सातारा येथे शेतकर्‍यांचे आंदोलन

सातारा, ९ फेब्रुवारी (वार्ता.) – कृषी कायद्याविरोधात देहलीच्या सीमेवर चालू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील पुलाखाली विविध शेतकरी संघटनांनी रस्ता बंद करत चक्का जाम आंदोलन केले. तेथे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता. आंदोलनकर्त्यांनी केवळ १० मिनिटे घोषणा दिल्या.  त्यानंतर पोलिसांनी कह्यात घेत गाडीत बसवले. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, काँग्रेसच्या महिला जिल्हा उपाध्यक्षा सुषमा राजेघोरपडे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

कराड येथे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी पोलिसांच्या कह्यात

देहली येथील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कराड येथील कोल्हापूर नाका येथे शेतकरी संघटनांनी आंदोलन केले. या आंदोलनामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सौ. सत्त्वशीला चव्हाण सहभागी झाल्या होत्या. घोषणा देणार्‍या आंदोलकांना पोलिसांनी कह्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात आणले. यामध्ये सौ. सत्त्वशीला चव्हाण याही होत्या.