देतो तीक्ष्ण उत्तरे । पुढे व्हावयासी बरे ॥

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदाय यावर टीका करण्याच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे !

(‘देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ।।’ म्हणजे ‘तुमचे चांगले व्हावे यासाठी मी तुमच्याशी कठीण शब्दात बोलत आहे.’)

या लेखात दिलेली प्रश्नांची उत्तरे केवळ कुणा एका पक्षनेत्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विकास लवांडेंसारख्या प्रवक्त्याच्या नावाने फिरणार्‍या केलेल्या प्रश्नावलींची नसून वारकर्‍याचे ‘वारकरीपण जागे व्हावे’, यासाठी अन् महाराष्ट्रासह जगभरात पसरलेल्या आमच्या युवा पिढीतील वारकरी, हिंदु धर्मप्रेमी युवकांसाठी धर्मशास्त्र आणि संतवाङ्मय यांवर आधारित उत्तरे आहेत. वारकरी संप्रदाय कुणाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास बांधील नाही; पण खोट्या अपप्रचाराला कुणी फसू पडू नये; म्हणून पंढरीरायाच्या कृपाप्रसादाने अन् संतश्रेष्ठ ज्ञानोबा-जगद्गुरु संत तुकोबारायांच्या कृपाशीर्वादाने केलेला हा प्रयत्न…!

ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

१. ‘ज्ञानोबा, तुकोबांपेक्षा मनु श्रेष्ठ होता’, असे सार्वजनिक विधान करणार्‍या संभाजी भिडेंचा तुम्ही निषेध केला होता का ?

महर्षि मनु यांना संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनीच श्रेष्ठत्व दिलेले आहे.

मग देव म्हणे अगा पंडुसुता । हाचि योगु आम्हीं विवस्वता ।
कथिला परी ते वार्ता । बहुतां दिवसांची ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी १६

अर्थ : मग देव म्हणाले, ‘अरे अर्जुना, हाच निष्काम-कर्मयोग आम्ही विवस्वानाला (सूर्याला) सांगितला; परंतु ती गोष्ट फार दिवसांची आहे.’

मग तेणें विवस्वतें रवी । हे योगस्थिति आघवी । 
निरूपिली बरवी । मनूप्रती ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी १७

अर्थ : मग त्या विवस्वान सूर्याने या योगाची संपूर्ण माहिती वैवस्वत मनूला उत्तम प्रकारे सांगितली.

मनूनें आपण अनुष्ठिली । मग इक्ष्वाकुवा उपदेशिली ।
ऐसी परंपरा विस्तारिली । आद्य हे गा ।। – ज्ञानेश्वरी, अध्याय ४, ओवी १८

अर्थ : वैवस्वत मनूने याचे स्वत: आचरण केले आणि मग आपला मुलगा इक्ष्वाकु त्याला त्याचा उपदेश केला. अशी ही परंपरा मुळापासून चालत आलेली आहे.

आपल्याकडे आलेली निष्काम कर्मयोगाची ज्ञानपरंपरा ही कशी आली, ते सांगतांना माऊली मनूचे श्रेष्ठत्व सांगत असतील, तर आम्ही पू. भिडेगुरुजींचा निषेध का करावा ?

संत पुरोगामी होते, तुम्ही पुरोगामी कि प्रतिगामी ? स्पष्टीकरण द्यावे.


मुळात संतावर शिक्का मारणारे तुम्ही कोण ? ‘धर्म रक्षावया साठीं । करणें आटी आम्हांसि ।।’ किंवा ‘आम्ही वैकुंठवासी । आलों याचि कारणासी । बोलिले जे ऋषी । साच भावें वर्ताया ।।’ (तुकाराम गाथा) ही संतांची स्पष्ट भूमिका आहे. आपण पुरोगामी शब्दाची शब्दकोषातील व्याख्या ही ‘पुढारलेल्या विचारांचा’, अशी आहे. हाच अर्थ सनातन, म्हणजे नित्य, नूतन. संगणकीय प्रणाली जशी अद्ययावत् होते, तसा कालसुसंगत वैदिक हिंदु धर्मच पुरोगामी आहे; मात्र दुर्दैवाने त्या पुरोगामी शब्दाची व्याख्या विकास लवांडेंसारख्या संगतीने पालटून ‘कुसंगे नाडला साधु तैसा ।’ या न्यायाने पुरोगामी, म्हणजे देव न मानणारा, धर्म न मानणारा नास्तिक विचारांचा अशी झाल्याने तो शब्द विनाकारण अपकीर्त झाला आहे. ‘एथ वडील जें जें करिती ।’ या संतांच्या व्याख्येला प्रतिगामी वगैरे असे म्हणत असाल, तर तो तुमचा दोष आहे. सर्वांत महत्त्वाचे, म्हणजे स्वतःच्या घरात इंद्रजाल ही तांत्रिक सिद्ध वनस्पती लावणार्‍यांचे कार्यकर्ते त्यांना ‘पुरोगामित्वाचा मसिहा’ म्हणतात, हा जागतिक विनोद आहे !


– ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

२. ‘संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांचे ग्रंथ परिपूर्ण नाहीत’, असे सार्वजनिक वक्तव्य करणारे प.पू. स्वामी गोविंददेव गिरिचा निषेध केला होता का ? 

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांना प्रत्यक्ष पत्र लिहून त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयी संत ज्ञानोबा, जगद्गुरु तुकोबाराय आदी संतांची क्षमायाचना करण्याची मागणी सर्वप्रथम आम्हीच केली होती. तुमच्यासारखे स्वामीजींची आणि समर्थांची जात पाहून विरोधासाठी आम्ही उद्युक्त् झालो नाही. स्वामीजींनी सदरचे वक्तव्य मागे घेत संतांची क्षमायाचना केली. यात कुठेही वारकरी संप्रदायाच्या जय-पराजयाचा विषय नसून संप्रदायाच्या श्रद्धास्थानात तडजोड केली गेली नाही.

३. सर्वच संतांना त्रास देणारे, त्यांचा छळ आणि अपमान करणारे कोण लोक होते ? त्यांचा धर्म कोणता ? त्यांनी संतांना त्रास का दिला होता ? संतांचे काय चुकले होते ?

संतांना छळणारे जसे हिंदु धर्मातीलच श्रेष्ठ शास्त्रसंपन्न लोक होते; पण तरीसुद्धा धर्माचा अथवा शास्त्राचा निषेध संतांनी केला नाही. ‘शास्त्र म्हणेल जें सांडावें । तें राज्यही तृण मानावें । जें घेववी तें न म्हणावें । विषही विरू ।। (ज्ञानेश्वरी, अध्याय १६, ओवी ४६०)’ अर्थ : ‘शास्त्रांनी जे टाकावे म्हणून म्हटले असेल, ते आवडते राज्य असले, तरी तृणाप्रमाणे तुच्छ समजून त्याचा त्याग करावा आणि ज्याचा स्वीकार करावा, असे म्हटले असेल, ते विष असले तरी ते अहितकारक होईल, असे मनातही आणू नये.’ शास्त्राप्रमाणेच त्यांनी आचरण केले. आपल्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित देणार्‍यांविषयी स्वतः संत ज्ञानोबाराय कोणतीही टिकाटिपणी न करता उलट भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९४), म्हणजे ‘प्राणीमात्रांची एकमेकांशी जीवाभावापासून मैत्री व्हावी’, म्हणत असतील, तर लवांडेसारख्यांना आणि पुरोगाम्यांना संतांनी काय त्यांचे वकीलपत्र दिले आहे का ? तत्कालीन परिस्थिती होती, त्यातून त्यांचे संतत्व उजळून निघाले. उलट आता वारकरी संप्रदायाला त्रास देण्याचा प्रयत्न करणारे त्या तत्कालीन त्रास देणार्‍यांचेच वंशज आहेत, असे म्हणायला हरकत नाही.

४. जाती आणि वर्ण व्यवस्था मानता किंवा नाही स्पष्टीकरण देणार का ? 

जातीव्यवस्था राजकारणातसुद्धा मतांच्या गठ्ठ्यांसाठी वापरली जाते. त्यामुळे आपण यावर बोलूच नये. उलट वारकरी संप्रदायामुळे लोक जातीभेद विसरून एकत्र येतात, त्यांना धर्म ही संकल्पना जवळची वाटते आणि हीच त्यांची सर्वांत मोठी पोटदुखी आहे. समाजातील जातीभेद संपला, तर आपण मत विभागणी कशी करणार ? लोकांमध्ये भांडणे कशावरून लावणार ? यामुळे वारकरी संप्रदायाला लक्ष्य केले जात आहे. वारकरी संप्रदायातील प्रत्येक फड मठावर सर्व जातीय लोक एकमुखाने पंढरीरायाचे भजन मोठ्या प्रेमाने करतात.

सनातन धर्म प्रचलित असतांना संतांनी स्वतंत्र वारकरी संप्रदाय का चालू केला ? वारकरी संप्रदायाचा हिंदु किंवा सनातन धर्माशी काहीही संबंध नाही, हे मान्य आहे का ?


वारकरी संप्रदाय हिंदु धर्माधिष्ठितच आहे. वारकरी संप्रदाय हा हिंदु धर्मात जे अनेकविध उपासना पंथ आहेत, त्यातील वैष्णवांचा पंथ आहे. या पंथाचे प्रस्थानत्रयी मानले जाणारे ग्रंथ

अ. ‘ज्ञानेश्वरी’ (भगवद्गीता विवेचन)
आ. ‘तुकाराम गाथा’ (चहुवेदांचे केलेसे विवरण)
इ. ‘एकनाथी भागवत’ (श्रीमद्भागवत एकादश स्कंध)


हे तीनही ग्रंथ हिंदु धर्मातील श्रेष्ठ ग्रंथाधारानेच आहेत. अगदी जगद्गुरु संत तुकोबारायांनी ‘पाहिली पुराणे । धांडोळली दर्शने ।।’, असेच म्हटले आहे, कुठेही इतर धर्माच्या ग्रंथांचे नावही घेतले नाही. श्रीरामनवमी, जन्माष्टमी, महाशिवरात्र, नृसिंह जयंती, वामन जयंती हे पंचपर्वकाळ, एकादशी आणि सोमवार ही अखंड व्रते कोणत्या धर्मानुसार आहेत, हे वेगळे सांगायला नको. त्यामुळे वारकरी संप्रदाय हा हिंदु धर्माधिष्ठितच आहे, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.


– ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

५. तुमची धर्माची नेमकी व्याख्या काय आहे ? धर्म म्हणजे काय ? 

‘धृ धारयति इति धर्मः ।’, म्हणजे ‘ज्या धारणेमुळे चांगले संस्कार निर्माण होतात, त्याला धर्म म्हणतात.’ ‘एकटा माणूस असेल, तर त्यासाठी धर्म नसून माणसांचा समूह ज्याला धारण करून आपल्या स्वार्थाचा परिघ दुसर्‍याच्या आड येणार नाही, असे आचरण ज्यानुसार करतो, त्याला धर्म म्हणतात’, अशी सोपी व्याख्या आहे. धर्मशास्त्रानुसार ‘यतोऽभ्युदयनिःश्रेयससिद्धिः स धर्मः ।’ (वैशेषिक दर्शन) म्हणजे ‘ज्या योगाने आपला अभ्युदय होऊन आपल्याला निश्चितपणे मोक्षप्राप्ती होते, तो धर्म होय.’

संतांनी पुष्कळ खोलात जाण्याऐवजी ‘एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । 
तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ।।’ – ज्ञानेश्वरी, अध्याय ३, ओवी १५८

अर्थ : या जगात थोर लोक जे कर्म आचरतात, त्यालाच सामान्य लोक ‘धर्म’ असे म्हणतात आणि सामान्य प्रतीचे अन्य सर्व लोक त्याचेच आचरण करतात.

तसेच आमचे वाडवडील जे नियमधर्म पाळत आचरण करत आहेत, त्याला धर्म म्हणतात. ‘धर्मेण विधृताः प्रजाः ।’ (महाभारत, शान्तिपर्व, अध्याय ११०, श्लोक ११), म्हणजे ‘धर्म प्रजेला धारण करतो (रक्षण करतो).’ मानवाला जगण्यासाठी धर्म महत्त्वाचा आहे; म्हणून डॉ. आंबेडकर यांनी उच्च शिक्षित असतांनाही निधर्मी रहाण्याऐवजी भारताच्या मातीतीलच वैचारिक उपासना पंथ असणारा बौद्ध धर्म स्वीकारला; पण ते निधर्मी राहिले नाहीत, हे महत्त्वपूर्ण !

संतांनी विठ्ठलाचे वर्णन ‘धर्माची तूं मूर्ती ।’, असे केले आहे, म्हणजेच धर्म हा अमूर्त आहे. त्याचे मूर्तस्वरूप अर्थात् धर्माची प्रत्यक्ष मूर्ती, म्हणजेच श्री विठ्ठल उभा आहे. ही संतांची प्रचीती आहे. जे संतांचे मनोगत तेच आमचे.

मनुस्मृतीचा उघडपणे निषेध करणार का ? किंवा केलेला आहे का ?

निषेध नंतर, आधी तुमच्या ज्ञानात भर…

अ. मनु हे क्षत्रिय आहेत, ब्राह्मण नव्हे !

आ. एकूण १४ मनु आहेत. त्यातील ७ वे वैवस्वत मनु हे या ‘मनुस्मृती’चे प्रणेते.

इ. मनुस्मृतीमध्ये एखाद्या कर्माविषयी शुद्रापेक्षा कैकपटीने अधिक शिक्षा ब्राह्मणाला आहे; कारण धर्मशास्त्राचे ज्ञान असूनही चुकीचे वागणार्‍यांना अधिक शिक्षा हा मनूचा न्याय आहे. त्यामुळे खरेतर मनुस्मृतीचा निषेध ब्राह्मणांनीच अधिक करायला हवा होता ना ?

ई. ‘मनुस्मृति’ हा याज्ञवल्क्य स्मृति, पाराशर स्मृति, हरित, देवल अशा अनेक स्मृतींपैकी एक आहे. स्मृति ग्रंथ, म्हणजे श्रुतींवरील टीका ग्रंथ आहेत. ते त्या त्या काळानुसार राजाने कसे न्यायदान करावे वगैरे अशा भूमिकेतून लिहिलेले आहेत.

उ. छत्रपती संभाजी महाराज यांनी लिहिलेल्या ‘बुधभूषण’मध्ये मनुस्मृतीच्या ७ व्या अध्यायातील ‘राजधर्म (राजाची वर्तणूक)’ या विषयातील श्लोक घेतलेले आहेत.

वरील गोष्टी विषयांतर म्हणून नव्हे, तर ‘मनुस्मृति’ या नावापलीकडे तुम्हाला काही माहिती नाही, याची कल्पना आम्हाला आहे. ती माहिती व्हावी म्हणून हा प्रपंच ! बाकी वारकरी संप्रदाय ज्या ग्रंथानुसार चालतो, ते ग्रंथ गाथा, ज्ञानेश्वरी, भागवत ही प्रस्थानत्रयी आणि इतर सकल संतवाङ्मय आहे. या ग्रंथांच्या आधारावर आमचे नियम सिद्ध होत नाहीत. त्यामुळे मनुस्मृतीचा निषेध करण्याचा आमचा काही संबंध नाही, ज्यांना करायचा असेल, त्यांनी खुशाल करावा. – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

भारतीय राज्यघटना मानता कि नाही ?

वारकरी संप्रदाय भारतीय राज्यघटनेने दिलेल्या धार्मिक स्वातंत्र्याच्या मर्यादेतच संप्रदाय चालवतो. वारकरी संप्रदायाची एकही कृती असंवैधानिक नाही.

– ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

६. कोणतेही कर्मकांड, व्रतवैकल्ये, होमहवन, यज्ञ, पुरोहितशाही वगैरे मानता किंवा समर्थन करता का ?

आपल्या धर्मशिक्षणाचा अभाव असे प्रश्न निर्माण करतो. मानवाला धर्माने संस्काराच्या बंधनात ठेवल्याने तो मानव म्हणून संस्कारित आचरण करतो. अन्यथा मानव आणि पशू यांत भेद काय ? विवाह, नामकरणपासून अगदी अंत्येष्टीपर्यंत सर्व १६ संस्कारांमुळे माणसाचे माणूसपण टिकून आहे. संस्कार करण्याचे ज्ञान असणारा यासाठी स्वतःच्या आयुष्यातील १२ ते १५ वर्षे पाठशाळेमध्ये शिक्षण घेणारा पुरोहित आणि एखाद्या शाखेची पदवी प्राप्त करणारा पदवीधर दोन्ही आपापल्या कामाची पात्रता सिद्ध केलेले असतात. त्यात वाईट वाटण्याचे कारण काय ? केवळ संतांनी ‘प्रापंचिक सिद्धीसाठीच्या कर्मकांडात वेळ आणि शक्ती दोन्ही व्यय करण्याऐवजी भगवद्प्राप्तीच्या परमार्थ साधनेचा मार्ग पत्करावा’, असे सांगितले आहे. म्हणूनच मग संतांनी ‘योग याग विधी येणें नव्हे सिद्धि ।’ (संत ज्ञानेश्वर महाराज) ही भूमिका सर्वसामान्य लोकांना नामाचा महिमा पटवून देण्यासाठी व्यक्त केलेली आहे. योग करणे, यज्ञसामग्री जमा करणे या गोष्टी बहुतांश वेळा सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असतात, याकरता त्याने सर्वांत सोपे असे भगवंताचे नाम ‘ठायींच बैसोनि करा एकचित्त । आवडी अनंत आळवावा ।।’ (संत तुकाराम महाराज), असे सांगितले आहे. योग ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे. आज देश-विदेशात यावर अफाट संशोधन झाले आहे. मोठमोठ्या उद्योगपतींनी ठरवले, तर यज्ञयाग त्यांच्यासाठी अवघड नाहीत; पण संतांचा अवतार हा ‘उद्धरावया आले दीनजनां ।’ (संत नामदेव महाराज) असल्याने त्यांनी सर्वसामान्य लोकांसाठी सोपे वर्म सांगितले आहे. याचा अर्थ धर्मशास्त्र नाकारलेले नाही.

(क्रमश: उद्याच्या दैनिकात)

– श्रीगुरुचरणपदाश्रीत ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, संत साहित्य अभ्यासक, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (२०.४.२०२६)


या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/1034262.html