पुण्यात दिवसेंदिवस कचर्याचा प्रश्न उग्र रूप धारण करत आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या संदर्भात उपाययोजनांची कार्यवाही करावी !
पुणे – कोरोना साथीच्या काळात पुणे शहरात आतापर्यंत २ सहस्र ६४९ टन जैव वैद्यकीय कचर्याची निर्मिती झाली. त्यापैकी १ सहस्र ७५ टन कचरा केवळ कोरोनामुळे निर्माण झाला आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एम्पीसीबीने) दिली. (कचर्याची आकडेवारी मार्च २०२० ते जानेवारी २०२१ या काळातील आहे.) यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात आलेले इंजेक्शन, औषध, मास्क, पीपीई किट यांसारख्या वैद्यकीय साधनांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील जैव वैद्यकीय कचर्याचे व्यवस्थापन करण्यासाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, तळेगाव आणि बारामती या चार ठिकाणी प्रक्रिया केंद्रे आहेत; मात्र कोरोना साथीच्या काळात सामान्य वैद्यकीय कचर्यासमवेत कोविड १९चा जैव वैद्यकीय कचरा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यामुळे शहरातील प्रकल्प सुविधांचा अभाव जाणवू लागला. त्यामुळे काही कचरा मुंबईतील तळोजा कचरा प्रकल्पाला पाठवण्यात आला.
हा कचरा गोळा करण्यासाठी रुग्णालयांना बारकोड सिस्टीम, कचर्यातील प्रकारानुसार कलर कोड देऊन कचर्याचे वर्गीकरण करण्यात आले होते. वर्गीकरणानुसार कचरा संबंधित केंद्रावर पाठवण्यात आला, अशी माहिती या वेळी देण्यात आली.