मुंबई शहरातील शेकडो रुग्णालयांकडे अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र नाही !

अग्नीसुरक्षेचे प्रमाणपत्र न घेणार्‍या रुग्णालयांवर प्रशासन का कारवाई करत नाही ?

मुंबई – भंडारा येथील रुग्णालयात आग लागून १० लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. मुंबईतही शेकडो रुग्णालये अशी आहेत, ज्यांनी अग्नीशमन दलाच्या नियमांची कार्यवाही केलेली नाही. यामुळे या रुग्णालयांत कधीही आग लागून भंडारासारखी परिस्थिती उद्भवू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, जी रुग्णालये अग्नीशमन दलाच्या नियमांचे पालन करत नाहीत, त्यांच्या विरोधात गुन्हे नोंद करण्यासाठी, ती बंद करण्यासाठी महापालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि अग्नीशमन दल पुढे येत नसल्याचे समोर आले आहे.

(रुग्णालयात आगीची घटना होऊन जीवित आणि वित्त हानी झाल्यानंतर प्रशासन झोपतून जागे होते. त्या वेळी जीवित आणि वित्त हानी पुष्कळ प्रमाणात झालेली असते. त्यामुळे प्रशासनाने सर्व रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ योग्य वेळेत पूर्ण करून घेणे आवश्यक आहे. जे फायर ऑडिट करणार नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करायला हवी. – संपादक)

१. भंडारा येथील घटनेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व रुग्णालयांचे ‘फायर ऑडिट’ करण्याचे आदेश दिले आहेत.

२. मुंबईत एकूण १ सहस्र ३१९ रुग्णालये असून त्यांपैकी ६० रुग्णालये एम्. पूर्व विभागात चालू आहेत. त्यात ३६ अनधिकृत असून २४ कायदेशीर आहेत, अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली शकील अहमद यांना देण्यात आली आहे.

३. बहुतांश रुग्णालये आणि प्रसूतीगृहे ही इमारतींमध्ये आहेत. त्यात ‘चेंज ऑफ युजर’ होत नसल्याने या रुग्णालयांना अग्नीशमन दलाकडून एन्.ओ.सी मिळत नाही.

४. या रुग्णालयांवर कारवाई करावी म्हणून महापालिकेकडे पत्रव्यवहार केल्यावर महापालिकेने पोलिसांना पत्र दिले. त्यावर पोलिसांनी महापालिकेला तक्रार नोंद करण्यासाठी यावे म्हणून कळवले आहे; मात्र महापालिकेच्या आरोग्य विभागाने अशी तक्रार नोंदवलेली नाही. यामुळे रुग्णालयांवर कारवाई झालेली नाही, असे अहमद यांनी सांगितले.

५. ज्यांच्याकडे प्रमाणपत्र नाही त्यांच्यावर कारवाई केली जाते, असे अग्नीशामक दलाच्या वतीने सांगितले जाते.

६. मुंबईच्या महापौर सौ. किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, यापूर्वी देहली येथे आगीची घटना घडली तेव्हाच मुंबईतील सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिटचे आदेश दिले होते. भंडारा येथील घटना दुर्दैवी आहे. मुंबईतील सर्व रुग्णालये आणि प्रशासकीय अधिकारी यांनी काळजी घेतली पाहिजे. अग्नीशमन विभागानेही मुंबईत अशी घटना घडणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. सर्व रुग्णालयांची यंत्रणा योग्य ठेवा, असा आदेश दिला आहे.