सातारा, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – मनसेने सातारा येथील मध्यवर्ती बस स्थानकामध्ये येऊन औरंगाबाद लिहिलेले फलक पालटून त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर लिहिलेले फलक लावले. त्यानंतरच एस्.टी. बसगाड्या आगाराबाहेर पाठवल्या.
मनसेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, अधिवक्ता विकास पवार, शहराध्यक्ष राहुल पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये हे आंदोलन करण्यात आले.
या वेळी प्रसिद्धीमाध्यमांकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना मनसेचे सातारा जिल्हा सचिव राजेंद्र केंजळे म्हणाले की, पक्षप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानंतर पक्ष नेते बाळा नांदगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली मनसेने राज्यभरात नामांतरासाठी जनआंदोलन चालू केले आहे. मनसे याविषयी आक्रमक झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर करू शकत नाहीत. आम्हीही नामांतर केल्याविना मागे सरकणार नाही.