म्यानमारमध्ये सैन्याच्या विरोधात नागरिकांचे आंदोलन

आरोग्य कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

आरोग्य कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन !

यंगून (म्यानमार) – म्यानमारमध्ये सैन्याने केलेल्या सत्तापालटाला विरोध करण्यासाठी येथील नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. त्यांनी सैन्याच्या विरोधात घोषणाबाजी केली, तसेच गाड्यांचे हॉर्न वाजवले. आरोग्य कर्मचार्‍यांनीही काम बंद केले आहे. याच पार्श्‍वभूमीवर सैन्याची पहिली बैठकही पार पडली. या वेळी स्यू की यांच्या सरकारवर विविध आरोप करण्यात आले.

१. सरकारी रुग्णालये आणि संस्था यांमधील आरोग्य कर्मचार्‍यांनी एक निवेदन जारी करत सैन्यशाहीला विरोध दर्शवला. कर्मचार्‍यांनी लाल रिबीन बांधून सैन्यशाहीचे आदेश मानणार नसल्याचे सांगितले. काही ठिकाणी कर्मचारी संपावर गेले आहेत. सध्या काही ठिकाणी केवळ धर्मदाय संस्थांची रुग्णालये आणि आरोग्य केंद्रे चालू आहेत.

२. म्यानमारचे सैन्यदलप्रमुख जनरल मिन आँग ह्लेइंग यांनी ‘देशासाठी हा मार्ग स्वीकारण्याखेरीज कोणताही पर्याय नव्हता आणि त्यामुळे आम्ही त्याची निवड केली. म्यानमारमधील सद्यःस्थितीवर हाच निर्णय योग्य असून त्यामुळेच देशाचे भवितव्य सुरक्षित हाती रहाणार आहे’, असे म्हटले आहे.