साधकांच्या मनी विराजमान परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘मी मिरज आश्रमात अनेक वर्षे राहिलो. या कालावधीमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी अशा काही अनुभूती दिल्या आहेत की, ‘अनंत कोटी ब्रह्मांडात अशी अद्भुत शक्ती केवळ परात्पर गुरु डॉक्टरांकडेच आहे’, असे मला वाटते. अध्यात्मात स्थिर होण्यासाठी त्यांच्याच कृपेने मला आलेल्या अनुभूती पुष्कळ मार्गदर्शक ठरल्या आणि त्यामुळे आम्ही अध्यात्मात अन् साधनेत स्थिर झालो. मिरज आश्रमातील अनुभूती त्यांची सर्वज्ञता आणि सर्वशक्तीमानता दर्शवणार्या आहेत. माझ्या अल्प बुद्धीला ज्या लक्षात आल्या, त्या पुढे दिल्या आहेत.
(भाग २)
भाग १ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/447157.html
४. सर्वज्ञता
४ अ. सांगलीमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यावर त्यांनी व्यवसायाच्या संदर्भात चौकशी करणे, काही वर्षांतच बांधकाम उद्योगाला मंदी आल्याने सदनिका विकल्या न जाणे, त्यानंतर उद्योगातून बाहेर पडून पूर्णवेळ साधना करणे आणि त्यामुळे व्यवसायात होणार्या हानीतून वाचणे : परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हा साधकांवर पुष्कळ प्रीती केली. आमच्यावर भरभरून प्रेम केले आणि आम्हाला कशाचीही उणीव पडू दिली नाही. वर्ष १९९८ मध्ये सांगली येथे परात्पर गुरु डॉक्टरांचे मार्गदर्शन होते. त्या मार्गदर्शनाला आम्ही गेलो होतो. त्यांचे दर्शन घ्यायला गेलो असता, त्यांनी मला विचारले, ‘‘व्यवसाय कसा चालू आहे ? सदनिका (फ्लॅट) विकल्या जातात का ?’’ ‘ते असे का विचारत आहेत’, हे माझ्या लक्षात आले नाही; पण काही वर्षांतच आमच्या बांधकाम उद्योगाला मंदी आली आणि सदनिका (फ्लॅट) विकल्या जाईनाशा झाल्या. त्यानंतर मी उद्योगातून बाहेर पडलो आणि पूर्ण वेळ साधनेवर लक्ष केंद्रित केले. मी व्यवसाय तसाच चालू ठेवला असता, तर माझी हानी झाली असती. काळाच्या पलीकडे बघणार्या परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मी वाचलो; कारण माझ्या समवेत धंदा करणारे पुष्कळ जण या उद्योगात बुडाले, हे मी डोळ्याने पाहिले आहे. ‘सर्वज्ञता असणार्या गुरूंना साधकाची कोणत्याही स्वरूपातील हानी झालेली आवडत नाही आणि ते त्याला अशा प्रकारच्या अडचणीतून कसे बाहेर काढतात’, हे मी अनुभवले.
४ आ. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या समवेत वाहनातून जात असतांना काही अंतर पार केल्यावर बघून म्हणाले, ‘‘किती वाईट शक्ती आहेत ना ?’’, त्या वेळी मला काहीच न दिसणे आणि येतांना पुन्हा त्याच मार्गाने आल्यावर ते काहीच न बोलणे अन् त्यांच्या शब्दातील शक्ती अन् संकल्प यांमुळे वाईट शक्ती निघून गेल्याचे वाटणे : एकदा आम्ही परात्पर गुरु डॉक्टर यांच्या समवेत वाहनातून जात होतो. दोन्ही बाजूंना शेती होती. काही किलोमीटर अंतर पार केल्यानंतर परात्पर गुरु डॉक्टर डाव्या बाजूला बघून म्हणाले, ‘‘इथे किती वाईट शक्ती आहेत ना !’’ आम्ही अज्ञानी असल्याने आम्हाला काय कळणार किंवा दिसणार ? झाडांवरती मला काही दिसत नव्हते; पण त्यांचे सांगणे शंभर टक्के सत्य आहे, हे मी जाणून होतो. काही घंट्यांनी त्याच मार्गाने परत येतांना ते असे काही बोलले नाहीत. कदाचित परात्पर गुरु डॉक्टरांच्या अस्तित्वाने तिथल्या वाईट शक्ती निघून गेल्या असाव्यात. काय त्या शब्दांतील शक्ती ! ते शब्द नव्हे संकल्प ! किती वर्णावी त्यांची सर्वज्ञता ! असे प्रसंग आठवल्यावर त्यांच्या चरणी लीन होऊन येणारे भावाश्रू सूक्ष्मातून पहात रहाणे एवढेच शिल्लक रहाते.
