परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या चैतन्यमय पादुकांचे वाराणसी सेवाकेंद्रात आगमन झाल्यावर साधकांना आलेल्या अनुभूती 

‘९.३.२०१९ या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हस्तस्पर्श केलेल्या चैतन्यमय गुरुपादुकांचे आगमन झाले. त्या वेळी वाराणसी येथील साधकांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

१. श्री. प्रशांत वैती

सेवाकेंद्रात ‘जणू दिवाळीच आहे’, असे जाणवणे : गुरुपादुका आल्यावर सेवाकेंद्रातील वातावरण चैतन्यमय झाले. सेवाकेंद्रात ‘जणू दिवाळीच आहे’, असे मला जाणवत होते. सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता.

२. श्री. प्रथमेश वाळके

‘साक्षात् परात्पर गुरुदेव आले आहेत’, असे जाणवणे : ‘सेवाकेंद्रात गुरुपादुका येणार आहेत’, हे कळल्यावर मला पुष्कळ आनंद झाला. पू. नीलेश सिंगबाळ पादुका घेऊन सेवाकेंद्रात आल्यावर ‘साक्षात् परात्पर गुरुदेव आले आहेत’ आणि ‘सेवाकेंद्रातील प्रकाशात वाढ झाली आहे’, असे मला जाणवले. सर्व साधकांच्या तोंडवळ्यावर पुष्कळ चैतन्य आणि आनंद जाणवत होता.

३. श्री. शुभम जगताप

अ. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने मला गुरुपादुका घेऊन येत असलेल्या पू. नीलेश सिंगबाळ यांना सेवाकेंद्रात आणण्यासाठी वाहन चालकाची सेवा मिळाली. पू. नीलेशदादा गाडीत बसल्यापासून मी भावावस्था अनुभवत होतो. गाडी चालवत असतांना ‘नर जन्मा येऊनिया भाग्य फळाले, श्रीसाईनाथ आम्ही नयनी पाहिले…।’ हे भजन माझ्या मनात आपोआप चालू झाले.

आ. मी विमानतळावर जात असतांना मार्गात पुष्कळ रहदारी होती; पण गुरुपादुका घेऊन येत असतांना मार्गावरची रहदारी पुष्कळ न्यून झाली होती.

४. कु. देवेन पाटील (वय १७ वर्षे)

अ. श्री गुरुपादुकांचे आगमन होत असतांना मला पुष्कळ शांत वाटून माझे मन निर्विचार झाले होते.

आ. श्री गुरुपादुका ध्यानमंदिरात ठेवल्यानंतर मला परात्पर गुरुमाऊली ‘महाविष्णु’ रूपात, तर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ‘महालक्ष्मी’ आणि श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या ‘भूदेवी’ यांच्या रूपांत दिसल्या.

५. श्रीमती भाग्यश्री आणेकर

अ. पू. नीलेशदादा श्री गुरुपादुका पटलावर ठेवत असतांना मला अनाहतचक्रात वेगळीच स्पंदने जाणवत होती. मला आल्हाददायी असा गारवा जाणवला.

आ. झाकलेल्या पादुकांकडे लक्ष गेल्यावर ‘आत कुणीतरी जिवंत आहे’, असे मला जाणवले. मला माझा देह आनंदी आणि हलका जाणवत होता.

इ. ‘परात्पर गुरुदेव सर्वांना शुभाशीर्वाद देत आहेत. ते सर्व साधकांकडे पहात ध्यानमंदिरात फिरत आहेत’, असे मला जाणवले.

ई. मला कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिराचे दर्शन झाले.

उ. सेवाकेंद्रातील वातावरण दिवाळीप्रमाणे झाले होते. सगळीकडे चैतन्यमय आणि उत्साह वाटत होता. निसर्गही आनंदी झाला होता. हे सगळे अवर्णनीय आहे.’

(११.३.२०१९)

येथे प्रसिद्ध  करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक