परात्पर गुरुदेवांच्या चरणी साधकांचे कृतज्ञतापुष्प !
‘भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने या घोर कलियुगामध्ये माझी गुरुमाऊलीची भेट झाली, यासाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. माझ्यासारख्या जिवाने गेल्या अनेक जन्मी जे काही पुण्य केले आहे, त्याचेच फलस्वरूप म्हणून गुरुमाऊलीची भेट झाली आहे. या जन्मी मी अध्यात्मवेडी होऊन श्री गुरूंच्या शोधात कुठेही गेले नव्हते. भगवंतानेच या जन्मामध्ये ही अनमोल भेट दिली आहे, यासाठी कोटीशः कृतज्ञता ! गुरुदेवांंचे नाव जरी मनात आले, तरी ‘कृतज्ञता, कृतज्ञता आणि कृतज्ञता’, या शब्दाचे तरंग संपूर्ण शरिरात उमटतात. त्यांनी आतापर्यंत आम्हाला स्थुलातून आणि सूक्ष्मातून जे काही दिले आहे, ते सर्व शब्दातीत अन् अनमोल आहे. महर्षींनी ‘ते विष्णूचा अवतार आहेत’, असे आता सांगितले; परंतु त्यांच्याशी आमचा संपर्क आला, तेव्हापासूनच त्यांनी आम्हा सर्व साधकांना ते अवतार असल्याची प्रचीती दिली आहे.
मी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना करू लागल्यानंतर लगेचच माझा गुरुमाऊलीशी संपर्क झाला. तेव्हापासून त्यांनी माझ्यासाठी जे जे घडवले ते तर शब्दांत मांडणे अशक्यच आहे. माझ्या अल्प बुद्धीला लक्षात आलेले काही प्रसंग आणि मला आलेल्या अनुभूती अन् त्यांच्या समवेत अनुभवलेले काही अनमोल क्षणमोती कृतज्ञतेच्या भावाने त्यांच्या चरणी अर्पण करते.
(भाग १)
१. वर्ष १९९६ पासून अनुभवलेले परात्पर गुरुदेवांचे अवतारत्व दर्शवणारे काही प्रसंग !
१ अ. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांनी साधना सांगितल्यानंतर गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात परात्पर गुरुमाऊलीशी पहिल्यांदाच भेट होणे आणि त्यांना भेटताच अध्यात्माची फारशी ओढ नसतांनाही ‘परात्पर गुरुदेव सांगतील, तसे करायचे’, असा मनाचा आपोआप निश्चय होणे : मी मे १९९६ मध्ये सनातन संस्थेच्या संपर्कामध्ये आले आणि त्यानंतर लगेचच, म्हणजे जुलै १९९६ मध्ये माझी गुरुमाऊलीशी प्रथम भेट झाली. त्या वेळी ‘ते कुणीतरी अध्यात्मातील मोठे अधिकारी व्यक्ती आहेत’, हेही मला ठाऊक नव्हते. आधुनिक वैद्या (सौ.) नंदिनी सामंत यांच्याकडून साधना समजली आणि मी साधना करायला लागले. नंदिनीताईंनी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला बोलावल्यामुळे मी त्या कार्यक्रमाला गेले होते आणि तेथे नंदिनीताईंनी परात्पर गुरुदेवांशी माझी भेट करवून दिली. गुरुमाऊली भेटताच क्षणी माझ्या मनातील सर्व विचार थांबले आणि ‘आता आपण केवळ गुरुदेव सांगतील, तेच करायचे’, असा मनाचा निश्चिय झाला. बुद्धीने विचार केला, तर ‘मी असा काही निश्चय करीन किंवा मला अध्यात्माची पुष्कळ आवड होती’, असे काहीच नव्हते. त्यांच्या या पहिल्याच भेटीमध्ये माझ्यामध्ये झालेला हा आंतरिक पालट ही त्यांच्या अवतारत्वाने मला दिलेली पहिली प्रचीती होती.
