पत्नीच्या आध्यात्मिक त्रासासंदर्भात साधकाच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि गुरुदेवांच्या कृपेने झालेला पालट !

पत्नीच्या आध्यात्मिक त्रासासंदर्भात श्री. रवींद्र बनसोड यांच्या मनाची झालेली विचारप्रक्रिया आणि गुरुदेवांच्या कृपेने त्या विचारप्रक्रियेत झालेला पालट !

‘वाईट शक्तींचा तीव्र त्रास असलेल्यासमवेत ‘कसे वागले पाहिजे’, हे श्री. रवींद्र बनसोड यांच्या पुढील लेखावरून लक्षात येईल. या लेखाविषयी श्री. रवींद्र बनसोड यांचे कौतुक करावे, तेवढे थोडे !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले    
परात्पर गुरु डॉ. आठवले

१. भावी पत्नीला आध्यात्मिक त्रास असल्याचे लक्षात आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादाने पूर्वीच्या विचारांमध्ये पालट होऊन ‘अशी पत्नी म्हणजे श्रीगुरूंनी दिलेले दायित्व आहे’, असे वाटून तिला मनापासून स्वीकारता येणे

श्री. रवींद्र बनसोड

‘मी पूर्ण वेळ सेवा करत असतांना माझ्या मनात विवाह करण्याविषयी विचार यायचे; परंतु ‘भावी पत्नी आध्यात्मिक त्रास असलेली नसावी’, असा दृृढ विचार माझ्या मनात होता. वर्ष १९९९ ते वर्ष २०१२ या कालावधीत मी तीव्र त्रास असलेल्या अनेक साधकांना जवळून बघितले होते. त्यामुळे माझ्या मनाची अशी विचारप्रक्रिया झाली होती.

माझी पत्नी सौ. राधा (पूर्वाश्रमीची कु. सुषमा शिरवलकर) हिच्या समवेत लग्न ठरल्यावर ‘तिला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे’, असे माझ्या लक्षात आले. त्यानंतर परात्पर गुरु डॉ. आठवले यांंच्या कृपाशीर्वादाने माझ्या विचारांमध्येे पालट झाला. ‘परात्पर गुरु डॉक्टर तीव्र आध्यात्मिक त्रास असलेल्या शेकडो साधकांना सांभाळत आहेत. तेव्हा मी परात्पर गुरुदेवांच्या एका साधिकेचे उत्तरदायित्व घ्यायला हवे’, असा विचार माझ्या मनात आला. त्यानंतर ‘राधा माझी केवळ पत्नी नसून, श्रीगुरूंनी मला दिलेले दायित्व आहे’, अशी माझी विचारप्रक्रिया होऊन मी तसा भाव ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला सौ. राधाला मनापासून स्वीकारता आले.

२. श्रीकृष्णाला केलेले आत्मनिवेदन परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यापर्यंत पोचल्याची प्रचीती आल्यामुळे ‘परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीकृष्ण एकच आहेत’, अशी अनुभूती येणे

विवाहापूर्वी (सौ. राधासमवेत लग्न ठरल्यावर) मी राधाला होत असलेल्या त्रासाचे स्वरूप बघून श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करतांना म्हटले, ‘हे काय श्रीकृष्णा ! तू तुझे दायित्व माझ्यावर सोपवलेस.’ त्यानंतर विवाह झाल्यावर २ मासांनी (महिन्यांनी) आम्ही रामनाथी आश्रमात गेलो. तिथे आम्हाला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा सत्संग लाभला. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सौ. राधाला विचारले, ‘‘तुला आध्यात्मिक त्रास होतो, तेव्हा तुझे यजमान तुला साहाय्य करतात का ?’’ यावर सौ. राधाने ‘‘हो’’ म्हटले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘छान, म्हणजे माझे दायित्व संपले.’’

त्या वेळी ‘मुंबईत असतांना मी श्रीकृष्णाला केलेले पत्नीच्या दायित्वाच्या संदर्भातील आत्मनिवेदन परात्पर गुरुदेवांपर्यंत पोचले’, याची मला प्रचीती आली आणि त्यावरून ‘श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले वेगळे नसून एकच आहेत’, याची मला अनुभूती आली.

– श्री. रवींद्र बनसोड, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२०)

सौ. राधा यांना झालेला त्रास सत्सेवेमुळे न्यून होण्याच्या संदर्भात आलेल्या अनुभूती

१. एक दिवस राधा यांना अचानक पुष्कळ त्रास होणे, त्रासामुळे आजूबाजूला आणि तिच्या पलंगाखाली पुष्कळ पसारा असणे आणि घराची स्वच्छता अन् शुद्धी केल्यावर वातावरणात सकारात्मक पालट जाणवणे

‘१५.१२.२०१४ या दिवशी मी सौ. राधाला (पूर्वाश्रमीच्या कु. सुषमाला) भेटायला तिच्या घरी गेलो होतो. तेव्हा सौ. राधाचा आध्यात्मिक त्रास वाढला होता. सकाळचे ११ वाजले असूनही ती पलंगावरून उठू शकत नव्हती. घरात अस्वच्छता आणि सगळा पसारा पडलेला होता. तिने सकाळपासून काहीच केले नव्हते. मी घरातील साहित्य आवरायला घेतले. ती उठल्यावर मी तिचा पलंग आवरायला घेतला. तेव्हा लक्षात आले की, गादीच्या खाली कागदपत्रे, वर्तमानपत्रे, प्लास्टिकच्या पिशव्या, तसेच तिच्या मृत आईचे छायाचित्र होते. मी ते सर्व साहित्य काढून वेगळे गोळा केले. घराची स्वच्छता आणि शुद्धी केली. त्यानंतर घरातील वातावरणात सकारात्मक पालट जाणवला.

२.  सौ. राधा यांनी उपाय केल्यावर अर्ध्या घंट्याने तिच्यातही पालट जाणवणे ; परंतु ती तिची ‘सनातन प्रभात’च्या दैनिकांच्या वितरणाची सेवा करण्यास सिद्ध नसल्याने तिला हातात दैनिके देऊन केवळ बाहेर जाऊन येण्यास उद्युक्त करणे

नंतर मी तिला बसून नामजपादी उपाय करायला सांगितले. अर्ध्या घंट्याने राधामध्ये थोडा पालट जाणवला. राधाकडे जवळपासच्या परिसरातील दैनिकांच्या वितरणाची सेवा होती. ती सेवा झाली नसल्यामुळे मी तिला दैनिकांचे वितरण करून यायला सांगितले. ती सेवेला जाण्यास सिद्ध होत नव्हती. तेव्हा मी ते दैनिकांचे अंक तिच्या हाती दिले आणि सांगितले, ‘‘तू दैनिक वितरण करू नकोस. तू केवळ बाहेर चौकापर्यंत जाऊन ये.’’ तेव्हा तिने ते मान्य केले आणि दैनिक घेऊन बाहेर पडली. २० मिनिटानंतर राधा परत आली. तेव्हा तिच्यामध्ये पुष्कळ सकारात्मक पालट झाल्याचे दिसले. आधी सेवा करण्यास नकार देणारी राधा दैनिक वितरण करूनच परत आली होती.

३. शिकायला मिळालेली सूत्रे

३ अ. आध्यात्मिक त्रास असलेल्यांचे दायित्व केवळ देवाच्या कृपेने आणि स्वतःत आध्यात्मिक बळ असल्यासच घेता येत असल्याचे लक्षात येणे : ‘सौ. राधा केवळ पत्नी नव्हे, तर माझे उत्तरदायित्व आहे’, हे जरी खरे असले, तरी त्रास असलेल्यांचे दायित्व देवाच्या कृपेविना पेलवता येत नाही. अशा साधकांचे दायित्व घेण्यासाठीही आध्यात्मिक बळ (साधनेचे बळ) असावे लागते. ते माझ्यामध्ये नाही.

३ आ. माझ्यामध्ये तेवढे सामर्थ्य नसल्याने माझ्याही संघर्षात वाढ होऊन ‘सौ. राधासमवेत माझाही सांभाळ परात्पर गुरु डॉक्टरच करत आहेत’, याची जाणीवही देवच मला वेळोेवेळी करवून देत आहे.

३ इ. त्रास असलेला साधक एकटा राहिल्यास उपाय न झाल्याने त्याच्या त्रासात वाढ होणे : त्रास असलेल्या साधकाची संघर्ष करण्याची क्षमता अल्प असेल, तर तीव्र त्रास होत असतांना तो घरात एकटा राहिल्यास सकारात्मक उपाय होत नाहीत; उलट त्याच्या त्रासात वाढ होते.

३ ई. सत्सेवेमुळे होणारे लाभ

१. या प्रसंगात ‘सेवेत किती सामर्थ्य आहे’, हे मला शिकायला मिळाले.

२. सत्सेवा करण्यास आरंभ केल्यावर साधकावरील आवरण आणि त्रासाचा भाग अल्पावधीत न्यून होऊन साधकाला आनंदाची अनुभूती घेता येते.’

– श्री. रवींद्र बनसोड, फोंडा (२.७.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक