लिंगायत बांधवांनी जनगणनेच्या वेळी धर्माच्या रकान्यात ‘हिंदु धर्म’ असेच नमूद करावे ! – डॉ. विजय जंगम, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचा आज ९ वा वर्धापनदिन !

डॉ. विजय जंगम, अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघ

कोल्हापूर – हिंदु हा धर्म आहे आणि वीरशैव-लिंगायत ही आचरणपद्धती आहे. याकडे समाजबांधवांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे. त्यामुळे येत्या जनगणनेवेळी लिंगायत बांधवांनी धर्माच्या रकान्यात ‘हिंदु धर्म’ असेच नमूद करावे, असे आवाहन अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाचे प्रवक्ते डॉ. विजय जंगम स्वामी यांनी केले आहे. ६ फेब्रुवारी या दिवशी सकाळी १० वाजता अक्त महादेवी मंडप, बिंदू चौक येथे महासंघाचा ९ वा वर्धापनदिन आहे, त्याला मोठ्या संख्येने समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहनही डॉ. विजय जंगम यांनी केले आहे.

डॉ. विजय जंगम म्हणाले, ‘‘वीरशैव समाज हा हिंदु धर्मातीलच एक भाग आहे. त्यामुळे त्याला हिंदु धर्मापासून वेगळे करता येणार नाही. समाजातील काही राजकीय लोक वेगळ्या लिंगायत धर्माची मागणी करत आहेत, तसेच येत्या जनगणनेत स्वत:चा धर्म ‘लिंगायत’ असा लिहिण्यासाठी सांगून समाजाची दिशाभूल करत आहेत. तरी वीरशैव समाजाच्या कोणत्याही घटकाने या अफवेला बळी न पडता स्वत:च्या हिंदु धर्माला सोडू नये.’’