राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय यावर टीका करण्याच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे !
(टीप : ‘देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ।।’ म्हणजे ‘तुमचे चांगले व्हावे यासाठी मी तुमच्याशी कठीण शब्दात बोलत आहे.’)

या लेखात दिलेली प्रश्नांची उत्तरे केवळ कुणा एका पक्षनेत्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विकास लवांडेंसारख्या पक्षाच्या प्रवक्त्याच्या नावाने फिरणार्या केलेल्या प्रश्नावलींची नसून वारकर्याचे ‘वारकरीपण जागे व्हावे’, यासाठी अन् महाराष्ट्रासह जगभरात पसरलेल्या आमच्या युवा पिढीतील वारकरी, हिंदु धर्मप्रेमी युवकांसाठी धर्मशास्त्र आणि संतवाङ्मय यांवर आधारित उत्तरे आहेत. वारकरी संप्रदाय कुणाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील नाही; पण सर्वसामान्य समाज संभ्रमित होऊ नये, खोट्या अपप्रचाराला कुणी फसू पडू नये; म्हणून हा श्री रुक्मिणी पंढरीरायाच्या कृपाप्रसादाने आणि संतश्रेष्ठ ज्ञानोबा-जगद्गुरु संत तुकोबाराय आदी सकल संतांच्या कृपाशीर्वादाने केलेला हा प्रामाणिक प्रयत्न आहे. २६ एप्रिल या दिवशी काही प्रश्नांची उत्तरे वाचली. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1033827.html
हिंदु धर्माचे संस्थापक कोण ? आणि धर्मग्रंथ कोणता आहे ?

हिंदु धर्म हा अनादी, म्हणजेच सृष्टीच्या आरंभापासून आहे. अर्थातच वारकरी संप्रदायाच्या मान्यतेनुसार ‘जयापासून सकळ महिमंडळ हे झाले’, असा भगवान परमात्माच याचा निर्माता आहे. या परमात्माच्या श्वासातून निर्माण झालेले वेद हे पुढे ऋषिमुनींच्या ध्यानावस्थेतून श्रुतिरूपाने प्रकट झाले. वेद-उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे या प्रस्थानत्रयीवरूनच पुढे वारकरी संप्रदायातील संतांचे वाङ्मय निर्माण झाले आहे. – ह.भ.प. वीर महाराज

७. इतर धर्मांचा आदर करता कि द्वेष करता ?
वारकरी म्हणून आमची सकल जीवमात्रांविषयी ममत्वभावना आहे. जे संतांनी सांगितले, तेच आम्ही करतो. आपण म्हणता म्हणून संप्रदायाला आम्ही निधर्मी म्हणणार नाही. वारकरी संप्रदायाच्या संतांनी कोणत्याही इतर धर्माचा धिक्कार केला नाही. हे अर्धसत्य आहे. गोष्ट अशी की, ‘सर्वधर्मसमभाव’ ही संकल्पनाच वारकरी संप्रदायाला मान्य नाही; मात्र ‘सर्वधर्मममभाव’ मानणारा संप्रदाय आहे. ‘या रे या रे लाहान थोर । याती भलते नारीनर ।।’ (संत तुकाराम महाराज) हे म्हणत असतांना विठ्ठल भक्तीसाठी कुणालाही अडवलेले नाही, तर सर्वांचे स्वागत केले आहे; मात्र याचा अर्थ असा नाही, ‘संत कबीर, मोमीन लतीफ हे मुसलमान विठ्ठल भक्त झाले; म्हणून वारकरी संप्रदाय निधर्मी झाला.’ हा तर्क नव्हे, कुतर्क आहे. उलट संत कबीर मुसलमानांना उद्देशून म्हणतात, ‘मुल्ला होकर बांग पुकारे युं क्या साहिब बहिरा है ।’, (मोठमोठ्याने बांग कशाला देता आपला देव काय बहिरा आहे का ? असा सारांश) हे सांगितले जात नाही. उलट या सर्वांना रामभक्ती-कृष्णभक्ती-विठ्ठलभक्ती आवडल्याने आपल्या मूळ धर्मात ते परत आले आहेत, हे सत्य आहे. दुसरी गोष्ट देव, देश आणि धर्म या विषयांवर संत कधीही तडजोड करत नाहीत अन् तडजोड करणार्यांना ते झापल्याखेरीज रहात नाहीत. आपल्या समोर एवढे देव आणि संतमहात्मे असतांना त्यांच्या पुढे नतमस्तक व्हायचे सोडून दर्गा आणि कबरी यांना देव मानणार्यांना संत तुकाराम महाराज म्हणतात…
संतां नाहीं मान । देव मानी मुसलमान ।। १ ।।
ऐसे पोटाचे मारिले । देवा आशा विटंबिले ।। धृ. ।।
घाली लोटांगण । वंदी नीचाचे चरण ।। २ ।।
तुका म्हणे धर्म । न कळे माजल्याचा भ्रम ।। ३ ।।
आपल्या स्वार्थापोटी संतांऐवजी मुसलमानाला देव मानणार्यांना संत तुकोबाराय म्हणतात, अशा माजलेल्या लोकांना धर्म आणि अधर्म काहीच कळत नाही; कारण ते अज्ञानामध्ये जगत असतात. यापेक्षा आता अजून धर्माविषयी काय स्पष्ट भूमिका हवी ?
‘सर्वांप्रती आमचा ममत्वभाव आहे; पण आमच्या धर्माचे अस्तित्व राखूनच’, हाच संतांचा स्पष्ट संकेत आहे.
८. तुमचा हिंसेवर विश्वास आहे कि अहिंसेवर विश्वास आहे ? साधू कुणाला म्हणतात ?
दया तिचें नांव भूतांचें पाळण ।
अणीक निर्दाळण कंटकांचें ।। – संत तुकाराम महाराज
(अर्थ : सर्व जीवांचे पालन करणे हि दया तसे दुष्टांचे निर्दालन हि दयाच)
होईल तैसें बळ । फजीत करावे ते खळ ।। २ ।।
तुका म्हणे त्यांचें । पाप नाहीं ताडणाचें ।। ३ ।।
(खळ प्रवृत्तीच्या लोकांना चोप देण्याचे पाप लागत नाही.) जगद्गुरु संत तुकोबारायांच्या आज्ञा आहे, तरीही ‘मऊ मेणाहूनि आम्ही विष्णुदास ।’ (तुकाराम गाथा, अभंग ५८६, ओवी १), असे आहोत. प्रत्यक्ष हिंसेच्या घटना संप्रदायात अपवादानेच आढळतात.
९. कीर्तन प्रवचनातून हिंदुत्वनिष्ठ भूमिका मांडणे, हे नारदाच्या गादीवरून संतांच्या विचारांना मान्य आहे का ?
वारकरी कीर्तनकारांनी ‘धर्माचे पालन । करणे पाखंडखंडण ।। हेची आम्हा करणे काम । बीज वाढवावे नाम ॥ तीक्ष्ण उत्तरे । हाती घेऊनी बाण फिरे ॥ नाही भिडभार । तुका म्हणे साना थोर ॥’ या पद्धतीत समाजाला उपदेश करावा, ही पुन्हा संत तुकोबारायांचीच आज्ञा आहे. ती आम्हाला शिरसावंद्य आहे. वारकरी कीर्तनकारांची धर्मजागृतीची भूमिका ही कोणत्याही एका निवडणूक काळापुरती नसून समाजात योग्य आणि अयोग्य निवडण्याचा विवेक निर्माण व्हावा, यासाठीची कायमस्वरूपी प्रक्रिया आहे.
१०. कौरव आणि पांडव यांचा धर्म वेगवेगळा होता कि एकच होता ?
प्रश्नाचा रोख यातून कळतो. इस्लामची स्थापना साधारण १४०० वर्षांपूर्वी, तर ख्रिस्ती पंथाची स्थापना २ सहस्र वर्षांपूर्वी झाली; पण महाभारताचा काळ आधुनिक मान्यतेनुसार ३ सहस्र, तर धार्मिक मान्यतेनुसार ४ सहस्र वर्षांपूर्वी. त्यामुळे त्या वेळी पृथ्वीवर एकमेव वैदिक धर्मच शिल्लक होता. त्यामुळे त्या वेळी पांडवांचा धर्म ‘सत्य’ आणि कौरवांचा धर्म ‘असत्य’ अन् आजही हीच लढाई चालू आहे. सत्य, सनातन, वैदिक आणि आचरण संपन्न धर्माचा असत्य अनाचारी, आक्रांतकारी अशा ‘असत्य’ धर्माविरुद्धच लढाई चालू आहे.
११. राम आणि रावण यांचा धर्म एकच होता कि वेगवेगळा होता ?
रामाचा सत्य विरुद्ध रावणाचा असत्य धर्म !
१२. मंबाजी स्वामीची पार्टी कि संत तुकोबांची पार्टी ? दोन्ही तत्त्वज्ञान आणि विचारसरणी वेगवेगळ्या होत्या अन् आहेत, हे मान्य आहे का ?
वारकरी केवळ माळ घालून होता येत नाही. त्यासाठी ग्रंथ वाचावेत. ग्रंथ वाचले की, मराठी शब्दांची वानवा भासत नाही. पार्टी नव्हे पक्ष किंवा गट अर्थात् मंबाजी असत्य आहेत तुकोबाराय सत्य आहेत
मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढें ।। १ ।।
तेणेंचि पंथें चालोंजातां । न पडे गुंता कोठें कांहीं ।। २ ।। – संत निळोबाराय महाराज
संत ज्ञानोबा, संत तुकोबाराय आदी सकल संत हीच आमची विचारधारा, हाच आमचा पंथ, पक्ष, गट सर्वस्व हेच !
१३. शिव-शाहू-फुले आंबेडकरांचे पुरोगामी आणि समतावादी विचार तुम्हाला पटतात कि नाही ?
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना प्रत्यक्ष संत तुकोबारायांचा उपदेश आहे. त्यामुळे महाराज हे आमचे सर्वस्व आहेत. शाहू, फुले, आंबेडकर या महापुरुषांचे प्रत्यक्ष अनुयायी स्वतः ज्या दिवशी त्यांचे १०० टक्के विचार स्वीकारतील, त्या दिवशी आम्हीसुद्धा निश्चितच प्रेरित होऊ. सध्याच्या घडीला समाजासाठी त्यांनी केलेले अविस्मरणीय योगदान, स्वतःचे झोकून दिलेले आयुष्य, त्यांच्यावर असणारा वारकरी संतांचा प्रभाव यामुळे या सर्व महापुरुषांचा आमच्यावर प्रभाव असून त्यांचे अनेक घेण्यासारखे गुण आम्ही आत्मसात् करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो.
१४. रामदासस्वामींचा वारकरी संप्रदायाशी काहीही संबंध नाही आणि ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु नव्हते, हे मान्य आहे का ?
वारकरी हा जसा हिंदु धर्मातील एक उपासना पंथ आहे, तसा रामदासी संप्रदाय हा रामोपासनेचा थोडीशी उपासनापद्धतीत पालट असणारा एक स्वतंत्र उपासना पंथ आहे. स्वतः समर्थ रामदासस्वामी हे या पंथाचे संस्थापक आहेत. ते पंढरपूरला नित्य दर्शनासाठी येत असत. रामरूपामध्ये सगळीकडे परमात्मा पहाण्याची एकविध वृत्ती असल्याने ‘येथे कां रे उभा श्रीरामा ।’ हा अभंग विठ्ठलास उद्देशून त्यांनी म्हटलेला आहे. वारकरी संप्रदाय ज्या अद्वैत वेदांत तत्त्वज्ञानाची मांडणी करतो, तेच तत्त्वज्ञान रामदासी संप्रदायाचे आहे. केवळ उपासनापद्धत भिन्न आहे.
आता ते छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते का ? त्यांची भेट झाली होती का ? हा इतिहास तज्ञांनी पडताळण्याचा विषय आहे. चाफळची सनदसारखी ऐतिहासिक कागदपत्रे यावर अधिक प्रकाश टाकतात; पण या विषयावर इतिहास अभ्यासक दिवंगत जयसिंगराव पवार यांचा विचार उदात्त वाटतो. ते म्हणतात, ‘समर्थांना विचारल्याविना छत्रपती शिवाजी महाराज काहीच करत नव्हते.’ इतका हा विषय अतिरंजित मांडला आहे, तर बहुजन इतिहास अभ्यासकांकडून समर्थांविषयी अगदी ‘औरंगजेबाचे हेर होते’, या अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिपणी केली आहे. या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. जयसिंगराव म्हणतात, ‘माझ्या दृष्टीने समर्थ रामदासस्वामी यांचे महत्त्व आणि माहात्म्य असे आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांचे हे ‘युगकार्य’ आहे, हे समजलेला हा ‘सत्पुरुष’ आहे.’
आमच्या दृष्टीने हीच भूमिका योग्य आहे. समर्थ समाजाच्या कल्याणासाठी जन्माला आलेले सत्पुरुष होते. त्यांची ही समाजोन्नतीची तळमळ त्यांचे ‘दासबोध’, ‘मनाचे श्लोक’ आणि इतर वाङ्मयातून दिसून येते. केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी संबंध जोडला, तरच समर्थांचे कार्य सिद्ध होते, असे नाही. आमच्या दृष्टीने संतांच्या विभूती । धर्मालागी अवतरती ।। धर्मरक्षणाकारणे । साधू होताती अवतीर्णे ।।
एवढे पुरेसे आहे.
(क्रमशः उद्याच्या दैनिकात)
– श्रीगुरुचरणपदाश्रीत ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, संत साहित्य अभ्यासक, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (२०.४.२०२६)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1034647.html
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?
भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !