Bangladesh On 1971 War : (म्हणे) ‘वर्ष १९७१ चे युद्ध आमचा विजय होता, भारत केवळ मित्रदेश होता !’

बांगलादेश विजयदिनानिमित्त पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टवर बांगलादेशाच्या मंत्र्याची संतापजनक आणि कृतघ्नपणा दाखवणारी पोस्ट !

ढाका (बांगलादेश) : १६ डिसेंबर या बांगलादेशाचा निर्मितीचा म्हणजे भारताने पाकिस्तानवर विजय मिळवण्याचा दिवस होता. प्रतिवर्षी हा दिवस भारत आणि बांगलादेश साजरा करत असतात. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या पोस्टमध्ये युद्धात प्राण गमावलेल्या भारतीय सैनिकांच्या बलीदानाचा गौरव केला आणि भारताच्या विजयात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे वर्णन केले होते. त्यावर बांगलादेशातील अंतरिम सरकारचे कायदामंत्री आसिफ नजरूल यांनी पोस्ट करत म्हटले, ‘हे खोटे आहे. वर्ष १९७१ चा विजय हा बांगलादेशाचा विजय आहे, भारत त्यात केवळ मित्र होता.’ नजरूल यांनी त्यांच्या पोस्टसमवेत पंतप्रधान मोदी यांच्या पोस्टचे चित्र (स्क्रीनशॉट) जोडले होते.

पंतप्रधान मोदींनी केलेले ट्विट –

(म्हणे) ‘भारताकडून येणार्‍या या धोक्याविरुद्ध आपण लढा चालू ठेवला पाहिजे !’ – विद्यार्थ्यांचा नेता हसनत अब्दुल्ला

बांगलादेशातील अंतरिम सरकारचे कायदामंत्री आसिफ नजरूल आणि हसनत अब्दुल्ला

नजरूल यांच्याप्रमाणेच बांगलादेशातील विद्यार्थ्यांचा नेता हसनत अब्दुल्ला यानेही टीका केली आहे. त्याने म्हटले की, हे पाकिस्तानपासून बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे युद्ध होते; पण ‘हे युद्ध केवळ भारताचेच होते आणि ते त्याचे यश होते’, असा दावा मोदी यांनी केला. बांगलादेशाच्या अस्तित्वाला मोदी यांच्याकडून आव्हान देण्यात आले आहे. भारताकडून येणार्‍या या धोक्याविरुद्ध आपण लढा चालू ठेवला पाहिजे.

विजयदिनी भारतविरोधी घोषणा !

शेख हसीना यांचे सरकार पडल्यानंतर १६ डिसेंबरला बांगलादेशात पहिला विजय दिवस साजरा करण्यात आला. या वेळी ढाक्याच्या रस्त्यावर आनंदापेक्षा भारताचा विरोध अधिक दिसून येत होता. बांगलादेशात भारतीय सैनिकांच्या स्मरणार्थ बांधले जाणारे आशुपूरचे युद्धस्मारक विजयदिनाच्या दिवशी निर्जन राहिले. ढाक्याच्या रस्त्यावर भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात उघडपणे घोषणाबाजी करण्यात आली.

महंमद युनूस ‘फॅसिस्ट’ (मूलतत्त्ववादी) ! – शेख हसीना

बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांचा आरोप !

बांगलादेशचया विजयदिनाच्या एक दिवस आधी जारी केलेल्या निवेदनात माजी पंतप्रधान शेख हसीना म्हणाल्या की, ‘फॅसिस्ट’ महंमद युनूस यांचे सरकार जनतेप्रती कोणतेही दायित्व पार पाडत नाही. हे सरकार स्वातंत्र्यविरोधी आणि कट्टरतावाद्यांचे समर्थक आहे. देश-विदेशी षड्यंत्राद्वारे देशविरोधी शक्तींनी बेकायदेशीर आणि घटनाविरोधी कृत्ये करून सत्ता कह्यात घेतली. सत्ता बळकावून ते लोककल्याणाची कामे करणे अवघड करत आहे. महागाईने जनता हैराण झाली आहे. भुकेले लोकही कचरापेटींमधून अन्न गोळा करत आहेत. युनूस यांच्या सरकारचा उद्देश स्वातंत्र्यासाठी लढणार्‍यांच्या विरोधात लोकांच्या मनात राग निर्माण करणे आहे. हे सरकार स्वातंत्र्ययुद्धाचा इतिहास आणि आत्मा पुसून टाकण्याचा प्रयत्न करत आहे. हे लोक बांगलादेशी स्वातंत्र्यलढ्याची भावना नष्ट करण्यासाठी बनावट कथा पसरवत आहेत. असे झाले, तर ते बंगालींच्या महान कर्तृत्वाला कलंक लावतील. महंमद युनूस ‘फॅसिस्ट’ सरकारचे नेतृत्व करत आहेत.

संपादकीय भूमिका

अशा कृतघ्न बांगलादेशाला धडा शिकवणे आता क्रमप्राप्त झाले आहे. जर भारत इतके होऊनी गप्प रहात असेल, तर ती आत्मघाती गांधीगिरी होईल आणि त्याचे फळ भविष्यात भारताला भोगावे लागेल !