हसनपूर (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरातील श्री महाकालीदेवीच्या मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड

कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा घटना घडणे हिंदूंना अपेक्षित नाही !

हसनपूर (कर्नाटक) – येथील डोड्डागडावल्ली चतुशकुता मंदिरातील श्री महाकालीदेवीची मूर्ती अज्ञातांकडून तोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हे मंदिर वर्ष १११३ मध्ये होयसल वंशातील राजा विष्णुवर्धन याच्या शासनकाळात बांधण्यात आले आहे. येथे श्री महालक्ष्मीचेही विशेष मंदिर आहे आणि श्री महाकालीदेवीची मूर्ती दक्षिण गर्भगृहामध्ये स्थापन करण्यात आली होती. या मंदिराची देखभाल पुरातत्व विभागाकडे आहे. ही घटना २० नोव्हेंबर या दिवशी उघड झाली, जेव्हा भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी गेले होते.

(वरील चित्रे आणि व्हिडीओ प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. वस्तूस्थिती कळावी, या उद्देशाने हे प्रसिद्ध केले आहे. –  संपादक)

१. प्राचीन इतिहास आणि पुरातत्व तज्ञ डॉ. शाल्वपिल अय्यंगार यांनी या घटनेला पुरातत्व विभागाला उत्तरदायी ठरवले आहे. ते म्हणाले की, प्राचीन मूर्तीची तोडफोड होणे, ही मोठी हानी आहे. सरकारने उत्तरदायींना कठोर शिक्षा केली पाहिजे. पुरातत्व विभागाने यावर उत्तर दिले पाहिजे.

२. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवि यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांकडे या घटनेची चौकशी करण्यासाठी विशेष पथक स्थापन करण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली.