शिक्षणमंत्र्यांचे दुर्लक्ष !
यवतमाळ, १५ फेब्रुवारी (वार्ता.) – वर्ष २०१८ मध्ये शहरातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयाचे रूपांतर शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले; मात्र ३० सप्टेंबर २०२० या दिवशी एकाच वेळी या महाविद्यालयातील ३८ शिक्षकांचे स्थानांतर करण्यात आले. त्यांच्या जागेवर अजूनही शिक्षक रुजू झाले नाहीत. त्यामुळे अन्य १३ शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत आहे, तसेच ५ शाखांमधील ३०० विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे. या महाविद्यालयाला ६८ शिक्षक संमत झाले होते; पण अद्याप शिक्षक महाविद्यालयाला देण्यात आलेले नाहीत. शिक्षणमंत्र्यांची स्वाक्षरी होताच शिक्षक उपलब्ध होतील; पण त्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे, असे सांगितले जात आहे. शासनाने महाविद्यालयाला लवकरात लवकर शिक्षक उपलब्ध करून शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना होत असलेला त्रास थांबवावा, अशी मागणी विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे. साप्ताहिक ‘स्वराज्य गर्जना’च्या वतीने राज्य आणि केंद्र शासन यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे.