सर्वशक्तीमानता आणि सर्वज्ञता असलेले एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !

परात्पर गुरु डॉ. आठवले

​‘मी मिरज आश्रमात अनेक वर्षे राहिलो. या कालावधीमध्ये परात्पर गुरु डॉक्टरांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले. ‘धंदा चांगला चालावा, पैसा भरपूर मिळवावा’, अशा मायाजालात अडकलेले आम्ही कधीही साधनेत आलो नसतो; पण आम्हा सामान्यातील सामान्य व्यक्तींना, ज्यांना साधना किंवा अध्यात्म ठाऊक नाही, अशांना परात्पर गुरु डॉक्टरांनी अशा काही अनुभूती दिल्या आहेत की, ‘अनंत कोटी ब्रह्मांडात अशी अद्भुत शक्ती केवळ परात्पर गुरु डॉक्टरांकडेच आहे’, असे मला वाटते. अध्यात्मात स्थिर होण्यासाठी त्यांच्याच कृपेने मला आलेल्या अनुभूती पुष्कळ मार्गदर्शक ठरल्या आणि त्यामुळे आम्ही अध्यात्मात अन् साधनेत स्थिर झालो. मिरज आश्रमातील अनुभूती त्यांची सर्वज्ञता आणि सर्वशक्तीमानता दर्शवणार्‍या आहेत. माझ्या अल्प बुद्धीला ज्या लक्षात आल्या, त्या पुढे दिल्या आहेत. 

(भाग १)

श्री. मधुसूदन कुलकर्णी

१. कुणीतरी करणी करून मारण्याचा प्रयत्न करून ‘त्यातून जीवनदान मिळणे’, ही अशक्यप्राय गोष्ट परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने अनुभवता येणे

१ अ. आश्रमाच्या शेजारी असणार्‍या व्यक्तींची जागा विकत घेतल्याचे एका शेजार्‍यांना न आवडणे, ती व्यक्ती भेटल्यानंतर तिने ‘तुला मी आता हार घालणार आहे’, असे सांगणे, त्याविषयी चौकशी केल्यानंतर ते मारणार असल्याचे कळणे : ‘वर्ष २००१ मध्ये सांगली जिल्ह्यातील मिरज येथे सनातन संस्थेच्या वतीने आश्रम बांधण्यात येत होता. त्या आश्रमासाठी आश्रमाच्या शेजारी असणार्‍या व्यक्तींची मी काही चौरसमीटर जागा  विकत घेतली होती. आश्रम बांधायला आरंभ केल्यावर ‘आश्रमाला लागून असणार्‍या दुसर्‍या एका शेजार्‍यांना मी घेतलेली जागा हवी होती’, असे समजले. ती व्यक्ती पुष्कळ तामसिक होती. आमचे आणि त्यांचे संबंध चांगलेही नव्हते. ते आमच्या कुटुंबाला केवळ ओळखत असत. एक दिवस ते काका मला वाटेत भेटले आणि मला म्हणाले, ‘‘तुम्ही जागा घेतली, ते मला काही पटलेले नाही. मी आता तुला हार घालणार आहे.’’ ते असे का म्हणत आहेत, हे माझ्या लक्षात येईना. चौकशी केल्यानंतर कळले की, ते तुला आता मारणार आहेत. त्या प्रसंगानंतर मी त्याकडे लक्ष दिले नाही.

१ आ. एक कुत्रा आश्रमाच्या दारात दिवसेंदिवस खंगत असल्याचे दिसणे, काही दिवसांनी तो मेल्याचे समजणे आणि त्यानंतर पुष्कळ शारीरिक त्रास होणे : त्यानंतर ‘एक कुत्रा आश्रमाच्या दारात दिवसेंदिवस खंगत आहे’, असे मला दिसले. तो श्‍वान आश्रमाच्या दारातच रहात असून गाड्या उभ्या असायच्या (पार्किंग केलेल्या), तिथे तो पडून रहायचा. काही दिवसांनी तो मेला. तो मेल्यानंतर मला पुष्कळ शारीरिक त्रास होऊन छातीमध्ये दुखायला लागले. ‘असे का होत आहे ?’, हे मला कळेना. कोणत्याही औषधोपचाराने तो त्रास बरा होईना.

