पं. भीमसेन जोशी हे मराठी आणि कानडी या २ संस्कृतींना जोडणारा दुवा होते ! – माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार

पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम

डावीकडून विनय सहस्रबुद्धे, मुरलीधर मोहोळ, शरद पवार, प्रकाश जावडेकर आणि श्रीनिवास जोशी

पुणे – मराठी-कानडी वाद मिटवणे आजपर्यंत राजकारण्यांना जमलेले नाही; पण संगीताच्या माध्यमातून या दोन्ही समाजांमध्ये संवाद प्रस्थापित करण्याचे काम पं. भीमसेन जोशी यांनी केले आहे. त्यांनी संपूर्ण आयुष्य पुण्यात राहून संगीताची साधना केली. मराठी आणि कानडी या २ संस्कृतींना जोडणारा ते दुवा होते, असे गौरवोद्गार काढत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी पं. भीमसेन जोशी यांच्या आठवणींना उजाळा दिला.

आर्य संगीत प्रसारक मंडळाच्या वतीने पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, महापौर मुरलीधर मोहोळ, श्रीनिवास जोशी आदी या वेळी उपस्थित होते.