भक्तगण भक्तीरसात चिंब !
शेवगाव (जिल्हा नगर) – ‘दिगंबरा दिगंबरा… श्रीपाद वल्लभ दिगंबरा’च्या जयघोषात शेवगावच्या वैशंपायन नगरमधील श्री दत्त देवस्थानात दत्त जयंतीचा सोहळा उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतराचे पालन करत सायंकाळी मंगलमय वातावरणात दत्तगुरूंच्या जन्मोत्सवाची पाळण्याची दोरी ओढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी भाविकांचा ओघ चालू होता. आकर्षक विद्युत रोषणाईने मंदिराचा परिसर उजळून निघाला.
येथील दत्तभूमीला योगतज्ञ दादाजी वैशंपायन यांचे आशीर्वाद, तसेच चरणस्पर्श झाल्याने ‘साक्षात्कारी प्रचीती देणारे देवस्थान’ असा या स्थानाचा लौकिक आणि महिमा आहे. दत्त जयंतीच्या पूर्वसंध्येला या पवित्र स्थळी ५१ जोडप्यांकरवी श्री सत्यदत्त पूजाविधी पार पाडला.
दत्त जयंतीला सकाळी संगमरवरी दत्तप्रभूच्या मूर्तीला मंत्रघोषात पंचसूक्त पवमान अभिषेक घालण्यात आला. पाथर्डी येथील श्री. सर्वेश्वरदेवा जोशी यांनी पौरोहित्य केले. त्यानंतर सामूहिक मंत्रपठण झाले. दुपारी भव्यदिव्य पालखी सोहळा संपन्न झाला. सायंकाळी कर्जत येथील दत्त-बालाजी देवस्थानचे महंत दयानंद महाराज कोरेगावकर यांचे कीर्तन झाले. दत्तभक्त योगेश तायडे यांनी श्री दत्तात्रेयांची श्री नारायण स्वरूपात विविध आकर्षक पानाफुलांनी पूजा बांधली. दत्तगुरूंच्या पाळण्याची दोरी ओढल्यानंतर महाआरती झाली. बुंदी प्रसाद वाटपाने उत्सवाची सांगता झाली. गुरुदत्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष अर्जुनराव फडके, सचिव फुलचंद रोकडे यांच्या नेतृत्वाखाली व्यवस्थापन समिती सदस्य, साधक आणि दत्तभक्त यांनी उत्सव यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.