कारिवडे (सिंधुदुर्ग) येथील भक्तवत्सल श्री कालिकादेवीचा आज जत्रोत्सव

आदिशक्ती श्री दुर्गादेवीच्या रूपांपैकी एक असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कारिवडे, तालुका सावंतवाडी येथील ग्रामदेवता श्री कालिकादेवीचा जत्रोत्सव प्रतिवर्षी  मार्गशीर्ष कृष्ण पक्ष द्वितीया या दिवशी मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. या वर्षी हा उत्सव १ जानेवारी २०२१ दिवशी साजरा होणार आहे. या निमित्ताने श्री कालिकादेवीच्या देवस्थानचा थोडक्यात परिचय करून घेऊया.

संकलक : श्री. अमोल सावंत, कारिवडे, सावंतवाडी, सिंधुदुर्ग

श्री देव रवळनाथ

देवालय आणि परिसर

​श्री कालिकादेवीचे देवालय हे दक्षिणाभिमुख असून हे देवस्थान श्री कालिका-पावणाई-रवळनाथ या पंचायतनाने नटलेले आहे. देवालयाच्या परिसरात श्री खातये वस, भावई, वेताळ, सातेरी, मल्नाथ, म्हारिंगण आदी देवतांची छोटी छोटी देवालये आहेत.

श्री देवी कालिका

जत्रोत्सवाचे स्वरूप

​जत्रोत्सवाच्या दिवशी सकाळपासून देवीची पूजा-अर्चा, ओटी भरणे, नवस बोलणे आणि फेडणे, असे धार्मिक कार्यक्रम होतात. मध्यरात्री देवीची पालखीतून मिरवणूक काढली जाते. तद्नंतर आरोलकर दशावतारी नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होतो. दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याने जत्रोत्सवाची सांगता होते. या दिवशी दुपारी ब्राह्मण भोजन आणि महाप्रसादही होतो.

श्री देवी पावणाई

वर्षभरातील उत्सव

​वर्षभरात देवालयात नवरात्रोत्सव, दसरा, ‘कोजागरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा’ या कालावधीत देवीचा पालखी उत्सव आणि जागर (कार्तिक मास), माघी पौर्णिमेला भंडारा, होळी उत्सव, गुढीपाडवा, महाशिवरात्र, देसरूड आदी धार्मिक कार्यक्रम होतात. विजयादशमी म्हणजे दसर्‍याच्या दिवशी श्री कालिका आणि श्री पावणाई या देवतांचा कुडीवर संचार होतो आणि त्या जनतेला आशीर्वाद देतात. या वेळी देवतांची लग्ने लावली जातात. कारिवडे गावात ७ दिवसांचा शिमगोत्सव साजरा केला जातो. यामध्ये पहिल्या दिवशी विशेष म्हणजे २९ हात लांबीची आम्रवृक्षाची होळी घातली जाते.

​४ थ्या दिवसापासून ‘हळदवणी’ हा कार्यक्रम होतो. यामध्ये देवतांची निशाणे ढोलताशांच्या गजरात घरोघरी फिरवली जातात. घरोघरी त्यांचे विधीवत स्वागत होते आणि आशीर्वाद ग्रहण केला जातो. ७ व्या दिवशी या शिमगोत्सवाची सांगता होते.

भंडारा

​देवीच्या वार्षिक उत्सवांतील भंडारा हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम प्रतिवर्षी माघी पौर्णिमेला मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी श्री कालिकादेवी श्री देव सिद्ध महापुरुष (समाधीपुरुष) याच्या भेटीसाठी देवालयातून तिच्या लवाजम्यासह पालखी मिरवणुकीने कुडीवर संचारून जाते. श्री सिद्ध-महापुरुषाच्या देवालयात देवतांच्या भेटीचा कार्यक्रम होऊन भंडारा घातला जातो. श्री कालिकादेवी अतिशय जागृत असून देवीच्या तीर्थप्रसादाने आणि अंगार्‍याने शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक व्याधी दूर झाल्याच्या अनुभूती अनेकांनी घेतल्या आहेत. अशा या श्री कालिकामातेची कृपादृष्टी सर्वांवर अखंड राहो, हीच तिच्या चरणी प्रार्थना !

कुलदेवतेच्या उपासनेचे महत्त्व !

शीघ्र ईश्‍वरप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणे आवश्यक असते, त्याच देवतेच्या कुळात ईश्‍वर आपल्याला जन्माला घालतो; म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप प्रतिदिन न्यूनतम १ ते २ घंटे अन् जास्तीत-जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी श्री महालक्ष्मीदेवी असेल, तर ‘श्री महालक्ष्मीदेव्यै नम: ।’ असा नामजप करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा.

​ब्रह्मांडात असलेली सर्व तत्त्वे पिंडात आली की, साधना पूर्ण होते. श्रीविष्णु, शिव आणि श्री गणपति यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या त्या देवतेचे विशिष्ट तत्त्व वाढते; परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्त्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची ३० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचे सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वीतत्त्वाची देवता असल्याने तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील, त्यांनी कुलदेवीचा नामजप करावा.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’)