४ इ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘अभ्यासवर्गात कोणालाही त्रास होणार नाही’, असे एका साधकाला चिठ्ठीवर लिहून देणे आणि त्याप्रमाणे परात्पर गुरु डॉक्टरांचे सर्वांवर नियंत्रण असून त्यांच्या इच्छेविना कोणीही कार्यरत होऊ शकत नसल्याचे लक्षात येणे : परात्पर गुरु डॉक्टर मुंबईला अभ्यासवर्ग घेत असत. त्या वेळी आताचे काही जुने साधक अभ्यासवर्गाला यायचे. एकदा अभ्यासवर्ग चालू होण्यापूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांनी एका चिठ्ठीवर लिहिले होते की, आज या अभ्यासवर्गामधील कुणालाही त्रास होणार नाही. ती चिट्ठी त्यांनी एका साधकाला दिली. त्या अभ्यासवर्गात दिवसभर अन्य अभ्यासवर्गाप्रमाणे कोणताही त्रास झाला नाही. यातून परात्पर गुरु डॉक्टरांचे सर्वांवर नियंत्रण आहे आणि त्यांचा संकल्प किंवा इच्छेविना कोणीही कार्यरत होऊ शकत नाहीत. त्यांच्या मनात आले, तर ‘ते एका क्षणात त्यांना नष्ट करू शकतात’, हे शिकायला मिळाले.
५. गुरुदेवांच्या दर्शनाने निःशब्द झाल्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देता न येणे आणि त्यांच्या बोलण्यामुळे ‘अहं निर्मूलन झाले’, याचा आनंद होणे
परात्पर गुरु डॉक्टर मिरज आश्रमात रहात होते. त्यांच्या खोलीला लागूनच सज्ज्यामध्ये प्रसाधनगृह आहे. त्या वेळी मी आणि आधुनिक वैद्य मंगलकुमार कुलकर्णी मिरज आश्रमाचे व्यवस्थापन पहात होतो. एकदा परात्पर गुरु डॉक्टरांच्या प्रसाधनगृहात अडचण असल्याने मी पहायला गेलो. तेव्हा त्यांनी मला विचारले, ‘‘संडासचे भांडे कसे बसवतात ?’’ त्या वेळी मला काही सांगता येईना. गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर मी देहभान पूर्ण विसरलो आणि निःशब्द (ब्लँक) झालो. संडासच्या भांड्याकडे पाहिले असता मला ते उलटे दिसू लागले.
शेवटी परात्पर गुरु डॉक्टर म्हणाले, ‘‘कुलकर्णी गेली २५ – ३० वर्षे याच उद्योगात तुम्ही अनेक संडासची भांडी बसवलीत; पण ‘संडासचे भांडे कसे बसवायचे ?’, हे तुम्हाला सांगता येत नाही. खरंच मला त्याविषयी काही समजत नव्हते; परंतु ‘त्यांनी तसे म्हटल्याने माझा अहं न्यून होईल’, याचा आनंद मला नक्कीच झाला. नंतर पाहिले असता ते संडासचे भांडे योग्य प्रकारे बसवल्याचे लक्षात आले.
६. रामनाथी आश्रमात आलेली अनुभूती
६ अ. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सत्संगात त्यांच्याकडून बाहेर पडणारी चैतन्यदायी स्पंदने हृदयाला भिडणे, त्यानंतर मन सकारात्मक आणि आनंदी होऊन नामजप आपोआप चालू होणे : पूर्वी परात्पर गुरु डॉक्टरांचा सत्संग होता. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांकडून बाहेर पडणारी चैतन्यदायी स्पंदने हृदयाला, म्हणजेच अनाहतचक्राला भिडत होती. त्यामुळे माझे मन सकारात्मक झाले. कोणाविषयीही मनात विकल्प नाही आणि अनेक दिवस माझा नामजप आपोआप चालू होता. त्यांच्या सत्संगामुळे आनंदीआनंद जाणवू लागला आणि सगळे चांगले दिसायला लागले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी जी अवस्था मला प्राप्त करून दिली, त्याच्या पुढच्या अवस्थेकडे आपल्याला जायचे आहे आणि त्याच्या अनुषंगाने जोरदार प्रयत्न परात्पर गुरु डॉक्टर माझ्याकडून करून घ्यायला लागले’, असे मला जाणवले.
परात्पर गुरु डॉक्टरांनी मला अध्यात्मात स्थिर केले आणि साधना शिकवली. तसेच स्थूल आणि सूक्ष्म या माध्यमांतून अनुभव अन् अनुभूती देऊन माझी श्रद्धा वाढवली. अशा सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तीमान आणि सर्वज्ञ गुरुमाऊलीच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(समाप्त)
– श्री. मधुसूदन कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |