पौष कृष्ण पक्ष षष्ठी (३.२.२०२१) या दिवशी सौ. समृद्धी राऊत यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या यजमानांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सौ. समृद्धी राऊत यांना वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. प्रेमभाव
‘जेव्हा माझा सौ. समृद्धीशी विवाह झाला, तेव्हा माझ्या मनामध्ये अनेक प्रश्न येत होते. ती लहानपणापासून आश्रमात राहिली आहे. अशा वेळी बर्याचदा कुटुंबामध्ये घडणार्या गोष्टींची सवय नसते. त्यामुळे ‘कसे होईल ?’, याची मला चिंता होती; पण आता माझ्या आई-वडिलांना तिच्याविषयी वाटणारे प्रेम पाहिल्यावर मला वाटते, ‘मी बाहेरचा आहे आणि समृद्धीच त्यांची मुलगी आहे.’
अ. एकदा आईचा पाय पुष्कळ दुखत होता आणि ती ते कुणालाही न सांगता तशीच बसलेली होती. तेव्हा समृद्धीच्या ते लक्षात आल्यावर तिने आईच्या पायाला तेल लावून पाय चेपून देण्यास प्रारंभ केला. तेव्हा आईच्या डोळ्यांत पाणी आले आणि ती म्हणाली, ‘‘सख्खी मुलगीही इतके करत नाही, तितके तू माझ्यासाठी करतेस.’’
आ. मोठ्या भावाची मुले लहान आहेत; पण त्यांच्याशी तिचे वागणे काकू म्हणून नाही, तर एक साधिका किंवा आई यांसारखेच आहे. ‘ती आपलीच मुले आहेत’, असाच तिचा नेहमी विचार असतो आणि त्याचप्रमाणे ती त्यांच्यावर चांगले संस्कार होण्यासाठी धडपड करत असते, तसेच त्यांचे काही चुकले, तर ती त्यांना रागावतेही.
इ. तिच्यातील प्रेमभावामुळे आमचे नातेवाइक तिला नेहमी दूरभाष करतात आणि तिची अन् सगळ्यांची विचारपूस करतात.
२. स्वतःच्या सेवा करून राहिलेल्या वेळेत घरची सर्व कामे करून सासूबाईंच्या प्रकृतीची काळजी घेणे
आईचे वय झाल्यामुळे आणि तिला बर्याच शारीरिक अडचणी असल्याने तिला घरची कामे करणे अन् तिच्या स्वतःच्या प्रकृतीची काळजी घेणे कठीण होते; पण अशा वेळी ‘स्वतःच्या सेवा करून राहिलेल्या वेळेत घरची सर्व कामे करणे आणि आईच्या पायांना तेल लावणे किंवा डोके दुखत असेल, तर ते दाबून देणे’ अशा सेवा ती करते. त्याच समवेत ‘आईला कधी कधी पुष्कळ कामे असतात’, असे वाटून ती तिच्या साहाय्याला येते आणि मुलीप्रमाणे हक्काने सांगून कामे न करता तिला विश्रांती घ्यायला सांगते.
३. कुटुंबातील सर्वांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना सर्वतोपरी साहाय्य करणे
सध्या कोरोना महामारीमुळे वहिनी, मोठा भाऊ आणि त्यांची २ मुले हेही गोवा येथील घरी आले आहेत. त्यामुळे घरातील कामे वाढली असल्याने पत्नीला सेवेसाठी वेळ देता येत नव्हता. त्या स्थितीतही तिने ‘कोणाला काय लागते ?’, हे समजून घेतले. ‘गोव्यातील सर्व ठाऊक असल्याने बाजारातून वस्तू आणणे, कुटुंबियांना आधुनिक वैद्यांकडे घेऊन जाणे, वडिलांना अधिकोषाच्या किंवा इतर कामांना साहाय्य करणे, तसेच पुतण्यांची समृद्धीशी जवळीक असल्याने त्यांना वेळ देणे’, इतक्या सर्व गोष्टी एकट्याने करणे शक्य होत नाही’, हे मी अनुभवले आहे. अशा स्थितीमध्ये तिने त्या सगळ्या गोष्टी एकटीने सांभाळल्या.
वरील सर्व कामे करतांना तिला कधी अडचण आली, तर ती मला भ्रमणभाष करत असे; पण ‘मला हे सर्व सांभाळता येत नाही. तुम्ही इथे या आणि सर्व सांभाळा’, असे तिने मला कधीही सांगितले नाही. ‘हे कसे हाताळायचे ? कसे करायचे ?’, हेच ती मला विचारत असे. त्या वेळी मला तिच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटायची. घरात सगळ्यांत लहान असूनही ज्या पद्धतीने ती घर सांभाळत आहे, ते आम्हालाही कधी शक्य झाले नसते.
४. वडिलांनी कधीच आमच्याजवळ त्यांचे मन मोकळे केले नव्हते. आई आणि वडील दोघेही तिला सर्व गोष्टी सांगतात आणि ती जे सांगेल ते ऐकतात.
५. सौ. समृद्धी यांच्यामुळे निश्चिंतपणे दौर्यावर सेवा करता येणे
समृद्धी या घरात आल्यावर घराला घरपण आले. सर्वच कुटुंबियांना साधनेच्या आणि सेवेच्या दृष्टीने तिचे साहाय्य होऊ लागले. आज ती गोव्याला असल्यामुळे मी दौर्यावर निश्चिंतपणे सेवा करू शकत आहे. तिला तिच्या माहेरचेसुद्धा पहावे लागते. तिच्याकडून नेहमी मला एकच वाक्य ऐकायला मिळते, ‘‘ते सगळे आपलेच आहेत. त्यांना आपण सांभाळणार नाही, तर कोण सांभाळणार ?’’ या गोष्टीविषयी मला तिचे नेहमी पुष्कळ कौतुक वाटते आणि खरोखरच मला तिचा मोठा आधार वाटतो.
‘मला देवाने इतकी समजूतदार पत्नी दिली’, यासाठी मी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. स्नेहल राऊत, चेन्नई (२०.१.२०२१)