महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग ८)

लेखाचा भाग ७ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/431304.html


परात्पर गुरु डॉ. आठवले

१. साधना

१ उ. सत्सेवा आणि इतरांकडून शिकण्याची वृत्ती हे आध्यात्मिक प्रगतीसाठी सर्वोत्तम मार्ग आहेत !

सौ. श्‍वेता क्लार्क : सौ. योगिताताईंमध्ये (सौ. योगिता चेऊलकर) झालेले पालट पाहून पुष्कळ आश्‍चर्य वाटले. त्या कोणतीही सेवा करायला नेहमी उत्सुक असतात आणि त्या दायित्व घेऊन सेवा करतात. काही वेळा त्या स्वतःहून सेवा मागून घेतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : सत्सेवा सर्वांत महत्त्वाची आहे. त्यामुळे आपण आपला अहं विसरतो. आपण मिळालेली सेवा सर्वोत्तम पद्धतीने पूर्ण करण्यावर लक्ष एकाग्र करतो.

सौ. श्‍वेता क्लार्क : सौ. योगिताताईंमध्ये पुष्कळ नम्रता आहे. आम्ही आमच्या सेवेत व्यस्त असतो, तेव्हा त्या स्वतःहून ‘ताई, तुम्हाला काही हवे आहे का ?’, असे विचारतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : सामान्यतः सर्वजण केवळ स्वतःचा विचार करतात. इथे त्या इतरांचा विचार करत आहेत. खूप छान ! त्यांची आध्यात्मिक प्रगती होत आहे.

१ ऊ. साधनेत देव करत असलेले साहाय्य

१ ऊ १. ज्या साधकाची देवाच्या अस्तित्वावर संपूर्ण श्रद्धा असते, त्याला कोणतीही समस्या येत नाही अथवा त्याच्या सर्व समस्या सुटतात !

सौ. योगिता चेऊलकर : मी तुमच्याशी सूक्ष्मातून बोलायला आरंभ केला आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : माझ्यापेक्षा देवाशी बोलणे अधिक चांगले आहे.

सौ. योगिता चेऊलकर : मी स्वतःच्या समस्या देवाला सांगते आणि ‘त्या समस्या सुटतात’, असे मला जाणवते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : देवावर आपली संपूर्ण श्रद्धा असते; म्हणून देव आपल्या सर्व समस्या सोडवतो. आपण काळजी करतो; कारण आपली देवावर श्रद्धा नसते. तुम्ही देवावर दृढ श्रद्धा ठेवता, तेव्हा देव प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो. तुमचे प्रयत्न पाहून मला अतिशय आनंद झाला. तुम्ही इतरांसमोर एक चांगले उदाहरण ठेवले आहे.

१ ऊ २. ज्या जिवामध्ये जीवनात पुढे जाऊन साधना करण्याची क्षमता असते, त्याला देव जीवघेण्या संकटातून वाचवतो !

सौ. श्‍वेता क्लार्क : श्रीमती मामी सुमगरी या मूळच्या जपानच्या असून त्या सध्या मलेशियात रहातात. एकदा त्या ‘मॉल’मध्ये गेल्या होत्या. तेथे अचानक त्यांच्या मनात ‘या ‘मॉल’मधून बाहेर पडावे’, असा तीव्र विचार आला. त्यामुळे त्या तेथून बाहेर पडल्या. काही वेळातच ‘मॉल’मध्ये बॉम्बस्फोट झाला. या प्रसंगात ‘देवानेच माझे रक्षण केले’, याची त्यांना जाणीव झाली. जपानमधील लोकांचा देवावर फारसा विश्‍वास नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : जगभरात कुठेही लोकांचा देवावर विश्‍वास राहिलेला नाही. केवळ जपानमध्येच नाही, तर सगळेच लोक देवाला विसरले आहेत. ‘लोकांना देवाच्या अस्तित्वाची जाणीव करून देणे’, हे आपले दायित्व आहे. आपल्याला अध्यात्मशास्त्र ठाऊक असल्याने आपण साधना करत आहोत. तुम्ही साधनेला आरंभ करण्यापूर्वी साधना समजून घ्या. ‘अध्यात्मात प्रगती कशी करायची ?’, याविषयी लोकांना मार्गदर्शन करणे, हीच आपली साधना आहे. देवाने तुम्हाला का वाचवले ? तुम्ही सुरक्षितपणे ‘मॉल’च्या बाहेर पडलात. हा प्रसंग का घडला असावा ? विज्ञानात आपण नेहमी कोणत्याही घटनेमागचे कारण आणि त्याचा परिणाम यांचा अभ्यास करतो. ‘तुम्ही सुरक्षित राहिलात’, हा परिणाम आहे. देवाने तुम्हाला ‘मॉल’मधून बाहेर पडण्याचा विचार देण्यामागे काय कारण आहे ? तुम्ही तुमच्या क्षेत्रात जसा विचार करता, तसा अध्यात्मात करून चालत नाही. एखाद्या जिवात अध्यात्मात प्रगती करण्याची क्षमता असेल, तर अशा जीवघेण्या प्रसंगातून देवच त्या जिवाला वाचवतो आणि त्याची काळजी घेतो. या प्रसंगावरून तुमच्यात आध्यात्मिक प्रगती करण्याची चांगली क्षमता आहे, हे लक्षात येते. तुम्ही प्रयत्न करा. तुमची जलद आध्यात्मिक प्रगती होईल.

(क्रमशः)


लेखाचा भाग ९ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/431934.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक