राज्यातील ६ जिल्ह्यांना ‘बर्ड फ्ल्यू’चा धोकापरभणीत अनेक परिसर बंद |
आपत्काळाचे सावट कसे येणार आहे, त्याचीच ही झलक आहे. काही दिवसांनी अशाच प्रकारे माणसांचे जीवही जाऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवे !
परभणी – शहरात ८०० कोंबड्यांचा ‘बर्ड फ्ल्यू’मुळे मृत्यू झाला आहे. यानंतर जिह्यातील ८० सहस्र कोंबड्या मारण्यात येणार आहे. राज्यातील ६ जिल्ह्यांना याचा धोका असणार आहे, असे राज्याचे पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी ११ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते पुढे म्हणाले की, २ दिवसांपूर्वीच आम्ही कोंबड्यांचे नमुने भोपाळ येथे पाठवले होते. त्याचा अहवाल आता समोर आला आहे. यामध्ये कोंबड्यांचा मृत्यू ‘बर्ड फ्ल्यू’ने झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यातील अनेक परिसर बंद करण्यात आले आहेत. ‘बर्ड फ्ल्यू’च्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ८० सहस्र कोंबड्यांना मारले जाणार आहे. कोंबड्या मारण्यासाठी ५ फुटांचा खड्डा खोदला जाईल. यामध्ये केमिकल्स टाकून कोंबड्या मारण्यात येणार आहेत. तसेच नागपूर, लातूर, अमरावती, परभणी, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यांतील कोंबड्यांचे नमुने पडताळणीसाठी पाठवले आहेत. या जिल्ह्यातही कोंबड्यांना ‘बर्ड फ्ल्यू’ संसर्ग झाल्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.