भिवंडी येथील मशिदीच्या विश्‍वस्तांवर गुन्हे नोंद

भिवंडी, २४ मार्च (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुढील सूचना येईपर्यंत बंद करण्याचे आदेश लागू करण्यात आले आहेत. असे असतांना मशिदीमध्ये नमाजपठणासाठी गर्दी जमल्याने पोलिसांनी कायद्याचे उल्लंघन करणारे येथील आसबीबी मशिदीचे विश्‍वस्त गुलाम अहमद खान, खजिनदार मरगुब हसन अन्सारी आणि अन्य सदस्य यांच्यावर गुन्हे नोंद केले आहेत. २३ मार्चला या मशिदीमधून नमाजपठणासाठी अजान देण्यात आली होती. त्यानंतर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत ५० ते ६० जण मशिदीत नमाजपठणासाठी एकत्र आले होते. पुढील अन्वेषण भिवंडी शहर पोलीस करत आहेत.

डोंगरी (मुंबई) येथील मशिदीत नमाजासाठी गर्दी केल्याप्रकरणी गुन्हा नोंद

मशिदीत मोठ्या संख्येने जमून नागरिकांचा जीव कोण धोक्यात घालते ?, हे वेगळे सांगायला नको ! शासनाचे नियम धुडकावणार्‍यांवर कठोर कारवाईच हवी !

मुंबई – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात संचारबंदी लागू असतांना डोंगरीतील ‘टेमकर स्ट्रीट’ भागातील मशिदीत मोठ्या संख्येने लोक नमाजासाठी जमले होते. यावर साहाय्यक पोलीस आयुक्त अविनाश धर्माधिकारी यांनी जमलेल्यांना बाहेर काढत मशिदीला टाळे ठोकले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

काही भागांत लोकांनी पोलिसांसमवेत हुज्जतही घातली. याचे गांभीर्य लक्षात घेत अविनाश धर्माधिकारी यांनी ‘जे आमचे म्हणणे ऐकत नाहीत, त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंद करण्यात येईल’, अशी चेतावणी दिली. धर्माधिकारी यांनी त्यांच्या भागात फिरून ध्वनीक्षेपकाद्वारे नागरिकांना घरी रहाण्याविषयीच्या सूचना दिल्या. शहरात अनावश्यक कामांसाठी बाहेर पडणार्‍यांना पोलिसांनी चोप दिला.