राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे कार्यालय पेटवले 

साखरेच्या एफ्.आर्.पी. (हमीभाव) आंदोलनाचा भडका

प्रतिकात्मक छायाचित्र

सांगली – एकरकमी एफ्.आर्.पी.साठी (हमीभाव) स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन चालू केले आहे. ११ जानेवारी या दिवशी अज्ञातांकडून मिरज तालुक्यातील सावळवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या राजारामबापू कारखान्याचे ऊस नोंदणी कार्यालय पेटवून दिले. या आगीत कार्यालयातील साहित्य, कागदपत्रे, पटल आणि आसंद्या जळून खाक झाले आहेत.

या संदर्भात अद्याप कोणत्याही शेतकरी संघटनेने याचे अधिकृत दायित्व स्वीकारलेले नाही. कोल्हापूरच्या धर्तीवर एकरकमी एफ्.आर्.पी. देण्याची स्वाभिमानीची मागणी सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी मान्यही केली होती; मात्र जिल्ह्यातील १६ पैकी केवळ ४ साखर कारखान्यांनी एकरकमी एफ्.आर्.पी. दिला आहे. अन्य कारखान्यांनी एकरकमी एफ्.आर्.पी. देण्यास आता असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुन्हा तीव्र आंदोलन छेडले आहे.