१ इ. कोल्हापूर येथे परात्पर गुरु डॉक्टरांची भेट झाल्यावर त्यांनी प्रेमाने चौकशी केल्यावर ‘करणी झाल्याचे सांगून ईश्‍वर काळजी घेतो’, असे सांगणे आणि त्यानंतर हृदयविकाराचे झटके येऊन शस्त्रकर्म होणे अन् मृत्यूचा घाला होऊनही परात्पर गुरूंनी त्यातून बाहेर काढणे : काही दिवसांतच मला कोल्हापूरला जाण्याचा योग आला. त्या वेळी परात्पर गुरु डॉक्टर कोल्हापूर जिल्ह्यात होते. ‘केर्ले या गावात प.पू. शामराव महाराज रहातात’, असे मी ऐकून होतो. त्यांच्यावर ग्रंथ लिहिण्याकरता परात्पर गुरु डॉक्टर कोल्हापूरमध्ये आले होते. ज्या साधकांच्या घरी ते उतरले होते, त्या साधकांच्या घरी मी गेलो. परात्पर गुरु डॉक्टरांनी अत्यंत प्रेमाने माझी चौकशी केली. तेव्हा मी साधनेत नवीन होतो. मी त्यांच्या प्रेमामुळे पुष्कळ भारावून गेलो. बोलता बोलता ते मला म्हणाले, ‘‘तुमच्यावर करणी झाली आहे.’’ करणीविषयी मी कधी ऐकले नव्हते. लगेच ते म्हणाले, ‘‘ईश्‍वर आहे. तो काळजी घेतो !’’
त्यानंतर मी मिरजेला आलो. मिरजेत आल्यावर मला पुष्कळ त्रास व्हायला लागला. हृदयविकाराचे झटके आले. शस्त्रकर्म झाले; पण या सर्व गोष्टींतून परात्पर गुरु डॉक्टरांनी मला बाहेर काढले. माझ्यावर साक्षात् मृत्यूचा घाला होता.

१ ई. परात्पर गुरु डॉक्टरांनी ‘‘आता त्रास गेला ना !’’, असे म्हणणे आणि त्यांनी मुलाप्रमाणे सांभाळल्याने साधना करू शकणे : वर्ष २०१६ मध्ये एकदा माझी त्यांची भेट झाली असता ते मला म्हणाले, ‘‘झाले. आता त्रास गेला ना !’’ म्हणजे मला होणारा त्रास आता गेला होता. या साधारण १५ वर्षांच्या कालावधीमध्ये त्यांनी मला मुलासारखे सांभाळले; म्हणून आज मी साधना करू शकत आहे.

१ उ. सर्वसाधारणतः ‘करणी उतरवणे किंवा त्यातून जीवनदान मिळणे’, ही अशक्यप्राय गोष्ट असणे : सर्वसाधारणतः करणी उतरवणे किंवा त्यातून जीवनदान मिळणे, ही अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यासाठी पुष्कळ प्रयत्न करावे लागतात. करणी करणार्‍यांनी ‘करणी कशा प्रकारे केली आहे’, यावरही ते अवलंबून असते. ‘या करणीचा कालावधी (मुदत) १४ वर्षांचा होता’, हे मला नंतर कळले. त्याचा चांगला परिणाम दिसून स्थिर व्हायला आणखीन दोन वर्षे लागतात, हे मला अनुभवता आले.

१ ऊ. या त्रासातून गुरूंच्या शक्तीने वाचवणे आणि या कालावधीत परात्पर गुरूंनी कुटुबियांनाही प्रसाद पाठवून त्यांचीही काळजी घेणे अन् त्यांनी दिलेल्या जीवनदानामुळे मी उभा असणे : या वेळी माझा महामृत्युयोग होता. या प्रसंगातून मला श्री गुरूंच्या सर्वशक्तीमानतेची अनुभूती आली. परात्पर गुरु डॉक्टरांनी आम्हाला दिलेली ही पुष्कळ मोठी अनुभूती आहे; कारण या प्रसंगातून मी वाचणे शक्यच नव्हते. या सर्व गोष्टी बुद्धीच्या पलीकडच्या आहेत. या कालावधीत मी घेतलेली औषधे आणि वैद्यकीय उपचार मला वाचवू शकले नाहीत. गुरूंनी मला जीवनदान दिले; म्हणून मी आज उभा आहे. या कालावधीत त्यांनी माझेच रक्षण केले, असे नाही तर माझी पत्नी, मुलगा आणि मुलगी यांना ते सतत प्रसाद पाठवत असत. त्यांनी सतत ‘माझे तुमच्या कुटुंबाकडे लक्ष आहे’, याची जाणीव करून दिली. नातेवाईक कितीही जवळचे असू देत, त्यांच्यामध्ये अशी क्षमता नसते. ‘सर्वशक्तीमान गुरुच असे करू शकतात’, हे यातून अनुभवायला आले. पुनर्जन्म देणार्‍या गुरूंचे ऋण मी कसे फेडू, हे मला ठाऊक नाही. मी कधीच उतराई होऊ शकणार नाही. त्यांनीच माझ्याकडून त्यांना अपेक्षित अशी साधना करून घ्यावी, ही त्यांच्या चरणी प्रार्थना !

