मागणी टाळल्याने जाहीर निषेध
नाशिक – येथील आगामी साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु ती टाळण्यात आल्याने स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाच्या वतीने भगूर येथे त्याचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. सावरकरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी नाशिक असल्याने अन् ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिक येथे होत असल्याने, तसेच स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी मराठी साहित्याच्या संदर्भात केलेल्या कार्यामुळे नाशिक येथील आगामी साहित्य संमेलनात ‘संमेलन नगरी स्वातंत्र्यवीर सावरकर नगरी’ असे नाव देण्याची मागणी भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर समूहाने साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांकडे केलेली होती; मात्र नाव देण्याविषयीची भूमिका निवेदनात विषद करण्यात आलेली असतांनाही संयोजकांनी जाणीवपूर्वक स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव देणे टाळले. त्यामुळे भगूरपुत्र स्वातंत्र्यवीर सावरकर समुहाने येथे जाहीर निषेध नोंदवला.