महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने आयोजित कार्यशाळेतील जिज्ञासूंना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन

परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टर ‘स्पिरिच्युअल सायन्स रिसर्च फाऊंडेशन’ या संस्थेचे प्रेरणास्रोत आहेत. त्यांनी जगभरात अध्यात्माचा प्रसार करण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया’ची स्थापना केली आहे. या विश्‍वविद्यालयाकडून गोवा, भारत येथील आध्यात्मिक संशोधन केंद्रात ५ दिवसांच्या आध्यात्मिक कार्यशाळा आयोजित करण्यात येतात. या कार्यशाळांचा उद्देश ‘जिज्ञासूंना साधनेच्या प्रायोगिक अंगाविषयी माहिती देऊन त्यांच्या साधनेला गती देणे’, असा आहे. परात्पर गुरु डॉक्टरांनी या कार्यशाळेतील जिज्ञासूंना केलेले मार्गदर्शन पुढे दिले आहे.

(भाग ७)

लेखाचा भाग ६ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/430988.html


१. साधना

१ ई. साधनेतील अडथळ्यांवर मात करा !

१ ई १. व्यावहारिक कर्तव्ये नामजप करत आणि भावपूर्ण केल्यास ती साधनेतील अडथळा ठरत नाहीत !

सौ. प्रेमा लूझ हेर्नाडेझ : मला ४ मुले आहेत. माझ्यात नियोजनकौशल्य नसल्यामुळे मला साधना करणे कठीण जाते. बसून नामजप करायला मला वेळ मिळत नाही. त्यासाठी मी काय करावे ?

परात्पर गुरु डॉ. आठवले : मुलांप्रती तुमची कर्तव्ये आहेत आणि त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. आध्यात्मिक पातळी ६० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्यानंतर आपण देवाच्या अनुसंधानात राहिल्यामुळे सर्वत्र साक्षीभावाने पाहू शकतो. तेव्हा आपल्याला ठाऊक असते की, ही सर्व माया आहे. केवळ ग्रंथांच्या वाचनाने किंवा तात्त्विक ज्ञानाने हे अनुभवता येणार नाही, तर साधना करून ‘हे जग म्हणजे माया आहे’, हे अनुभवता आले पाहिजे. तोपर्यंत आपण कुटुंबाची काळजी घेणे आवश्यक आहे. ते करत असतांना मात्र आपण नामजपाकडे लक्ष द्यायला हवे, तसेच ‘मुले ही देवाचीच रूपे आहेत’, असा भाव ठेवून त्यांची काळजी घ्यायला हवी. असे केल्याने ती साधनाच होते.

१ ई २. साधनेत प्रगती करून मन आणि बुद्धी यांचा लय करणे, ही जीवनातील चढ-उतार यांच्यावर मात करण्याची गुरुकिल्ली आहे !

श्री. गणपति पुट्टप्पण्णवर : आश्रमातील चैतन्यामुळे येथे साधना करायला उत्साह असतो; परंतु घरी परत गेल्यावर हा उत्साह टिकवून कसा ठेवायचा ? आश्रमातून इतर ठिकाणी गेल्यावर किंवा कधी कधी भौतिक जीवनातील ताणांमुळे साधना करण्याचा उत्साह टिकून रहात नाही.

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधनेत प्रगती झाली की, तेथे सुख-दुःख नसते, तर आनंद असतो. त्यामुळे सुख-दुःखाचा चढ-उतार नसतो. त्यासाठीच साधना वाढवण्याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. एखाद्या संतांना निराशा आल्याचे कुठे ऐकले आहे का ? निराशा मनाला येते. संतांचे मन आणि बुद्धी यांचा लय झालेला असल्यामुळे ते सतत आनंदावस्थेत असतात. ‘मला साधनाच करायची आहे’, असा दृढ निश्‍चय करा. गोवा (भारत) येथील सनातन आश्रमात काही दिवसांसाठी येऊन रहा आणि साधनेविषयी पुढील मार्गदर्शन घ्या.

१ ई ३. प्रश्‍न विचारून किंवा ग्रंथांचे वाचन करून बुद्धीचा अडथळा दूर होत नसून तो साधना करण्यानेच दूर होतो !

