श्री क्षेत्र बेलगुरु, कर्नाटक येथील स्वामी बिंदू माधव शर्मा यांचा देहत्याग

स्वामी बिंदू माधव शर्मा

होसदूर्ग (चित्रदुर्गा जिल्हा) – श्री क्षेत्र बेलगुरु, कर्नाटक येथील श्री वीरप्रताप अंजनेय देवालयाचे स्वामी बिंदू माधव शर्मा (वय ७७ वर्षे) यांनी २७ नोव्हेंबर  २०२० या दिवशी सकाळी देहत्याग केला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना बेंगळुरूच्या खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले; परंतु सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे देहावसान होऊन अंजनेयाच्या चरणी ते लीन झाले. त्यांच्यावर २८ नोव्हेंबरला बेलगुरु येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

स्वामी बिंदू माधव शर्मा हे कवी, नाटककारही होते, तसेच त्यांनी अनेक ग्रंथ आणि कविता लेखन केले आहे. कर्नाटकातील विजयनगरच्या शासनकाळात बांधलेल्या श्री मारुति मंदिराचा त्यांनी जीर्णोद्धार केला होता. त्यांनी कोटी रुद्रयागही केला होता.

स्वामींनी परात्पर गुरु डॉ. आठवले, हिंदु राष्ट्र आणि सनातन यांच्याविषयी सांगितलेली सूत्रे

‘३.१०.२०१९ या दिवशी रामनाथी, गोवा येथील सनातनचे साधक श्री. राम होनप, कर्नाटक येथील श्री. प्रभाकर पडियार आणि अन्य साधक यांनी श्री क्षेत्र बेलगुरु येथील मठात जाऊन स्वामी बिंदू माधव शर्मा यांचे दर्शन अन् आशीर्वाद घेतले होते. स्वामी हे हनुमानाचे भक्त असून त्यांना अष्टसिद्धी प्राप्त झालेल्या आहेत. स्वामींना नाथ संप्रदायाची तीन सहस्त्र वर्षांची परंपरा आहे. स्वामींना सूक्ष्मातील पुष्कळ ज्ञान आहे. साधकांनी घेतलेल्या भेटीच्या वेळी त्यांनी सूक्ष्म ज्ञानाद्वारे परात्पर गुरु डॉ. आठवले, हिंदु राष्ट्र आणि सनातन संस्था यांच्याविषयी पुढील मार्गदर्शन केले.

१. परात्पर गुरु डॉ. आठवले

परात्पर गुरु डॉक्टरांच्या महामृत्यूयोगाविषयी सांगितल्यावर स्वामी म्हणाले, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांना काही होणार नाही. त्यांना अजून पुष्कळ आध्यात्मिक कार्य करायचे आहे. ते हिंदु धर्माच्या उद्धाराचे कार्य करत आहेत. ते महान चक्रवर्ती आहेत आणि त्यांच्या मुखात रुद्र आहे.’’

२. हिंदु राष्ट्राची स्थापना

अ. काही वर्षांनी जगभरात केवळ हिंदु धर्म राहील.

आ. भारतात वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होईल.

इ. हिंदु धर्माची सर्वत्र स्थापना होण्यासाठी संत तपस्या करत आहेत. हिंदु धर्माची स्थापना परत होणार आहे. हे सर्व भगवंताचेच नियोजन आहे.

३. सनातन संस्था

अ. कन्नड भाषेतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ पाहून स्वामींनी, ‘‘सनातन संस्थेचे कार्य जगभरात होईल’’, असा आशीर्वाद दिला.

आ. सनातनच्या साहाय्याला मी मारुतीला पाठवीन.

इ. सनातन संस्थेवर हनुमान प्रसन्न आहे.

ई. मी सनातन संस्थेला सर्व आशीर्वाद दिले आहेत.’

– श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२०)

स्वामी बिंदू माधव शर्मा यांच्या मठात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी सादर केलेली गायनसेवा

‘९.१२.२०१९ या दिवशी श्री क्षेत्र बेलगुरु, कर्नाटक येथील स्वामी बिंदू माधव शर्मा यांच्या मठात ‘महाब्रह्म रथोत्सवा’निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या साधकांनी गायनसेवा सादर केली होती. या कार्यक्रमात सौ. अनघा जोशी यांनी भक्तीगीते आणि ठाणे येथील श्री. प्रदीप चिटणीस यांनी शास्त्रीय गायन सादर केले होते. या वेळी स्वामी बिंदू माधव शर्मा यांनी त्यांच्या भक्तांच्या मार्फत ‘हनुमंताला तुमचे गायन आवडले. तुमचे गायन सुंदर झाले. तुमचे उत्तर हिंदुस्थानी संगीत ऐकतांना ‘मी ध्वनीफीत (कॅसेट) ऐकत आहे’, असे मला वाटले’, असा निरोप पाठवला. त्यांनी त्यांच्या भक्तांच्या वतीने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, गायन आणि वादन करणार्‍या साधकांचा शाल अन् फळे देऊन सत्कार केला होता.’

– सौ. अनघा जोशी, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा. (३०.१२.२०१९)