त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर, त्यांच्याशी भ्रमणभाषवरून संपर्क आल्यानंतर किंवा त्यांच्या आठवणीनेही अनेक प्रचीती येत गेल्या. आता मागे वळून पाहिल्यानंतर त्यांनी दिलेली त्यांच्या आध्यात्मिक सामर्थ्याची महती लक्षात येते.
१ आ. असा झाला सूक्ष्मज्ञान शिकण्याचा आरंभ !
१ आ १. भूतलावर ईश्वरी राज्य स्थापन करतांना पहिला लढा हा सूक्ष्मातील वाईट शक्तींशीच द्यावा लागणार असून नंतर ईश्वरी राज्याची स्थापना होणार असल्याचे ज्ञान केवळ गुरुमाऊलीलाच असणे : या वेळी काही साधकांना बुद्धीला न समजण्यासारखे शारीरिक आणि मानसिक त्रास व्हायला लागले. काही जणांचे वाईट शक्तींचे त्रास पुष्कळ वाढले. त्या वेळी ‘साधकांना होणारे त्रास हे वाईट शक्तींमुळे होत आहेत’, हे त्यांनी आमच्या लक्षात आणून दिले. ‘ईश्वरी राज्य स्थापनेतील पहिला लढा हा सूक्ष्मातील वाईट शक्तींविरुद्ध असून तो लढल्यानंतरच ईश्वरी राज्याची, म्हणजेच हिंदु राष्ट्राची (सनातन धर्म राज्याची) पहाट पहायला मिळणार आहे’, हे ईश्वरी नियोजन केवळ त्यांनाच ज्ञात होते. ग्रंथांमध्ये त्यांनी ‘कलियुगातील सामान्य बुद्धीला आणि बुद्धीवादी मानवाला समजेल’, अशा सोप्या आणि विज्ञानाच्या भाषेत सूक्ष्मातील ज्ञान हा विषय सर्वांसमोर मांडला आहे.
१ आ २. ‘सूक्ष्म’ म्हणजे काय ?’ हे ठाऊक नसतांनाही ‘सूक्ष्मातील अनुभूती देणे आणि त्यातील बारकावे शिकवणे’ या सारखी महाकठीण गोष्टही गुरुमाऊलीने सहजतेने शिकवणे अन् त्यांना सूक्ष्म जगत् पूर्ण ठाऊक असणे’, या गोष्टीच त्यांचे अवतारत्व सिद्ध करत असणे : सनातन संस्थेमध्ये सूक्ष्मातील शिकणे प्रथमच चालू झाले होते. त्यामुळे आम्हा साधकांना ‘याविषयीची सेवा कशी करायची ?’, हे ठाऊक नव्हते. त्यामुळे या विषयाच्या अंतर्गत सेवा करणे किंवा ‘काय करायचे ?’, याचे ज्ञान गुरुदेव सोडून अन्य कुणालाच नव्हते. ‘सूक्ष्म-जगत् किती मोठे आहे ?’ आणि ‘शब्दातीत भगवंताला कसे अनुभवायचे ?’, हे त्यांनी आम्हा सर्व साधकांना शिकवले. कुणालाही जे स्थूल डोळ्यांनी दिसते, ते शिकणे किंवा शिकवणेच पुष्कळ कठीण असते. गुरुदेवांना सूक्ष्म जगताचे सर्व ज्ञान होते. त्या वेळी आम्हा सर्व साधकांकडून त्यांनीच सेवा करवून घेतली आणि टप्प्याटप्प्याने आमच्याकडून या विषयातील सेवेची घडी बसवून घेतली. एकूणच पहाता ‘सूक्ष्मातील गोष्टींच्या अनुभूती देणे, त्यातील बारकावे शिकवणे’, हे केवळ आणि केवळ अवतारत्व असलेलेच करू शकतात’, असेच आपण म्हणू शकतो.
