मुख्य सूत्रधाराला अटक न केल्यास आमरण उपोषण करण्याची कुटुंबियांनी दिली चेतावणी

 रेखा जरे हत्या प्रकरण

नगर – येथील यशस्विनी ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अद्याप अटक का होत नाही, अन्य गुन्ह्यांतील आरोपी सापडतात, नाहीच सापडले तर पोलीस सर्व यंत्रणा कामाला लावून त्यांना पकडतातच. असे असतांना बोठेच्या संदर्भात असे का होत नाही ? पोलीस हतबल झाले आहेत का ? या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे द्यावा लागेल का, असे प्रश्‍न उपस्थित करून जरे यांचा मुलगा रुणाल यांनी नातेवाकांसह पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसण्याची चेतावणी दिली आहे. तसे निवेदन जरे यांनी १५ फेब्रुवारी या दिवशी जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना दिले आहे. या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासह संबंधित लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

ते पुढे म्हणाले की, गुन्हा घडून ७५ दिवसांचा कालावधी होऊन गेला आहे. मुख्य सूत्रधार न्यायालयांत त्याच्या हितचिंतकाच्या वतीने वकीलपत्रावर स्वाक्षर्‍या पाठवतो. त्यानुसार प्रकरण प्रविष्टही होते, तरीही तो पोलिसांना मिळत नाही, मुख्य सूत्रधाराची सर्व यंत्रणा काम करते; परंतु पोलिसांची यंत्रणा यात अल्प का पडली ? मुख्य सूत्रधारास अटक होईल का ? होईल तर कधी होईल ? असे प्रश्‍न मला आणि माझ्या कुटुंबियांना पडले आहेत. त्यामुळे मला आणि माझ्या कुटुंबियांसमवेत अन् हितचिंतक यांसह आपल्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याची अनुमती मिळावी, असे या निवेदनात म्हटले आहे.