महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या जिवांची व्यापक स्तरावरील समष्टी साधना व्हावी, यासाठी त्यांना कलेविषयीचे शिक्षण न देता ‘संत’ होण्यास प्राधान्य देण्यास परात्पर गुरु डॉक्टरांंनी सांगणे
१. महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या मुलांमध्ये उपजतच विविध कला शिकण्याचे सामर्थ्य असल्याने त्यांना अनेक कला अवगत असणे
‘आध्यात्मिक पातळी चांगली असलेल्या, म्हणजेच महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेल्या मुलांमध्ये मुळातच विविध गुण असतात. त्याचप्रमाणे त्यांच्यात विविध कला शिकण्याचे सामर्थ्य असल्याने ती सहजतेने अनेक कलांमध्ये पारंगत असतात. याची काही उदाहरणे म्हणजे कु. प्रिशा सबरवाल (वय ११ वर्षे) हिला भरतनाट्यम्, तायक्वांदो (कराटेचा एक प्रकार), बासरी वाजवणे, पियानो वाजवणे, चित्रे काढणे आदी कला अवगत आहेत, तर कु. पूर्ती लोटलीकर (वय ६ वर्षे) हिला कथ्थक, ज्यूडो, चित्रकला, अभिनय, वक्तृत्व आदी कला अवगत आहेत.
२. दैवी बालकांचा जन्म समष्टीच्या कल्याणासाठी झाला असल्याने त्यांना व्यापक स्तरावरील समष्टी साधना करण्यास सांगितली जाणे
एकदा कु. प्रिशाने परात्पर गुरु डॉक्टरांना विचारले, ‘‘मी नृत्याच्या माध्यमातून साधना करू का ?’’ प्रिशा नृत्यात पारंगत असूनही परात्पर गुरु डॉक्टरांनी तिला ‘नको’ म्हणून सांगितले. दैवी बालकांंचा जन्म समष्टीच्या कल्याणासाठी झाला असून ‘समाजामध्ये सात्त्विकता पसरवणे’ या उद्देशाने देवाने त्यांना पृथ्वीवर जन्माला घातले आहे. त्यामुळे ‘त्यांनी अधिक समष्टी साधना करून लवकरात लवकर संत व्हावे’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा उद्देश आहे. त्यांनी एखाद्या कलेच्या माध्यमातून साधना केली, तर ती केवळ व्यष्टी साधना होऊ शकते; पण व्यापक साधना होण्यासाठी त्यांनी कलांमध्ये न अडकता समष्टीमध्ये राहून शिकणे आवश्यक असते. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांंनी तिला कलेच्या माध्यमातून साधना न करता व्यापक स्तरावरील समष्टी साधना करण्यास सांगितली.’
– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१.११.२०१७)