्या निर्गुण रूपाशी, म्हणजे ईश्वराशी एकरूप होणार आहे. त्या वैकुंठात राहून श्रीविष्णूची भक्ती करण्यासह पृथ्वीवर स्थूल आणि सूक्ष्म अशा दोन्ही स्तरांवर हिंदु राष्ट्र स्थापन होण्यासाठी प्रार्थना अन् नामजप करत आहेत. याविषयी देवाने सांगितले की, पू. मेनरायकाकूंचे पृथ्वीवरचे तप पूर्ण होऊन आता त्यांचे वैकुंठात तप चालू झाले आहे.
कृतज्ञता
हे भगवंता, तुझ्या कृपेने पू. मेनरायकाकूंच्या देहत्यागाचे आणि त्यांच्या अंत्यसंस्कार विधीचे सूक्ष्म परीक्षण करण्याची सेवा झाली अन् तू आम्हाला सूक्ष्म स्तरावरील सूत्रांचे ज्ञान दिलेस, यासाठी मी तुझ्या पावन चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते. पू. मेनरायकाकूंसारखी निस्सीम भक्ती आम्हा साधकांमध्येही निर्माण होऊ दे, अशी तुझ्या सुकोमल चरणी आर्त प्रार्थना आहे.
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.२.२०२०)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |