आनंदी, प्रेमळ आणि सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असलेल्या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. भाविनी कपाडिया !

पौष कृष्ण पक्ष चतुर्दशी (१०.२.२०२१) या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमात कलेशी निगडित सेवा करणार्‍या ६६ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. भाविनी कपाडिया यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.

कु. भाविनी कपाडिया

कु. भाविनी कपाडिया यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने शुभेच्छा !

१. सूक्ष्मातील कळण्याची क्षमता असल्याने त्रास असलेल्या साधिकांना प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार अचूक नामजपादी उपाय शोधून देणे

मला त्रास होत असतांना मी भाविनीला उपाय विचारते. तेव्हा ती उपाय शोधण्यासाठी मला स्वतःच्या समोर किंवा बाजूला बसवते. नंतर काय त्रास होत आहे ?, असे विचारून प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार अचूक नामजप आणि मुद्रा शोधून सांगते. मी तिला भ्रमणभाषवर त्रास सांगितला, तरी ती उपाय शोधून देते.

अ. माझ्या शरिरावर नेमके कुठे आणि कोणत्या चक्रावर आवरण आले आहे ?, हे भाविनी अचूक सांगते; कारण त्याप्रमाणे उपाय केल्यावर मला चांगले वाटते, उदा. तुझ्या मानेच्या डाव्या बाजूने आणि तोंडवळ्यावर थोडे आवरण आले आहे, आवरण शरिराच्या अगदी जवळ आहे किंवा थोडे दूर आहे, आता आवरण किती टक्के न्यून झाले आहे ? आवरण कशा पद्धतीने काढायला हवे ?, असे तिने सांगितल्यावर माझ्या मानेच्या त्रासाचे प्रमाण न्यून होऊन मला बरे वाटते.

आ. जेव्हा मी उपाय चालू केलेले नसतात किंवा माझे थोडेच उपाय झालेले असतात, तेव्हा भाविनी मला म्हणते, तुझे उपाय अजून झालेले नाहीत किंवा थोडेच झालेले आहेत.

इ. काही वेळा भाविनी उपाय शोधतांना तुझा हात दुखत आहे का ? तुझी पाठ किंवा मान दुखत आहे का ?, असे विचारते. तेव्हा आवरण कुठे आले आहे ? कुठे दुखत आहे ?, हे माझ्या लक्षात येत नाही; परंतु भाविनीने शोधून दिलेला नामजप उपाय केल्यावर मला पुष्कळ बरे वाटते.

ई. मला प्राणशक्तीवहन उपाय पद्धतीनुसार जप शोधून प्रतिदिन ४ घंटे उपाय करायला सांगितले होते. तेव्हा मी प्रतिदिन नामजपाला बसण्यापूर्वी भाविनीला नामजप विचारत होते. त्या वेळी भाविनीने सांगितलेल्या उपायांनी मला बरे वाटले नाही, असे कधीच झाले नाही.

– कु. संध्या माळी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

उ. मला ॐ ॐ श्री आकाशदेवाय नमः ॐ ॐ । हा नामजप केल्यावर किंवा ऐकल्यावर अस्वस्थ होते, तर काय करायचे ?, असे मी भाविनीला विचारल्यावर तिने पू. गाडगीळकाकांना त्याविषयी आठवणीने विचारून मला लगेच सांगितले. तेव्हा पू. गाडगीळकाकांनी हा जप थोडा वेळ करायचा आणि थोडा वेळ काहीच करायचे नाही, असे सांगितले होते. (प्रत्यक्षात भाविनीनेही असेच सांगितले होते. – कु. संध्या)

ऊ. मला २ – ३ दिवस डोकेदुखीचा त्रास होत होता; म्हणून मी एका साधकांना नामजप विचारला आणि त्यांनी दिलेला नामजप करत होते, तरी मला डोकेदुखीचा त्रास होत होता. त्या वेळी भाविनीने माझी संध्याकडे विचारपूस केली आणि सांगितले, त्रासाचा प्रकार तोच आहे आणि त्यावर केलेला नामजप योग्य आहेत, तरी नवीन शोधलेला नामजप करून बघ. मी तिने सांगितलेला नामजप केला आणि काही वेळाने मला बरे वाटले.

ए. भाविनीने डोकेदुखीचा त्रास मानसिक नसून आध्यात्मिक आहे आणि त्यावर नामजपच करायला हवा, असे सांगिल्यावर मी नामजपावर लक्ष केंद्रित केले. तेव्हा माझा तीव्र डोकेदुखीचा त्रास काही वेळाने न्यून झाला.

– कु. कुशावर्ता माळी, चाळीसगाव, जळगाव.

