विवाहासारख्या सांसारिक बंधनांचा त्याग करून ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याची शिकवण देणे धर्मसंमत !

(श्रीसत्‌शक्‍ति) सौ. बिंदा सिंगबाळ

मागील काही दिवस दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘विवाहबेडीत न अडकता ईश्‍वरप्राप्ती करण्यास इच्छुक युवा साधकांनो, विवाहाच्या संदर्भात विचार मनात येत असल्यास पुढील दृष्टीकोन लक्षात घ्या !’, अशा आशयाची चौकट प्रसिद्ध होत आहे. त्या संदर्भात एका वाचकाने काही सूत्रे पाठवली होती. ती पाठवलेली सूत्रे आणि त्या संदर्भातील निरसनात्मक उत्तरे पुढे दिली आहेत.

सूत्र क्र. १ : विवाह हा हिंदु धर्मातील एक पवित्र विधी आहे. त्याला ‘बेडी’ असे कसे संबोधत आहात?

उत्तर : संसारात राहून साधना करणे सर्वांनाच साध्य करता येतेच, असे नाही. बहुतांश लोक विवाहानंतर सांसारिक बंधनात अडकतात आणि ईश्‍वरप्राप्तीचे मूळ ध्येय विसरून जातात. या दृष्टीने विवाहाला ‘बंधन’ या अर्थाने ‘बेडी’ असे संबोधले आहे. अनेक संतांनीही त्यांच्या वाङ्मयात संसार बंधनाला ‘बेडी’ असे संबोधले आहे.

प्रपंचाचा छंद टाकूनियां गोवा । धरावें केशवा हृदयांत ॥ २ ॥
सांडुनियां देई संसाराची बेडी । कीर्तनाची गोडी धरावी गा ॥ ३ ॥
तुका म्हणे तुला सांगतों मी एक । रुक्मिणीनायक मुखीं गावा ॥ ४॥

– तुकारामाची गाथा, अभंग क्र. ४१९२

संत तुकाराम महाराजांच्या या एका अभंगात दैनिकात प्रसिद्ध झालेल्या चौकटीचे सार एकवटले आहे.

सूत्र क्र २ : विवाह झाल्यानंतरही संतपदाला पोचलेले अनेक महात्मे सनातन संस्थेतही आहेत. विवाहानंतरही अनेकांनी आध्यात्मिक उन्नती करून संतपद प्राप्त केले, हे सत्यच आहे.

उत्तर : सनातन संस्थेने ‘संसारात राहून साधना करा’, असे सांगितले आहे; पण ईश्‍वरप्राप्तीचा हाच एक मार्ग आहे, असे नाही. समाजात आणि साधकांमध्येही सर्वस्वाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करणारे उन्नत जीवही असतात. मनुष्य स्वभावानुसार अशा जिवांमध्ये क्षणिक काही प्रसंगी विवाहाचे विचार येणे स्वाभाविक आहे; पण अशा निवृत्तीमार्गी जिवांचा जन्म संसार सुखासाठी झालेला नसतो. म्हणून अशा जिवांना विवाहासारख्या मायिक विचारांमधून बाहेर काढण्यासाठी ही चौकट प्रसिद्ध केली आहे.

संसारात राहून संतपदावर पोचलेल्या बहुतांश महात्म्यांनीही सांसारिक सुखाचा त्यागच करण्याची शिकवण दिली आहे. अर्थात् अध्यात्मात ‘पातळीनुसार साधना’ असल्याने पातळीनुसार ते सांसारिक जीवनाचा त्याग करून ईश्‍वरप्राप्तीसाठी प्रयत्न किंवा संसारात राहून साधना करतात.

आता काळाच्या दृष्टीने विचार करता भीषण आपत्काळ समोर उभा ठाकला आहे. भयाण अशा आपत्काळाला तोंड देतांना आपल्याच जीविताची शाश्‍वती नसल्याने विवाह करून नवीन दायित्व स्वीकारणे, हे अयोग्य ठरू शकते. त्यामुळे ‘ईश्‍वरप्राप्ती’ करण्यास इच्छुक असलेल्या साधकांनी ‘साधना’ हा हेतू केंद्रस्थानी ठेवून ‘विवाह करू नये’, असे या चौकटीच्या माध्यमातून सांगितले आहे.

सूत्र क्र. ३ : विवाह न केल्याने १०० टक्के ईश्‍वरप्राप्ती होईलच, याची खात्री कुणालाही देता येत नसतांना ‘विवाह करू नये’ असे सांगणे योग्य वाटत नाही.

उत्तर : केवळ अविवाहितच नव्हे, विवाहितांनीही योग्य साधना केल्यास ते याच जन्मात निश्‍चित ईश्‍वरप्राप्ती करतील. मात्र विवाहानंतर मायेत अडकल्यामुळे अनेक जण साधना सोडतात; पण अविवाहित साधकांच्या संदर्भात अशी शक्यता नसते.

सूत्र क्र. ४ : अशा प्रकारे सांगणे निसर्ग नियम आणि हिंदु धर्माचरणाविरुद्ध आहे, असे वाटते.

उत्तर : सनातन धर्मामध्ये चार पुरुषार्थ सांगितले आहेत. या पुरुषार्थांमध्ये सर्वांत अंतिम मोक्ष हा आहे. मोक्षप्राप्तीसाठी शेवटी सर्वास्वाचाच त्याग करावा लागतो. साधकांची ही प्रक्रिया शीघ्रगतीने व्हावी, यासाठी मार्गदर्शन करणे, हे हिंदु धर्माचरणाच्या विरुद्ध नाही.

सनातन धर्मामध्ये ब्रह्मचर्याश्रमानंतर गृहस्थाश्रमच स्वीकारला पाहिजे, असे कुठलेही बंधन नाही. ब्रह्मचर्याश्रमानंतर निवृत्तीमार्गी व्यक्ती सरळ संन्यासाश्रम स्वीकारू शकते.

धर्माचरण करण्याचा अंतिम हेतू ‘मोक्ष’ हाच असल्याने मोक्षप्राप्तीसाठी अविवाहित रहाणे, म्हणजे संन्यास धारण करण्याची परंपरा ही हिंदु धर्मातील श्रेष्ठ परंपरा आहे. या परंपरेत ब्रह्मचर्य करणारा स्वत:च स्वत:चे श्राद्ध करून सांसारिक बंधनांचा त्याग करून साधनेसाठी घर-दार सोडून निघून जातो. आद्य शंकराचार्य हे त्यांपैकीच एक उदाहरण आहे. त्यामुळे विवाहासारख्या सांसारिक बंधनांचा त्याग करून ईश्‍वरप्राप्तीसाठी साधना करण्याची शिकवण देणे धर्मसंमत आहे. किंबहुना तितकी क्षमता असलेल्या साधकांना तसे मार्गदर्शन करणे, हे धर्मकर्तव्य आहे.

अर्थात् दैनिकात प्रसिद्ध झालेल्या चौकटीतील शिकवण ऐच्छिक आहे. ती कुणासाठी बंधनकारक नाही. विविध विचारांमध्ये अडकलेल्या जिवांना ईश्‍वरप्राप्तीच्या दिशेने पुढे जाण्यासाठी केलेले मार्गदर्शन आहे.

– (श्रीसत्‌शक्ति) सौ. बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.