वीज खाते दीड लाख थकबाकीदारांच्या विरोधात कृती करणार ! – नीलेश काब्राल, वीजमंत्री

एवढ्या जणांची थकबाकी राहीपर्यंत वीजखाते काय करत होते ? संबंधितांवरही कारवाई व्हायला हवी !

पणजी, १ जानेवारी (वार्ता.) – राज्यात १ लाख ५० सहस्र वीजदेयक थकबाकीदार आहेत. या थकबाकीदारांची वीजजोडणी तोडण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यात येणार आहे, अशी चेतावणी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री नीलेश काब्राल पुढे म्हणाले, ‘‘राज्यातील सुमारे १ लाख ५० सहस्र वीज थकबाकीदारांपैकी १ लाख थकबाकीदारांना खात्याने नोटिसा बजावल्या आहेत. राज्यातील ५ लाख वीजजोडणीधारक नियमितपणे वीजदेयके भरतात.’’

३१ जानेवारीनंतर वीज थकबाकीदारांची नावे सार्वजनिक करणार

वीज थकबाकीदारांसाठीच्या ‘वन टाईम सेटलमेंट’ (ओ.टी.एस्.) योजनेला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. खात्याने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात या योजनेला प्रारंभ केला होता. या योजनेअंतर्गत ‘डिले पेमेंट चार्जिंस’ माफ करण्यात आले आहेत. ३१ जानेवारीनंतर वीज थकबाकीदारांची नावे संकेतस्थळावर टाकण्यात येणार आहेत.’’