मोक्षप्राप्तीसाठी मनुष्यदेह सुदृढ करणे, हीच आयुर्वेदाची धारणा !

धर्मार्थकाममोक्ष यांचे साधन ‘सुदृढ देह’ हे असल्यामुळे आरोग्य उत्तम असेल, तरच मानवी जीवनाचे सार्थक होईल. म्हणजे ऐहिक सुखाचे सगळे सोहळे भोगत (कर्मयोगात आयुष्य व्यतीत करणे) ‘मानवाला मोक्ष मिळावा’, हेच धर्माचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी ईश्‍वराने आपल्या उत्पत्तीपूर्वी आपली वाणी प्रगट केली. त्यालाच ‘वेद’ असे म्हणतात; म्हणून मनुष्य जरी १०० वर्षे जगला नाही, तरी तो देहाने म्हातारा न होता, केवळ वयाने म्हातारा झाला, तरच हे उद्दिष्ट साध्य होईल. त्याच्यासाठी आयुर्वेद सांगितला आहे. रोग झाला, तरच वापरण्यासाठी औषधे असावीत, अशी आयुर्वेदाची धारणा आहे. औषधासाठी रोग नाहीत. तो वेदांचा पूर्वज असल्याने ती ईश्‍वरीच वाणी आहे.

धर्माचरणाने सर्व मानवदेह निरोगी होऊन विश्‍वशांती होऊ शकणे : यासाठी ‘अधर्म एव मूलं सर्वरोगाणाम् ।’ म्हणजे ‘अधर्म हेच सगळ्या रोगांचे मूळ कारण आहे’, असे सांगितले आहे. अर्थात निरोगी होण्यासाठी आपण दिवसेंदिवस अधिकाधिक धर्माचारी होण्याची आवश्यकता आहे.

– प.पू. काणे महाराज, नारायणगाव, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. (वर्ष १९९१)