कोरोनारूपी असुराचा समूळ नायनाट करण्यासाठी रत्नागिरीत कालभैरवाला गार्‍हाणे

सर्वत्रच देवाला श्रद्धेने गार्‍हाणे घातल्यास कोरोना विषाणूंच्या विरोधात प्रतिकारक्षमता वाढवण्यास आध्यात्मिक बळ मिळेल !

रत्नागिरी – कोरोना संकटातून संपूर्ण रत्नागिरीसह तमाम जनतेला मुक्त करावे. कोरोना विषाणूची बाधा कोणालाही होऊ नये आणि रत्नागिरीतल्या नागरिकांना कायद्याच्या शिस्तीचे पालन करण्याची सबुद्धी प्राप्त होवो. तसेच सर्व भक्तांवर तुझी कृपा अखंड राहू दे. अशी प्रार्थना रत्नागिरीच्या रखवालदाराला म्हणजेच श्री देव भैरीला करण्यात आली आहे.

गार्‍हाणे घालतांना भैरी बुवाचे पुजारी देवाला म्हणाले, ‘विश्‍व ..सजीव..ही सृष्टी..तुझ्याकृपेने निर्माण झाली आहे. तू त्याचा पालनकर्ता, रक्षणकर्ता, तुझी रूपे अनेक, तुझी नावे अनेक, चराचरांत तुझेच अस्तित्व आहे, आमच्यासाठी तू आमच्या बारा वाड्यांचा, समस्त रत्नागिरीकरांचे अढळ श्रद्धास्थान आहेस. श्री देव काळभैरव (भैरी ) देवा आम्हा लेकरांकडून जी काय चूक, भूल झाली असेल, तुझी सेवा करण्यात कमी पडलो असू, तर आम्हा सर्वांना क्षमा कर, संपूर्ण जगभरात फैलाव झालेल्या या विषाणू कोरोनासारख्या भयंकर संकटातून तूच वाचवू शकतोस, तूच तारू शकतोस. आज आम्ही तुझी बालके म्हणून सर्वजण तुझ्याचरणी नतमस्तक होऊन मनोभावे गार्‍हाणे घालत आहोत.

श्री भैरी देवा, तुझ्या शक्तीने कोरोनारूपी असुराचा समूळ नायनाट होऊ दे. अनेक समस्यांनी घेरलेल्या या अशुद्ध वातावरणात पुन्हा एकदा मोकळा श्‍वास घेता येऊ दे आणि नव्या चैतन्याने तुझ्या कीर्तीचा गजर आसमंतात घुमू दे. देवा हे एकच मागणे आहे. तुझ्यावर  आमचा पूर्णपणे विश्‍वास आहे की, तू आम्हा सर्वांना या संकटांतून सुखरूप बाहेर काढशील.’’