सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांपेक्षा धर्मशिक्षण, धर्मपालन अन् साधना यांच्या बळावरच हिंदु राष्ट्राची निर्मिती होईल !

१. समाजातील तरुण वर्गाला ‘हिंदु राष्ट्र-निर्मितीसाठी सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांची आवश्यकता आहे’, असे वाटणे

‘समाजात तरुणांमध्ये हिंदु राष्ट्र-निर्मितीविषयी चर्चा होते. तेव्हा बहुतांश जण म्हणतात, ‘‘राजकारणात जायला हवे. सत्ता असल्यावर ‘हिंदु राष्ट्र’ आणणे सोपे होते’’, तर काही जण म्हणतात, ‘‘आपल्या संघटनेकडे (राजकीय पक्षाकडे) धन असेल, तर कार्य करणे आणि ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करणे सोपे जाते. काही जणांना वाटते, ‘आय.ए.एस्.’ किंवा ‘आय.पी.एस्.’ होऊन प्रशासकीय सेवेत गेलो, तर ‘हिंदु राष्ट्र’ निर्माण करणे सोपे जाईल.’

सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

२. ‘हिंदु धर्मप्रेमींचे योग्य संघटन करणे आणि संतांच्या आशीर्वादाने चळवळ उभारणे’, या गोष्टी हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत !

‘प्रत्यक्षात वर्तमानात ज्या व्यक्ती किंवा संघटना यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार आहेत, ते हे का करू शकत नाहीत ?’, याचे चिंतन कुणीच करत नाही. ‘जे सत्ताप्राप्तीसाठी राजकारणात गेले, ते अद्याप या विचारांच्या आधारे सत्ताही प्राप्त का करू शकले नाहीत ?’, याचाही ते अभ्यास करत नाहीत. ‘हिंदु राष्ट्र आणि त्याच्या निर्मितीसाठी साधना अन् आध्यात्मिक बळ, धर्मशिक्षण देऊन हिंदूंना धर्मशिक्षित करणे, धर्मशिक्षित अन् धर्मावर प्रेम असलेले यांचे योग्य संघटन आणि संतांच्या आशीर्वादाने चळवळ उभारणे’, हे आवश्यक असल्याचे युवकांच्या लक्षात येत नाही. त्यासाठी अनेक बैठकांमध्ये आम्ही या विषयांचा अभ्यास करतो.

३. सत्ता, संपत्ती आणि अधिकार असणारे नेहरू अन् यांतील काहीच नसणारे वाराणसी येथील ‘देवराह बाबा’ यांचा अभ्यास केला असता ‘सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांपेक्षा संतांच्या आध्यात्मिक अधिकाराचा प्रभाव अधिक आहे’, हे लक्षात येणे

देवराह बाबा

बैठकीमध्ये बोलतांना जेव्हा सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांची आवश्यकता यांचे सूत्र येते, तेव्हा आम्ही पुढील व्यक्तींचा अभ्यास करतो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान नेहरू यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार होते अन् वाराणसी येथील ‘देवराह बाबा’ यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार यांपैकी काहीच नव्हते. बैठकीत आम्ही या दोन व्यक्तींची तुलना आणि अभ्यास करण्यास सांगतो. हे दोघेही सध्या जिवंत नाहीत. यांपैकी भारतातील जनता आज कुणाची अधिक आठवण काढते आणि कुणाचा आदर करते ? नेहरूंची फारतर काँग्रेसजन निवडणुकीपुरते किंवा त्यांच्या जन्म आणि मृत्यूदिनी शासकीय कर्मचारी अन् परिवारातील लोक आठवण काढतात. बाकी सर्व जण त्यांना भारताची दुर्दशा करण्यासाठी दूषणेच देतात, म्हणजेच त्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार होते; मात्र वरील अपवाद सोडल्यास त्यांचे कुणीच अनुकरण किंवा सन्मान करत नाहीत.

दुसरीकडे ‘देवराह बाबां’कडे सत्ता, संपत्ती आणि अधिकार नसतांनाही ते हयात असतांना अनेक लोक त्यांच्याकडे स्वतःच्या अडचणी सोडवण्यासाठी अन् आनंद मिळवण्यासाठी जात असत. राजकारणी लोकांचाही त्यात सहभाग असायचा. त्यांच्या देहत्यागानंतर प्रतिदिन ४ – ५ सहस्र आणि पर्वकाळात प्रतिदिन सत्ता, संपत्ती अन् अधिकार असलेले लक्षावधी भक्त, तसेच प्रशासकीय अधिकारी तेथे येतात. हे संतांच्या आध्यात्मिक अधिकाराचे महत्त्व आहे.

‘हिंदु राष्ट्र’ हे धर्मशिक्षण, धर्मपालन आणि साधना या बळावरच स्थापन होणार असल्याने त्यासाठी सत्ता, संपत्ती अन् अधिकार यांपेक्षा संत आणि गुरु अशा आध्यात्मिक अधिकारी जनांच्या मार्गदर्शनानुसार कार्य करणार्‍या त्यागी, निःस्वार्थी साधक, राष्ट्र्रप्रेमी आणि धर्मप्रेमी जिवांची आवश्यकता आहे’, हे सांगितल्यानंतर युवकांनाही त्याचे महत्त्व लक्षात आले.’

– (सद्गुरु) डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती.