सोलापूर जिल्ह्यातील खासगी दवाखाने चालू ठेवणे बंधनकारक ! – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

सोलापूर, २६ मार्च – जिल्ह्यात खासगी डॉक्टरांनी दवाखाने चालू ठेवणे बंधनकारक आहे, तसेच ‘अन्नधान्य आणि भाजीपाला यांचा साठा मुबलक असल्याने एकाच वेळी गर्दी करू नका’, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले. खासगी डॉक्टर दवाखाने बंद करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत.

संचारबंदी असली, तरी अन्नधान्य आणि भाजीपाला यांच्या विक्रीला कोणतीही बंदी नाही. रस्त्यावर उतरल्याने कोरोनाची बाधा होण्याची शक्यता बळावत असल्याने आवश्यक वेळीच लोकांनी खरेदीसाठी यावे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.

सोलापूर जिल्ह्यात येणार्‍या सहस्रो प्रवाशांची होत आहे पडताळणी

सोलापूर जिल्ह्यामध्ये येणार्‍या आंतरराज्याच्या ४ सीमांवर नाकाबंदी करण्यात आली असून ४ सहस्र १११ प्रवाशांची पडताळणी करण्यात आली आहे, तर जिल्ह्यांतर्गत ३ नाके उभारण्यात आले असून त्या ठिकाणी १० सहस्र ९९७ व्यक्तींची पडताळणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाविषयीची जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली माहिती

सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत २१५ व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’ आहेत, त्यातील ७८ व्यक्तींचा कालावधी संपलेला आहे. अद्यापर्यंत १३७ व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’ आहेत. या सर्वांच्या हातावर क्वारंटाईन स्टँम्प लावण्यात आला आहे. ‘इंन्स्टीट्युशन क्वारंटाईन’मध्ये एकूण ५३ व्यक्ती होत्या, त्यातील २७ व्यक्तींचा कालावधी पूर्ण झाला असून अद्याप २६ व्यक्ती ‘इंन्स्टीट्युशन क्वारंटाईन’ आहेत. जिल्ह्यामध्ये २५ व्यक्तींना विलगीकरण कक्षात (‘आयसोलेशन वॉर्ड’) मध्ये ठेवणयात आले होते. त्यातील २२ व्यक्तींचा पडताळणी अहवाल ‘निगेटिव्ह’ आला आहे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.