देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ।।

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायावर टीका करण्याच्या अनुषंगाने विचारलेल्या प्रश्नांना सडेतोड उत्तरे !

(टीप : ‘देतों तीक्ष्ण उत्तरें । पुढें व्हावयासी बरें ।।’ म्हणजे ‘तुमचे चांगले व्हावे यासाठी मी तुमच्याशी कठीण शब्दात बोलत आहे.’)

या लेखात दिलेली प्रश्नांची उत्तरे केवळ कुणा एका पक्षनेत्याच्या प्रेमात आंधळ्या झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या विकास लवांडेंसारख्या पक्षाच्या प्रवक्त्याच्या नावाने फिरणार्‍या केलेल्या प्रश्नावलींची नसून वारकर्‍याचे ‘वारकरीपण जागे व्हावे’, यासाठी अन् महाराष्ट्रासह जगभरात पसरलेल्या आमच्या युवा पिढीतील वारकरी, हिंदु धर्मप्रेमी युवकांसाठी धर्मशास्त्र आणि संतवाङ्मय यांवर आधारित उत्तरे आहेत. आतापर्यंत वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे वाचली. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

(भाग ३)

भाग २ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/1034262.html

१५. वारकरी संप्रदाय सर्व जाती-धर्मांना सामावून घेणारा आहे आणि जात, धर्म, लिंग, पंथ, गरीब-श्रीमंत, स्त्री-पुरुष असा कोणताही भेदभाव वारकरी संप्रदायात नसतो अन् नाही. ती परंपरा तुम्हाला मान्य आहे का ?

वारकरी संप्रदायात आज घडीला कुठेही कोणताही फड, मठ आणि मंदिर या ठिकाणी जातीय रचना दिसत नाही.

‘माझीये जातीचे (वारकरी/वैष्णव) । 
मज भेटो कोणी ॥’ 

या न्यायाने एकमुखाने विठ्ठलभक्तीची परंपरा अव्याहतपणे अखंड चालू आहे. राजकीय पक्षांनी निर्माण केलेल्या जातीय द्वेषामुळे बीडसारख्या भागात काही काळ वारकरी संप्रदायातील सप्ताहामध्येही तणाव निर्माण झाला होता; मात्र तो हेतू समाजाच्या लक्षात आल्याने आज असा प्रकार कुठेही दिसत नाही. जातीयवाद हा राजकीय पक्षांची देण आहे. ‘वारकरी संप्रदायामुळे जातीयवाद नष्ट होतो’, हे जातीयवादी राजकीय पक्षांना नको आहे.

ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर

१६. सनातन धर्माचे आणि वारकरी संप्रदायाचे अधिष्ठान ग्रंथ, आराध्य दैवत, आराधना पद्धत आणि तीर्थक्षेत्र वेगवेगळे आहेत, हे मान्य आहे का ? वारकरी संप्रदायाला कुणी शंकराचार्य नाहीत, चालक नाहीत हे मान्य आहे का ?  

मुळात धर्म आणि संप्रदाय दोन्हीविषयीच्या अज्ञानातून प्रश्न द्विरुक्ती होत आहे. पूर्वकाळामध्ये शैव आणि वैष्णव या हिंदु धर्मातील उपासना पंथामध्ये प्रचंड वादविवाद होते. भगवद्पूज्यपाद आद्यशंकराचार्य यांनी सर्वप्रथम हे सर्व वाद मिटवत हरिहराचे ऐक्य मांडले आणि ‘भाष्यकाराते वाट पुसतू ।’, असे म्हणत वारकरी संप्रदायानेही शंकराचार्यांच्या पथदर्शी वाटेवरूनच मार्गक्रमण केले आहे. शंकराचार्यांनीच ‘महायोगपिठे तटे भिमरथ्यां ।’ हे ‘श्री पांडुरंगाष्टक’ पंढरपूरला आल्यानंतर रचलेले आहे. त्यामुळे प्रस्थानत्रयीचे भाष्यकार जगद्गुरु आद्यशंकराचार्यांना आम्ही वारकरीच म्हणतो.

वेद मार्गे मुनी गेले
त्याच मार्गे चालिलों । न कळेचि विषयअंध म्हणोनी उघड बोलिलों ।। 

– संत ज्ञानेश्वर महाराज

संत ज्ञानेश्वर महाराज यांनी स्पष्ट सांगितले आहे, ‘ज्या वेदविहित मार्गाने ऋषिमुनी गेले, त्याच मार्गाने आम्ही चाललो आहोत. खरेतर हे सांगायची आवश्यकता नाही; पण जे धनाने, कामाने, सत्तालोलुपतेच्या विषयाने अक्षरशः आंधळे झाले आहेत, त्यांना हे कळणार नाही. त्यांना स्पष्टपणे सांगत आहे !’ त्यामुळे हा विषय अंधांना संत-महात्मे घुसखोर दिसू लागले आहेत. हा यांच्या अधःपतनाचाच मोठा पुरावा आहे. याचे अत्यंत प्रतिकूल परिणाम त्यांना भोगावे लागतील एवढे निश्चित !

माझिये युक्तीचा नव्हे हा प्रकार । 
मज विश्वंभर बोलवितो ।। – संत तुकाराम महाराज   

(समाप्त)

रामकृष्ण हरि !

– श्रीगुरुचरणपदाश्रीत ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, संत साहित्य अभ्यासक, श्री क्षेत्र पंढरपूर, जिल्हा सोलापूर. (२०.४.२०२६)