सौ. श्‍वेता क्लार्क : कु. मिल्की हिने ‘श्रीमदभगवतगीता’, तसेच इतरही अनेक धार्मिक ग्रंथांचे वाचन केले आहे; मात्र त्यातून तिला साधनेविषयी योग्य मार्गदर्शन मिळाले नाही. तिला सत्‌सेवा करायची आहे. त्यासाठी ती जाण्यापूर्वी तिच्याकडील कौशल्याची सूची देणार आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : शेवटी आपल्याला आपले तन, मन आणि सर्वकाही देवाला अर्पण करायचे असते. प्रत्यक्षात ते सर्व त्याचेच आहे, आपले काहीच नसते. ‘हे माझे घर आहे’, असे आपण म्हणत तेथे रहातो आणि एक दिवस मरून जातो. आपल्या पूर्वी आणि नंतरही ते देवाचेच असते. त्यामुळे सर्वकाही देवाला अर्पण करणेच उत्तम आहे. आपले तन, मन आणि बुद्धी हे सर्व देवाला अर्पण करायचे आहे. त्यासाठी सत्‌सेवा हे माध्यम आहे. अनेक ग्रंथांचे वाचन केल्याने आपल्याला सर्व केवळ बुद्धीने समजते. प्रत्यक्ष साधना करतांना बुद्धीही भगवंताच्या चरणी अर्पण करून आपल्याला बुद्धीचा लय करायचा असतो. त्यानंतरच आपण विश्‍वबुद्धी, म्हणजेच ईश्‍वराच्या बुद्धीशी एकरूप होतो. ग्रंथांचे वाचन केल्याने आपण आपल्या बुद्धीचे समाधान करत असतो; मात्र ‘बुद्धीलय करणे, हे साधनेचे ध्येय आहे’, हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे.

कु. मिल्की अगरवाल : माझ्या मनात येणार्‍या शंका शमवण्यासाठी मी काय करू ? अध्यात्मातील प्रत्येक गोष्टीविषयी माझ्या मनात प्रश्‍न येतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : एखाद्याला पैसे कमवण्यात रस असेल, तर तो साधनेवर कसे लक्ष केंद्रित करू शकेल ? तो त्याच्या साधनेतील अडथळा ठरेल. त्याचप्रमाणे ‘बुद्धी’ हा तुमच्या साधनेतील अडथळा आहे. साधनेतील अडथळ्यांवर मात करणे आवश्यक आहे. ‘बुद्धी हा तुमच्या साधनेतील अडथळा आहे’, हे लक्षात आल्यानंतर तो दूर करण्यासाठी तशी स्वयंसूचना देऊ शकतो. मुंबईहून एक दांपत्य आले होते. पत्नी नामसाधना करत आहे. नामजपामुळे त्यांना आलेल्या अनुभूती त्या मला सांगत होत्या. एवढ्यात त्यांचे यजमान मध्येच बोलले, ‘‘माझ्याकडे नामजपाविषयी ५०० ग्रंथ आहेत. मी ते सर्व वाचले आहेत.’’ त्यांनी प्रत्यक्ष नामजप कधीच केला नाही. त्यामुळे ‘नामजप केल्यामुळे काय अनुभूती येतात’, हे त्यांना कधीच कळणार नाही.

(त्यांची पत्नी प्रत्यक्ष ग्रंथ न वाचता साधना करत असल्यामुळे तिला नामजप करतांना अनुभूती आल्या. अनुभूती म्हणजे ईश्‍वराने त्या योग्य मार्गावर आहेत, याची दिलेली साक्ष आहे.)

कु. मिल्की अगरवाल : काही कालावधीपूर्वी मी निराशेत होते; मात्र नंतरच्या कालावधीत मला स्वतःत झालेले आमूलाग्र पालट लक्षात येऊ लागले. मी नामजप करत असल्यामुळे मला पुष्कळ लाभ झाले आहेत. आता मी पुष्कळ सकारात्मक झाले आहे. देव मला मार्गदर्शन करत असल्यामुळे मला उत्साही वाटत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : हा पालट ग्रंथ वाचल्यामुळे झाला नाही, तर नामजप केल्यामुळे तुला चांगले वाटत आहे.

सद्गुरु सिरियाक वाले : आध्यात्मिकदृष्ट्या ती बाल्यावस्थेत आहे.

परात्पर गुरु डॉ. आठवले : साधनेत थोडी प्रगती झाल्यावर साधक बाल्यावस्थेत जातात. सर्वसाधारण व्यक्ती जन्माला येते, वाढते आणि प्रौढ होते. प्रौढ व्यक्तीत असते, तशी ‘बुद्धी’ लहान मुलांमध्ये नसते. तुम्ही सर्वसाधारण व्यक्तीप्रमाणे प्रौढ होऊ नका, तर तुमची वाढ आध्यात्मिकदृष्ट्या होऊ दे.

(क्रमशः)

लेखाचा भाग ८ वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/431600.html

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक