जी.एस्.टी.च्या अटींविरोधात व्यापारी संघटनांची आंदोलनाची चेतावणी

पुणे – भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कायदा (एफ्.एस्.एस्.आय.) आणि जी.एस्.टी. कायद्यातील जाचक तरतुदी रहित कराव्यात, यासाठी देशभर आंदोलन करण्याचा निर्णय ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट)’ च्या राज्यव्यापी परिषदेमध्ये १० जानेवारी या दिवशी घेण्यात आला आहे. ‘कॅट’ ही देशातील व्यापार्‍यांचे नेतृत्व करणारी अग्रगण्य संस्था आहे. ‘कॅट’च्या राज्य शाखेच्या वतीने व्यापारी संघटनांच्या पदाधिकार्‍यांची एक दिवसीय परिषद पुण्यात झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत याविषयी माहिती देण्यात आली.

या वेळी ‘कॅट’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भरतीया, ‘कॅट’चे संस्थापक अध्यक्ष महेंद्र शहा यांच्यासह राज्यातील ३६ जिल्ह्यांतील ‘कॅट’च्या प्रतिनिधींनी परिषदेत सहभाग घेतला. या परिषदेत बहुराष्ट्रीय आस्थापनांशी स्पर्धा करण्यासाठी व्यापार्‍यांना प्रशिक्षण देणे, व्यापार्‍यांच्या सहकारी संस्था स्थापन करणे, व्यापारासाठी आधार कार्डच्या धर्तीवर एकच परवाना असावा, ‘डिजिटल मार्केट’साठी धोरण बनवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणे आदी मागण्यांचे ठराव करण्यात आले.