२. सर्व ज्ञात असूनही गुरुमाऊलीने सदैव शिकण्याच्या स्थितीत राहून साधकांना शिकण्याच्या स्थितीत रहायला शिकवणे
वाईट शक्तींच्या त्रासाचे स्वरूप किंवा त्यामध्ये होणार्या सर्व गोष्टी गुरुदेवांना माहिती होत्या; परंतु हे सर्व आम्हा साधकांना फारच नवीन होते. त्या वेळी ‘सर्व ठाऊक असूनही आपल्याला काहीच माहीत नाही’, अशा स्थितीत राहून गुरुदेव सर्व शिकत होते. गुरुदेव अशा पद्धतीने आमच्या समवेत शिकण्याच्या स्थितीत रहात होते की, ‘आम्हाला वाटायचे गुरुदेवांनाही हे आजच कळत आहे !’; परंतु आज विचार केल्यावर लक्षात येते की, ‘सर्व ज्ञात असूनही कसे शिकण्याच्या स्थितीत रहायचे ?’, हे ते आम्हा सर्व साधकांना शिकवत होते.
३. केर्ली (जिल्हा कोल्हापूर) येथील प.पू. शामराव महाराज यांच्याकडे शिष्य भावात राहून शिकणे
कोल्हापूर जिल्ह्यातील केर्ले या गावी प.पू. शामराव महाराज वाईट शक्तींचा त्रास असणार्यांसाठी उपाय करत असत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांचे नाव वाईट शक्तींचा त्रास न्यून करण्यासाठी प्रसिद्ध होते. ते वाईट शक्तींचा त्रास असणार्या अनेकांसाठी विविध उपाय करत होते. त्यांच्या उपायांचा लोकांना लाभही होत होता. सर्वज्ञानी असणारे गुरुदेव प.पू. शामराव महाराज यांच्याकडे काही मास प्रतिदिन अभ्यासण्यासाठी जात होते. तेथे जाऊन त्यांनी प.पू. शामराव महाराज यांच्याकडून ‘वाईट शक्तींच्या त्रासाचे प्रकार, उपायांची पद्धत आणि अधिक परिणामकारक उपाय कोणते ?’, याचा अभ्यास केला. त्या वेळी त्यांनी आम्हा सर्व साधकांना ‘शिकण्याच्या स्थितीत आणि शिष्य भावात कसे रहायचे ?’ हे स्वतःच्या कृतीतून शिकवले.
३ अ. प.पू. शामराव महाराज करत असलेल्या आध्यात्मिक स्तरावरील उपायांचा गुरुदेवांनी केलेला अभ्यास
३ अ १. सर्व उपाय लिहून घेणे : प.पू. शामराव महाराज वाईट शक्तींच्या त्रासाच्या निवारणासाठी करत असलेले सर्वच उपाय प.पू. गुरुदेव लिहून घेत असत. त्यातून त्यांनी वाईट शक्तींचे प्रकार आणि त्यांवरील प्रभावी उपचारपद्धत यांचा त्यांनी अभ्यास केला.
३ अ २. अल्प शक्तीच्या वाईट शक्तीसाठी उतारा ठेवल्यावर त्यांनी त्रास देणे थांबवणे आणि अधिक शक्तीच्या वाईट शक्तींवर याचा कोणताही परिणाम न होणे : प.पू. शामराव महाराज वाईट शक्तींच्या त्रास असणार्या काही व्यक्तींना उतारा द्यायला सांगायचे. अल्प शक्तीच्या वाईट शक्ती अशा प्रकारचे उतारे ठेवल्यावर संबंधित व्यक्तीला त्रास देणे थांबवत होत्या; परंतु ज्या वाईट शक्ती अधिक शक्तीशाली होत्या, त्यांच्यावर अशा गोष्टींचा काहीच परिणाम होत नव्हता. ‘त्यांची शक्ती नष्ट करण्यासाठी नामजपादी उपायांचाच वापर करायला हवा’, हे तेव्हा लक्षात आले.
(क्रमशः)
– वैद्या (कु.) माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.६.२०१८)
भाग २ वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/448003.html
|