महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.    

(भाग ९)

लेखाचा भाग ८ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/431600.html


१. साधना

१ ए. देव साहाय्याला येतो, तेव्हा त्याचे आभार मानायचे नसतात; कारण देव हा आभाराच्या पलीकडे आहे !

श्रीमती मामी सुमगरी : मी गेले काही दिवस गोव्यातील आश्रमात रहात आहे. येथील प्रत्येक जण नेहमी हसतमुख असतो. साधकांचे ते हास्य पाहून मला त्यांच्याविषयी आपलेपणा वाटतो आणि आनंदही होतो. येथे मला पुष्कळ छान वाटते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हे वातावरण तुम्हाला तुमचे शहर आणि देश येथे निर्माण करायचे आहे. येथे उपस्थित असलेले ‘एस्.एस्.आर्.एफ्.’चे साधक स्वतःच्या देशात असे वातावरण सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला त्यांना काही प्रश्‍न विचारायचे आहेत का ?

श्रीमती मामी सुमगरी : मला केवळ आभार मानायचे आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : देव साहाय्याला येतो, तेव्हा त्याचे आभार मानायचे नसतात. देव हा आभाराच्या पलीकडे आहे. जी व्यक्ती परकी आहे किंवा दूरची आहे, तिचे आपण आभार मानतो. देव आपल्या जवळचा आहे. आपण त्याचेच आहोत. त्यामुळे त्याचे आभार मानायची आवश्यकता काय ? आपण देवाशी एकरूप झालो, तर आपण स्वतःचेच आभार मानणार का ? देव तुमच्या जवळ येऊन तुम्हाला साहाय्य करत आहे. याचा अर्थ तुम्ही देवाचाच एक अंश झाला आहात. देव सोडून इतरांचे आभार माना. आपल्याला देव भेटतो, तेव्हा आपले मन आणि बुद्धी कार्यरत नसतात. आपण आनंदावस्थेत असतो आणि या स्थितीत शब्द नसून सर्व शब्दांच्या पलीकडचे असते. हीच स्थिती तुम्ही अनुभवत आहात.

१ ऐ. ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत साधनेच्या प्रयत्नांमध्ये समाधान मानू नका !

सौ. श्‍वेता क्लार्क : सौ. शरण्या देसाई यांचे १० मासांचे बाळ आईकडे ठेवून या ५ दिवसांच्या कार्यशाळेला आल्या आहेत. त्यांच्यात साधनेची पुष्कळ तळमळ आहे. त्यांनी कार्यशाळेत चांगला सहभाग घेतला असून या वेळी त्या पुष्कळ उत्साही आणि आनंदी आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : शरण्या, तुम्हाला स्वतःमध्ये काही पालट जाणवतात का ?

सौ. शरण्या देसाई : २ वर्षांपूर्वी मी येथे आले होते, त्या तुलनेत मला माझ्यात पुष्कळ पालट जाणवतो. आता मला शांत वाटत आहे. मला ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळेसाठी आश्रमात येणे अशक्य वाटत होते; पण ‘हे कसे शक्य झाले’, हे माझे मलाच समजले नाही. देवाची कृपा आणि आई-वडिलांचा पाठिंबा यामुळे मी येथे येऊ शकले. सर्वांनी मला येथे येण्यासाठी पुष्कळ पाठिंबा दिला. त्यामुळेच मी कार्यशाळेत येऊन आनंदाची अनुभूती घेऊ शकले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : एखाद्या व्यक्तीमध्ये साधना करण्याची तीव्र तळमळ असते, तेव्हा देव नेहमी त्या व्यक्तीला साहाय्य करतो. ज्या व्यक्तींमध्ये तळमळ अल्प असते, त्या त्याचा दोष देवाला देतात आणि म्हणतात, ‘घरचे मला येण्याची अनुमती देत नाहीत.’ प्रत्यक्षात त्यांच्यात तळमळ नसल्यानेच तसे होत असते.

परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही योग्य मार्गावर आहात. सर्वांनी यांचे उदाहरण लक्षात ठेवा. येथे जे काही सांगितले गेले, ते त्यांनी कृतीत आणले. त्यामुळे त्यांची प्रगती होत आहे. तुम्ही पूर्वीपेक्षा अधिक आनंदी आहात का ?

सौ. शरण्या देसाई : हो परम पूज्य; परंतु गेले वर्षभर साधनेचे अपेक्षित प्रयत्न करण्यात मी न्यून पडले आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : प्रत्येक साधकाला ‘माझे साधनेचे प्रयत्न अल्प पडत आहेत’, असेच वाटले पाहिजे. ज्या क्षणी ‘माझे प्रयत्न चांगले होत आहेत’, असे वाटते, त्या वेळी अहं वाढतो. त्यामुळे साधनेत अधोगती होते. ईश्‍वरप्राप्ती होईपर्यंत ‘माझे त्याच्यापर्यंत जाण्याचे प्रयत्न पुरेसे नाहीत’, असेच वाटायला हवे.

(क्रमशः)

भाग १०. वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/432379.html

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक