अधिक मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व (२७ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर २०२०)

साप्ताहिक शास्त्रार्थ

‘१८.९.२०२० या दिवसापासून अधिक आश्‍विन मासाला आरंभ झाला आहे. अधिक मासापासून सर्वांना हिंंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

सौ. प्राजक्ता जोशी

१. हिंदु धर्मानुसार ‘शार्वरी’ नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४२, दक्षिणायन, शरदऋतू, अधिक आश्‍विन मास चालू आहे.

(संदर्भ : दाते पंचांग)

२. शास्त्रार्थ

२ अ. अधिक मास : अधिक मासाविषयी विस्तृत माहिती ‘https://www.sanatan.org/mr/a/6627.html’ या लिंकवर उपलब्ध आहे. अधिक मासाला ‘पुरुषोत्तम मास’ म्हणतात. या मासात अधिकाधिक नामजप, दान आणि पुण्यकर्मे करावीत. याचे फळ पुढील अधिक मासापर्यंत प्राप्त होते.

२ आ. कमला एकादशी : हिंदु पंचांगाप्रमाणे मराठी मासात शुक्ल आणि कृष्ण पक्षात प्रत्येकी एक एकादशी तिथी येते. याप्रमाणे चैत्र ते फाल्गुन या मराठी मासांत एकूण २४ एकादशी तिथी येतात. या प्रत्येक एकादशीला स्वतंत्र नाव दिलेले आहे. याप्रमाणे अधिक मासातील दोन्ही एकादशींना ‘कमला एकादशी’ हे नाव आहे. यांनाच ‘पद्मिनी एकादशी’ असेही म्हणतात. अधिक मासातील एकादशीला भगवान श्री विष्णुपूजनाचे महत्त्व अधिक आहे.

२ इ. गजगौरीव्रत (हादगा-भोंडला) : आश्‍विन मासात सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करतो. त्या दिवसापासून गजगौरीव्रताला आरंभ होतो. या व्रतामध्ये देवी गजगौरीचे पूजन केले जाते. या दिवशी देवी स्तोत्र, देवीकवच, अर्गला स्तोत्र, कनक स्तोत्र आदी देवी स्तोत्रांचे वाचन करतात. ‘यामुळे समृद्धी प्राप्त होते’, असे म्हटले जाते. हादगा-भोंडला हा पश्‍चिम महाराष्ट्रात आणि कोकणात विशेष प्रचलित आहे. यामध्ये स्त्रिया गाणी म्हणत सामूहिक नृत्य करतात.

२ ई. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. घबाड मुहूर्तावर कार्य करण्यास आरंभ केला, तर ते कार्य सफल होऊन मोठ्या प्रमाणात लाभ होतो. अकस्मात् एखादा मोठा लाभ झाल्यास ‘हाती घबाड लागले’, असा वाक्प्रचार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य नक्षत्रापासून चंद्र नक्षत्रापर्यंत मोजल्यावर जी संख्या येते, त्या संख्येला तिप्पट करून येणार्‍या अंकात शुक्ल प्रतिपदेपासूनची तिथी मिळवावी. येणार्‍या बेरजेला ७ या संख्येने भागल्यावर बाकी ३ आली, तर ‘त्या दिवशी घबाड मुहूर्त आहे’, असे समजतात.

उदा. सूर्य नक्षत्र : हस्त

चंद्र नक्षत्र : धनिष्ठा

तिथी : शुक्ल पक्ष द्वादशी

‘हस्त’ या सूर्य नक्षत्रापासून ‘धनिष्ठा’ हे चंद्र नक्षत्र ११ वे आहे.

११ × ३ = ३३ यामध्ये शुक्ल द्वादशी तिथी म्हणजे १२ वी तिथी मिळवल्यावर बेरीज ३३ + १२ = ४५ येते.

४५ या संख्येला ७ ने भागल्यावर बाकी ३ येते.

२८.९.२०२० या रात्री ८.५९ पर्यंत शुक्ल द्वादशी तिथी संपेपर्यंत घबाड मुहूर्त आहे.

२ उ. भौमप्रदोष : प्रत्येक मासातील शुक्ल आणि कृष्ण त्रयोदशीला ‘प्रदोष’ असे म्हणतात. मंगळवारी येणार्‍या प्रदोष तिथीला ‘भौमप्रदोष’ म्हणतात. आर्थिक अडचणी नष्ट होण्यासाठी ‘भौमप्रदोष’ हे व्रत करतात. प्रदोष या व्रताची देवता ‘शिव’ आहे. गतजन्मी केलेल्या पापामुळे लागलेल्या विविध प्रकारच्या दोषांचे निवारण करण्यासाठी, तसेच भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी सायंकाळी हे व्रत करतात. प्रदोष हे व्रत केल्यामुळे आधिभौतिक, आधिदैविक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन आनंद प्राप्त होतो.

२ ऊ. अमृत योग : अमृत योगावर कोणतेही शुभ कार्य केल्यास यश प्राप्त होते. २.१०.२०२० या दिवशी हा योग अहोरात्र म्हणजे पूर्ण दिवस-रात्र आहे.’

– सौ. प्राजक्ता जोशी, ज्योतिष फलित विशारद, वास्तु विशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाईड डाऊजर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्‍लेषण शास्त्र विशारद, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, फोंडा, गोवा. (२१.९.२०२०)


सर्वत्रच्या अर्पणदात्यांना अन्नदान करण्याची सुसंधी !

श्री अन्नपूर्णा देवी

अधिक मासाच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना अन्नदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा ! याविषयी अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !

https://www.sanatan.org/mr/a/43444.html