Israel Iran War : युद्ध थांबवणे हे आक्रमणकर्त्यांच्या हातात ! – इराण

  • आम्ही आक्रमण थांबवणार नाही ! – इस्रायलचे उत्तर

  • ओमान येथील व्यापारी नौकेवरील इराणच्या आक्रमणात ३ भारतियांचा मृत्यू

तेहरानमध्ये आक्रमणानंतर उध्वस्त झालेली इमारत ( छायाचित्र सौजन्य : Majid Asgaripour/WANA/REUTERS)

तेहरान (इराण) – अमेरिका आणि इस्रायल यांच्याकडून इराणवर अन् इराणकडून  सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतर, ओमान, जॉर्डन आणि बहरीन या देशांतील अमेरिकेच्या सैन्य तळांवर, तसेच नागरी वस्त्यांवर आक्रमण करण्यात येत आहे. इराणसाठी लढणार्‍या आतंकवादी संघटनाही अमेरिकेच्या दूतावासावर आणि कार्यालयांवर आक्रमणे करत आहेत. इस्रायलकडून लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या तळांवरील आक्रमणेही चौथ्या दिवशी चालू आहेत. हे युद्ध आणखी अनेक दिवस चालणार, हेच यातून लक्षात येत असतांना इराणकडून ‘युद्ध थांबवणे हे आक्रमणकर्त्यांच्या हातात आहे’, असे विधान करण्यात आले आहे, तर ‘आम्ही आक्रमण थांबवण्याचा प्रयत्न करत नाही आहोत’, असे इस्रायलने स्पष्ट केले आहे.

याच वेळी इराणकडून ओमानच्या सागरी हद्दीत झालेल्या आक्रमणांमुळे २ व्यापारी नौकांना आग लागण्याच्या घटनांमध्ये किमान ३ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला, तर २० पेक्षा अधिक जण घायाळ झाल्याची माहिती आहे. ओमानमधील भारतीय दूतावासाने घटनेला दुजोरा दिला असून स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने साहाय्यता कार्य चालू आहे.

‘एमकेडी व्योम’ तेल टँकर

भारतीय दूतावासाने दिलेल्या माहितीनुसार ‘मार्शल आयलंड्स’चा ध्वज असलेल्या ‘एमकेडी व्योम’ या तेल टँकरवर आक्रमण झाले आणि त्याला आग लागली. ही नौका मस्कतपासून सुमारे ५२ नॉटिकल मैल अंतरावर होती. यावर असलेल्या ३ भारतीय कर्मचार्‍यांचा मृत्यू झाला. यावरील २१ कर्मचार्‍यांची सुरक्षित सुटका करण्यात आली. यामध्ये १६ भारतीय, ४ बांगलादेशी आणि १ युक्रेनी नागरिक यांचा समावेश आहे.

ठळक घडामोडी

  • इराणच्या आक्रमणानंतर सौदी अरेबियातील अमेरिकी दूतावास बंद
  • इराणी सैन्याचे कमांड आणि नियंत्रण व्यवस्था नष्ट केल्याचा अमेरिकेच्या सैन्याचा दावा
  • इराणचे किमान ७८७ नागरिक ठार, तर ९०० पेक्षा अधिक नागरिक घायाळ
  • अमेरिकेच्या ४ सैनिकांचा मृत्यू

भारतियांना परत आणण्याची प्रक्रिया प्रारंभ

२ मार्चला रात्री उशिरा संयुक्त अरब अमिरातच्या अबूधाबी येथून भारतियांना घेऊन ४ विमाने देहली, मुंबई, बेंगळुरू आणि चेन्नई येथे पोचली. सौदी अरेबियातील जेद्दा येथून देहली, कर्णावती, मुंबई आणि भाग्यनगर या शहरांसाठी १० विशेष विमाने उडणार आहेत. ती तेथून भारतियांना घेऊन येणार आहेत. यासह संयुक्त अरब अमिरातच्याच दुबईतूनही भारतियांना विमानाद्वारे आणण्यात येणार आहे.

भारत रशियाकडून ५ ‘एस् ४०० ‘सुदर्शन’ संरक्षण प्रणाली खरेदी करणार

‘एस् ४०० ‘सुदर्शन’ संरक्षण प्रणाली

‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी ‘एस् ४००’ हवाई संरक्षण प्रणालीने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि पाकिस्तानच्या ५-६ लढाऊ विमानांना आणि एका हेरगिरी करणार्‍या विमानाला ३०० किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावर पाडले होते. आता भारत रशियाकडून आणखी ५ ‘एस् ४००’ ‘सुदर्शन’ हवाई संरक्षण प्रणाली खरेदी करणार आहे. यासाठी संरक्षण मंत्रालय लवकरच या प्रस्तावाला संमतीसाठी पुढे पाठवेल. ही प्रणाली चीन आणि पाकिस्तान दोन्ही आघाड्यांवर तैनात केली जाईल.

इराणकडे ११ अणूबाँब सिद्ध करण्याइतके युरेनियम !

अमेरिकेचे विशेष दूत स्टीव विटकॉफ यांनी सांगितले की, इराणच्या प्रमुख चर्चाकाराने पहिल्या फेरीतील चर्चेत उघडपणे दावा केला होता की, त्यांच्या जवळ ४६० किलोग्रॅम ६० टक्के समृद्ध युरेनियम (अणूबाँब बनवण्यासाठी लागणारे प्रमुख रसायनिक मूलद्रव्य) आहे. त्यांना याची जाणीव आहे की, या साठ्यापासून ११ अणूबाँब सिद्ध होऊ शकतात.

दुबईतील ऑस्ट्रेलियाच्या वायूदलाच्या तळावर आक्रमण

इराणने दुबई येथील ऑस्ट्रेलियाच्या वायूदलाच्या तळाला लक्ष्य केले. ऑस्ट्रेलियाचे संरक्षणमंत्री रिचर्ड मार्लेस यांनी ही माहिती दिली. संघर्षाच्या पहिल्याच रात्री अल मिन्हाद वायूदलाच्या तळावर आक्रमण करण्यात आले. तेथे तैनात ऑस्ट्रेलियाचे सर्व  सैनिक सुरक्षित आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियाचे सुमारे १०० सैनिक मध्य-पूर्वेत तैनात असून त्यांपैकी बहुसंख्य संयुक्त अरब अमिरातीमध्ये आहेत.

बहरीनमध्ये शिया समर्थकांचा हिंसाचार, अमेरिकी तळावर आक्रमण

इराणी सैन्याने बहरीनमधील शेख इसा परिसरातील अमेरिकेच्या वायूदलाच्या तळावर मोठे आक्रमण केले. २० ड्रोन आणि ३ क्षेपणास्त्रे यांचा यामध्ये वापर करण्यात आला. अमेरिकेच्या प्रमुख कमांड आणि मुख्यालयाची इमारत यांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यात आला. एका इंधन टँकरला आग लागली. बहरीनकडून याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. बहरीनच्या रस्त्यांवर तीव्र हिंसाचार चालू असून शिया समर्थकांकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड होत आहे. सौदी अरेबियाने साहाय्यासाठी सुरक्षादल पाठवल्याचा दावा केला जात आहे.

लाहोरमध्ये अमेरिकेच्या दूतावासावर मुसलमानांचे आक्रमण

घटनास्थळ

दोन दिवसांपूर्वी कराची येथील अमेरिकेच्या दूतावासावर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून जाळपोळ केली होती. त्या वेळी तेथे तैनात अमेरिकेच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात २३ जण ठार झाले होते. आता पाकिस्तानातील लाहोर येथे स्थानिक मुसलमानांनी अमेरिकेच्या दूतावासावर मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली आणि दूतावास परिसरात आग लावली.

अमेरिका युद्ध कायम लढू शकतो ! – ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी म्हटले की, इराणविरुद्धचे युद्ध दीर्घकाळ चालू शकते. अमेरिकी सैन्याकडे आवश्यक शस्त्रसाठा उपलब्ध असून विजयासाठी आम्ही सज्ज आहोत.

चीनचा इराणला उघड पाठिंबा

चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अघारची यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली. चीनने म्हटले की, चीन इराणचे सार्वभौमत्व, सुरक्षा, भौगोलिक अखंडता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठेचे संरक्षण यांच्या प्रयत्नांना पूर्ण पाठिंबा देतो.

आमचे शेजारील इस्लामी देशांशी शत्रूत्व नाही ! – इराणी सैन्य

आमचे शेजारील इस्लामी देशांशी शत्रूत्व नाही. आमचे लक्ष्य अमेरिका आणि इस्रायल आहेत. या दोन देशांपर्यंतच आमचे शत्रूत्व आहे. आम्ही त्यांच्या सैन्य तळांना लक्ष्य करत आहोत, असे स्पष्टीकरण इराणचे सैन्य ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने दिले आहे. इराणी सैन्याकडून सातत्याने शेजारील सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, कतर, ओमान, जॉर्डन आणि बहरीन या इस्लामी देशांतील अमेरिकेच्या सैन्य तळांवर आक्रमण करण्यासह नागरी वस्त्यांवरही आक्रमणे केली जात आहेत. त्यावर सैन्याने हे स्पष्टीकरण दिले आहे.