ऐ. २ – ३ दिवसांपासून माझे पाय गुडघ्यापासून तळपायापर्यंत पुष्कळ दुखत होते. मी सर्व उपाय केले आणि औषध घेतले, तरी पायदुखी न्यून होत नव्हती. मी भाविनीला नामजपादी उपाय विचारले. तिने जप सांगितला आणि मीठ-पाण्याचे उपाय करण्यास, झोपतांना दोन्ही तळपायांजवळ लिंबू ठेवण्यास आणि विभूतीच्या पाण्यात कापड ओले करून दोन्ही पायांना गुडघ्यापासून गुंडाळण्यास सांगितले होते. तसे केल्याने काही वेळाने मला थोडे बरे वाटले आणि शांत झोप लागली. त्या वेळी माझ्याकडून परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. – सौ. विमल माळी, चाळीसगाव, जळगाव.

२. स्वावलंबी बनवणे

भाविनी सेवा करत असेल आणि तेव्हा मला आध्यात्मिक त्रास होत असेल, तर ती मला जप शोधायला सांगते. तो योग्य आहे कि नाही ?, हे ती लगेच सांगते. त्यात काही पालट करायचा असेल, तर तोही ती सांगते. मी शोधलेला जप केल्यावर मला दिवसभर त्रास होतो आणि आनंदही मिळतो. त्यामुळे मला शिकायला मिळते, तसेच आवरण शरिरापासून किती अंतरावर आहे ? त्यासाठी दोन्ही हातांचे तळवे हळूहळू कानांच्या दोन्ही बाजूंनी तोंडवळ्याकडे नेल्यावर काय जाणवते ? आवरण मानेजवळ आहे कि तोंडवळ्याकडे आहे ?, हे शिकवते आणि आवरण काढायला सांगते.

३. प्रेमभाव

 अ. भाविनी मला नामजपादी उपाय सांगते आणि भेटल्यावर आता बरे वाटते ना ?, अशी मनापासून विचारपूस करते. तेव्हा माझ्या मनाला आनंद मिळतो आणि तिच्याशी जवळीक वाढते. त्यामुळे त्रास होत असतांना तिला कधीही उपाय विचारायला संकोच वाटत नाही.

आ. एकदा भाविनी रहाते, तेथील दुकानातून मला खाऊ मागवायचा होता. तेव्हा भाविनी व्यस्त होती, तरी तिने मला खाऊ आणून दिला.

– कु. संध्या माळी

४. इतरांचा विचार करणे

अ. काही वेळा भाविनी आमची आठवण काढते आणि स्वतःहून नामजप शोधून सांगते. तेव्हा नामजप केल्यावर आम्हाला त्रास होत आहे, हे लक्षात येते.

आ. भाविनी सेवेत व्यस्त असली आणि तिला उपाय विचारले, तरी ती उत्साहाने उपाय शोधून देते. त्यामुळे आमचा त्रास न्यून होतो आणि सेवेला वेळ देता येतो. तिच्यामुळे साधनेत साहाय्य होतेे.

– कु. संध्या माळी आणि कु. कुशावर्ता माळी

५. आनंदी

भाविनी दिवसभर आनंदी आणि हसतमुख असते. तिच्याकडे बघितल्यावर मला आनंद मिळतो आणि माझा उत्साह वाढतो. – कु. संध्या माळी

६. कु. भाविनी यांना भेटल्यावर त्या पूर्वीपेक्षा आनंदी दिसत असल्याचे आणि त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचे जाणवणे अन् प्रत्यक्षातही त्यांची आध्यात्मिक पातळी वाढली असल्याचे कळणे

मी जून २०१९ मध्ये काही दिवसांसाठी रामनाथी आश्रमात गेले होते. तेव्हा माझी भाविनीशी भेट झाली होती. त्या वेळी मी संध्याला म्हणाले, भाविनी पूर्वीपेक्षा पुष्कळ आनंदी दिसत आहे आणि तिच्या तोंडवळ्यावर वेगळीच चकाकी दिसत आहे. तिची आध्यात्मिक पातळी वाढली आहे, असे जाणवते. प्रत्यक्षातही भाविनीची आध्यात्मिक पातळी एक टक्क्याने वाढली होती. ती आम्हाला गुरुपौर्णिमेच्या साधकांच्या प्रगतीच्या आराखड्यावरून कळली होती. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि माझ्याकडून देवाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली.

– सौ. विमल माळी, चाळीसगाव, जळगाव.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे भाविनीसारख्या साधिकेचा मला सहवास लाभला आणि तिच्याकडून शिकण्याची संधी मिळाली, त्याविषयी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता ! गुरुदेवा, मला साधकांतील गुण आत्मसात करायला शिकवा आणि तशी कृती होण्यासाठी माझ्याकडून प्रयत्न करवून घ्या, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. – कु. संध्या माळी (२८.७.२०१९)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक