कोडोली (जिल्हा कोल्हापूर) येथे अवैध गर्भलिंग चाचणीप्रकरणी आधुनिक वैद्य अरविंद कांबळे यांच्यावर गुन्हा नोंद

तीन वर्षांत दुसर्‍यांदा कारवाई; रुग्णालय सील

यावरून गुन्हे करणार्‍यांना कायद्याचा धाक नाही, हेच दिसून येते.

कोडोली (जिल्हा कोल्हापूर) – येथील मातृसेवा रुग्णालयामध्ये अवैध गर्भलिंग चाचणी होत असल्याचे १६ डिसेंबर या दिवशी उघडकीस आले. या प्रकरणी आधुनिक वैद्य अरविंद सीताराम कांबळे यांच्यावर कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गत ३ वर्षांत याच आधुनिक वैद्यांवर दुसर्‍यांदा ही कारवाई झाली आहे. यानंतर रुग्णालय सील करण्यात आले आहे.

अवैध गर्भलिंग पडताळणी पथकाला कोडोलीच्या मातृसेवा रुग्णालयामध्ये अवैध गर्भलिंग चाचणी होत असल्याची माहिती मिळाली होती. छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकारी वैद्य हर्षदा वेदक, पोलीस निरीक्षक स्नेहा गिरी, महिला कक्ष विभागाच्या पोलीस उपनिरीक्षक विभावरी रेडेकर, अधिवक्त्या गौरी पाटील, पन्हाळा वैद्यकीय अधीक्षक वैद्य सुनंदा गायकवाड यांनी १५ डिसेंबर या दिवशी आपल्याच पथकातील गरोदर महिलेला गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी मातृसेवा रुग्णालयामध्ये पाठवले.


या वेळी आधुनिक वैद्य अरविंद कांबळे यांनी गर्भलिंग निदान चाचणी करण्यासाठी २० सहस्र रुपये भरून घेतले. पडताळणीनंतर स्त्री जातीचे अर्भक असल्याचे सांगून गर्भपात करण्यासाठी २८ सहस्र रुपयांची मागणी केली. याच वेळी आधुनिक वैद्य हर्षदा वेदक यांच्या नेतृत्वाखाली पथकाने धाड टाकली. येथे २ ‘सोनोग्राफी’ची यंत्रे आढळून आली. एक यंत्र वर्ष २०१७ पासून ‘सील’ असून त्यावर न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्याचे समजले.

(एकदा कारवाई होऊनही परत त्याच प्रकारच्या गुन्ह्यात कारवाई होते, याचा अर्थ पूर्वी झालेली कारवाई पुरेशी नव्हती, हेच सिद्ध होते. भारतीय कायद्यातील त्रुटी आणि प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी यांमुळे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संशयित डॉक्टर वारंवार गुन्हा करण्यास धजावतात ! यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारची कारवाई होणे अपेक्षित आहे. त्यामुळे परत गुन्हा करण्यास कुणीही धजावणार नाही ! – संपादक)