
नवी देहली – स्वतःच्या मुलांना उत्तमोत्तम शैक्षणिक सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बरेच भारतीय अमेरिकेत स्थायीक होतांना दिसत आहेत. सध्या असे चित्र असले, तरी मूळ अमेरिकी असलेल्या लोकांना मात्र भारताचे आकर्षण आहे. त्यांतलीच एक आहे क्रिस्टेन. क्रिस्टेन काही वर्षांपूर्वी देहलीला आल्या आणि त्या भारताच्या प्रेमातच पडल्या. आता त्यांना मुले झाली असली, तरी त्यांना अमेरिकेत घेऊन जायचे नाही. त्यांना वाटते की, त्यांच्या मुलांचे बालपण भारतातच गेले पाहिजे. याविषयी त्यांनी सामाजिक माध्यमावर पोस्ट प्रसारित केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, त्यांची मुले भारतात खर्या अर्थाने बालपणाचा आनंद घेत आहेत. येथे अशा काही गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला अमेरिकेत मिळू शकत नाहीत.
१. क्रिस्टेन यांच्या मते भारतात संस्कृती, भाषा आणि परंपरा याविषयी पुष्कळ वैविध्य आहे. मुलांना लहानपणीच हे सगळे अनुभवायला मिळाल्यामुळे वेगवेगळ्या संस्कृती, परंपरा समजून घ्यायला, त्यांचा आदर करायला आणि त्या स्वीकारायला ते शिकत आहेत.
२. भारतात विविध भाषा बोलल्या जातात. माझ्या मुलांना हिंदी येते आणि इतरही अनेक भाषा त्यांच्या कानावर पडतात. यामुळे त्याचे संवाद कौशल्य, आकलन क्षमता वाढते. याचा त्यांना भविष्यात नक्कीच उपयोग होईल.
३. येथे राहिल्यामुळे त्यांना जगाकडे बघण्याचा एक नवा आणि विस्तृत दृष्टीकोन मिळत आहे. येथील स्थानिक अडचणींपासून ते जागतिक दर्जाच्या प्रश्नांपर्यंत अनेक गोष्टींचे अनुभव त्यांना मिळतात.
४. भारतातील कुटुंबव्यवस्था पाहून मुलांना ‘कुटुंब म्हणजे काय ?’, ते कळते. त्यांचे कुटुंबातील सदस्यांशी असणारे भावनिक नाते आणखी घट्ट होते.
५. भारतात आर्थिक स्तरावर पुष्कळ भिन्नता दिसून येते. त्यामुळे मुले आपोआपच साधी रहाणी, पैशांची किंमत करणे, आपल्याला जे मिळाले आहे त्याविषयी कृतज्ञ रहाणे, या गोष्टी शिकतात.
View this post on Instagram
संपादकीय भूमिकाकुठे मुलांचे बालपण समृद्ध व्हावे; म्हणून त्यांना भारतात वाढवण्याचा निर्णय घेणारी अमेरिकी महिला, तर कुठे मुलांच्या उज्ज्वल भवितव्याच्या नावाखाली त्यांना अमेरिकेत वाढवण्याचा निर्णय घेणारे भारतीय पालक ! |