२. परात्पर गुरु डॉक्टरांच्या शब्दातील सामर्थ्य अनुभवता येणे

२ अ. मिरज आश्रमात साधकांना शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक प्रकारचे अनिष्ट शक्तींचे त्रास होणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी एक नारळाचे झाड दाखवून ‘या झाडावरील वाईट शक्ती इथून गेली पाहिजे’, असे म्हणणे : साधकांवर वाईट शक्तींची आक्रमणे होत होती. मिरज आश्रमातसुद्धा वाईट शक्तींचा त्रास वाढला होता. साधकांना अनिष्ट शक्तींमुळे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रास होत होते. एकदा परात्पर गुरु डॉक्टर आश्रमात फिरत असतांना आश्रमाच्या मागच्या बाजूच्या सज्यामध्ये थांबले. तेव्हा मी त्यांच्या समवेत होतो. एक नारळाचे झाड दाखवत ते म्हणाले, ‘‘या झाडावर त्रासदायक शक्ती आहे. ती गेली पाहिजे.’’

२ आ. काही दिवसांनी ते झाड कुणीतरी काढल्याचे लक्षात येणे आणि ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी म्हटल्याप्रमाणे शक्ती तेथे राहू न शकणे : काही दिवसांनी मी परत त्या बाजूला गेलो असता माझ्या लक्षात आले की, ते झाड कुणीतरी कापले आहे. झाडाच्या मालकांंना विचारले, तर ते म्हणाले, ‘‘त्या नारळाच्या झाडाचे नारळ कौलांवर पडतात आणि कौले फुटतात.’’ तेव्हा एक गोष्ट माझ्या लक्षात आली, ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी त्रासदायक शक्ती येथे नको’, असे म्हटल्यानंतर ती शक्ती तेथे राहू शकली नाही. ‘त्यांच्या मनात आलेला प्रत्येक विचार पूर्ण करण्याकरता सर्व देव देवता साहाय्य करतात’, हे आम्ही अनुभवले.

३. परात्पर गुरु डॉक्टर यांच्यातील सर्वशक्तीमानता अनुभवता येणे

३ अ. मिरज आश्रमातील वाईट शक्तींचा त्रास होत असणार्‍या साधकांना आश्रमातील ध्यानमंदिरात बोलावणे : मिरज आश्रमातील बर्‍याच साधकांना वाईट शक्तींचा त्रास होत होता. अशा त्रास होणार्‍या सर्व साधकांना परात्पर गुरु डॉक्टरांनी आश्रमातील ध्यानमंदिरात बोलावले होते.

३ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी ध्यानमंदिरात प्रवेश केल्यावर त्रास असलेल्या साधकांच्या त्रासात पुष्कळ वाढ होणे, परात्पर गुरु डॉक्टर येऊन आसंदीवर बसल्यावर त्यांनी सर्व साधकांकडे प्रीतीने पहाणे अन् साधकांना चांगले वाटणे : परात्पर गुरु डॉक्टर सत्संग घेणार होते. ‘पूर्वेकडे परात्पर गुरु डॉक्टरांचा तोंडवळा असावा’, अशी बैठक व्यवस्था केली होती. काही क्षणांतच परात्पर गुरु डॉक्टरांनी ध्यानमंदिरात प्रवेश केल्यावर सर्वत्र चैतन्य पसरले. त्या क्षणी साधकांच्या त्रासात अधिक वाढ झाली. नेहमीप्रमाणे अत्यंत प्रीतीने त्यांनी सर्व साधकांकडे पाहिले आणि काही क्षणांतच साधकांना चांगले वाटले. मी त्यांच्यापैकीच एक होतो. मलाही त्रास होत होता.

असे परात्पर गुरु डॉक्टरांच्या सर्वशक्तीमानतेची प्रचीती देणारे प्रसंग आम्ही अनुभवले आहेत.

(क्रमशः)

– श्री. मधुसूदन कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.७ २०२०)

भाग २. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/447516.html

• वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
• आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक