खासगी आस्थापनांनी कृषी क्षेत्रात हवे तसे काम केले नसल्याची खंत
नवी देहली – कृषी क्षेत्राच्या विकासाच्या आड येणार्या सर्व भिंती आम्ही पाडत आहोत, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते एफ्.आय.सी.सी.आय.च्या ९३ व्या वार्षिक बैठकीचे ‘ऑनलाईन’ पद्धतीने उद्घाटन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते.
पंतप्रधान मोदी म्हणाले की,
१. कृषी क्षेत्र आणि त्याच्याशी निगडीत अन्य क्षेत्र यांमध्ये पायाभूत सुविधा असो किंवा फूड प्रोसेसिंग, साठवण्याची प्रक्रिया, कोल्ड चेन असो, यांमध्ये आम्ही अनेक अडथळे पाहिले. आता यांच्या विकासाच्या आड येणार्या सर्व भिंती हटवल्या जात आहेत. सर्व समस्या दूर केल्या जात आहेत.
२. या सुधारणांनंतर शेतकर्यांना नवे बाजार मिळतील, पर्याय उपलब्ध होतील, तंत्रज्ञानाचे साहाय्य मिळेल. देशातील कोल्ड स्टोरेजच्या सुविधांमध्येही आधुनिकीकरण होईल. यामुळे सर्वाधिक गुंतवणूक ही कृषी क्षेत्रात होईल. याचा सर्वाधिक लाभ शेतकर्यांनाच होणार आहे.
३. शेतीमध्ये जेवढी खासगी क्षेत्राकडून गुंतवणूक झाली पाहिजे होती, तेवढी ती करण्यात आली नाही. खासगी क्षेत्राने कृषी क्षेत्रावर हवे तसे काम केले नाही. कृषी क्षेत्रात जी खासगी आस्थापने चांगले काम करत आहेत त्यांना अधिक चांगले काम करण्याची आवश्यकता आहे.