हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘नूतन वर्ष गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी’ ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातून जागृती

पुणे, ३० डिसेंबर (वार्ता.) – भारतीय संस्कृतीचे रक्षण व्हावे, तसेच पाश्चात्त्य संस्कृतीच्या अंधानुकरणामुळे युवा पिढीचे होणारे अध:पतन रोखावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २५ डिसेंबर या दिवशी ‘ऑनलाईन’ कार्यक्रमातून जागृती करण्यात आली. या कार्यक्रमाला धर्मप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमात भोर, शिरवळ, हडपसर, चिंचवड, नाशिक रस्ता येथील १०० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते.

 

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने श्री. नीलेश जोशी यांनी उपस्थित धर्मप्रेमींना ‘३१ डिसेंबरच्या रात्री होणारे अपप्रकार’ आणि ‘त्या तुलनेत हिंदु संस्कृतीनुसार गुढीपाडव्याला नवीन वर्ष साजरे केल्याने होणारे लाभ’ यासंदर्भात माहिती दिली.

सुनील घनवट

हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र अन् छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी ‘हिंदु धर्म अन् संस्कृती यांवर होत असलेले आघात आणि ते आघात रोखण्यासाठी हिंदूंनी धर्माभिमान वाढवण्याची आवश्यकता’ या संदर्भात विविध उदाहरणे सांगून उपस्थित धर्मप्रेमींना मार्गदर्शन केले. त्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी व्हिडिओद्वारे ‘कराटे आणि दंडसाखळीचे प्रकार’, तसेच ३१ डिसेंबरच्या आणि अन्य वेळीही ‘महिलांवर होणार्‍या अत्याचाराचा प्रतिकार करून महिला स्वतःचे रक्षण कसे करू शकतात ?’, याची प्रभावी प्रात्यक्षिके सादर केली. धर्मप्रेमींनीही त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांच्या २४८ व्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमानंतर धर्मप्रेमींनी केलेले वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न आणि यापुढे आपण कशाप्रकारे धर्मकार्यामध्ये सहभागी होऊ शकतो, याविषयी उपस्थित धर्मप्रेमींना माहिती देण्यात आली.

क्षणचित्रे –

१. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी ‘आम्ही हिंदु संस्कृतीच्या रक्षणासाठी आमच्या संपर्कातील अधिकाधिक हिंदूंना नवीन वर्ष ३१ डिसेंबरला साजरे न करता गुढीपाडव्याला साजरे करण्याविषयी जागृत करू, असा निर्धार केला.

२. सियाराम मंदिर वर्गातील धर्मप्रेमी श्री. रवींद्र घुले यांच्या मित्रांनी ३१ डिसेंबरच्या निमित्त एका गडावर ‘ट्रेकिंग’ला जाण्याचे नियोजन केले होते. श्री. रवींद्र घुले यांनी या संदर्भात मित्रांचे प्रबोधन केले. तेव्हा सर्व मित्रांना त्यांनी सांगितलेला विषय पटला आणि त्यांनी ३१ डिसेंबर ऐवजी २८ डिसेंबरला गडावर जाण्याचा निर्णय घेतला.

३. सियाराम मंदिर वर्गातील धर्मप्रेमी श्री. आकाश चव्हाण आणि श्री. सचिन घुले यांनी या कार्यक्रमाला जोडण्यासाठी २० धर्मप्रेमींना दूरभाषवरून निमंत्रण दिले.

४. हडपसर येथील धर्मप्रेमी श्री. दत्तात्रय कुलकर्णी यांनी ९ मंदिर विश्वस्तांना या कार्यक्रमाला जोडण्यास उद्युक्त केले.