संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध ! 

‘क्रिकेट’ हा कोट्यवधी भारतियांसाठी महत्त्वपूर्ण खेळ ! त्यातही भारत-पाकिस्तान क्रिकेटचा सामना असेल, तर तेथे राष्ट्रभावनेचा प्रश्न निर्माण होतो. हे जरी असले, तरी पाकिस्तानी खेळाडूंच्या दृष्टीने भारतासमवेत क्रिकेट खेळणे, म्हणजे एक प्रकारचे जिहादी युद्धच होय आणि तशी स्वीकृती यापूर्वी पाकच्या खेळाडूंनी दिली आहे. असे असूनही कथित पुरोगामी आणि शांतीप्रेमी (?) ‘पाकसह भारतात क्रिकेटचे सामने खेळण्यास काय हरकत आहे ?’ अशी दर्पाेक्ती करण्यात धन्यता मानतात. आता याच क्रिकेटची दुसरी बाजू भारताच्या केंद्रीय गृह मंत्रालयातील माजी अवर सचिव आर्.व्ही.एस्. मणी यांनी नुकतीच उघड केली आहे. ‘वर्ष २००६ मध्ये भारताच्या दौर्‍यावर आलेल्या पाकिस्तान क्रिकेट संघातील काही खेळाडू त्यांच्या समवेत अमली पदार्थ घेऊन आले होते. त्यांचा तस्करी प्रकरणात सहभाग होता, तसेच तस्करीतून मिळणारा पैसा आतंकवादी कारवायांसाठी वापरला जात होता’, असा आरोप त्यांनी केला. हा विषय केवळ क्रीडा क्षेत्रापुरता मर्यादित न रहाता तो थेट भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेला स्पर्श करणारा ठरतो. मणी यांनी यामध्ये काही खेळाडूंचीही नावे घेतली. तेव्हाची भारतीय जनता त्या खेळाडूंचे गोडवे गात असे. त्यामुळे पाकचा हा डाव आणि क्रिकेटविश्वाची काळी बाजू भारतियांनी कधीच पाहिली नाही किंवा तशी कल्पनाही त्यांनी केली नाही. हे सर्व आरोप तितकेच धक्कादायक आहेत. त्यामुळे आरोपांची निष्पक्ष आणि सखोल चौकशी व्हायला हवी. माजी वरिष्ठ अधिकार्‍यांनी या संदर्भातील संबंधित कागदपत्रे, नोंदी किंवा पुरावे हेही लवकरात लवकर उघड केल्यास त्यातून अनेक गोष्टी किंवा षड्यंत्रे उघड होऊ शकतात.

पाक आणि काँग्रेस यांचे षड्यंत्र ! 

भारतात अमली पदार्थ तस्करीने आज उच्चांक गाठलेला आहे. प्रतिदिन तस्करी करणार्‍यांवर कारवाई केली जाते. अमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होते, कुटुंबे तुटतात आणि समाजाची उत्पादक शक्ती न्यून होते. यातच राष्ट्रद्रोह्यांचे फावते. भारताची ऊर्जा शक्ती न्यून करणे, नव्हे नष्ट करणे हेच त्यांचे षड्यंत्र आहे आणि २ दशकांपूर्वी यात सहभागी होणारे हात क्रिकेटपटूंचे होते, हे क्रिकेटप्रेमींनी लक्षात घ्यायला हवे. क्रिकेटच्या उद्देशाने भारतात येणे आणि तस्करीत सहभागी होणे, म्हणजे पाक खेळाडूंनी भारताच्या पाठीत खंजीर खुपसल्यासारखेच आहे. अर्थात् पाकने असे करणे, हे काही नवीन नाही. भारतीय लोक क्रिकेटकडे केवळ ‘खेळ’ म्हणून पहातात; पण पाकड्यांच्या दृष्टीने ‘ते युद्ध म्हणजेच जिहाद असतो.’ पाकचे क्रिकेटपटू खेळण्यासाठी नव्हे, तर युद्ध करण्यासाठी भारतात येतात. भारतियांकडे ही दृष्टी नसल्याने त्यांना जिहादरूपी किंवा अमली पदार्थरूपी जिहादी खंजीर दिसला नाही, हे दुर्दैव आहे. भारतीय सैन्याचे कॅप्टन गोपालस्वामी पार्थसारथी (जी. पार्थसारथी) (निवृत्त) यांनीही ‘पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान भारताच्या विरोधात क्रिकेट सामना खेळतांना जिहाद म्हणून त्याकडे पहात खेळायचे’, असे लेखात म्हटले होते.

खरेतर क्रिकेटपटूंविषयी समाजात आदराचे स्थान असते. त्यांच्याविषयी लोकांच्या मनात विश्वास असतो; पण याच विश्वासाचा गैरवापर करून क्रिकेटपटूंसारख्या वलयांकित व्यक्तींना पुढे करून शत्रूराष्ट्र गैरकृत्य करत असेल, तर तो राष्ट्रीय सुरक्षेवरील अत्यंत गंभीर आघात ठरतो. त्यामुळे अशा परिस्थितीत परराष्ट्रांतून भारतात येणार्‍यांच्या संदर्भात सुरक्षायंत्रणांनी जागरूक रहायला हवे. वर्ष २००६ मध्ये या तस्करीविषयी सुरक्षायंत्रणांना काहीच कसे ठाऊक नव्हते ? गुप्तचर यंत्रणांकडून माहिती उपलब्ध होऊनही प्रशासकीय किंवा राजकीय पातळीवर त्याविषयी कार्यवाही का झाली नाही ? या प्रश्नांची उत्तरे शोधायला हवीत. गुप्तचर यंत्रणांचे कार्य माहिती गोळा करून शासनाला सावध करणे असते आणि त्या माहितीवर निर्णय घेण्याचे दायित्व सरकारचे असते. जर अशा पातळीवर निष्क्रीयता किंवा दुर्लक्ष झाले असेल, तर संबंधितांवरही कारवाई होणे क्रमप्राप्त ठरते. राष्ट्रीय सुरक्षेला बाधा आणणार्‍या प्रत्येक घटकाविरुद्ध समान कठोर भूमिका घेतली गेली पाहिजे. त्या कालावधीत काँग्रेस सरकार सत्तेवर होते. मग काँग्रेसने या तस्करीविषयी आणि गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीविषयी ‘अळीमिळी गुपचिळी’ असे धोरण का स्वीकारले ? या प्रकरणी कारवाई का केली नाही ? मणी यांनी केलेल्या आरोपांमध्ये तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील आणि पी. चिदंबरम् यांच्या नावांचाही समावेश आहे. भारत सरकारने वर्ष २००६ च्या प्रकरणात शिरून पुन्हा एकदा सत्यान्वेषी अन्वेषण करून पाक खेळाडू आणि काँग्रेस यांचे वास्तव समोर आणावे.

सतर्कतेची आवश्यकता ! 

क्रिकेटपटूंनी अमली पदार्थांची तस्करी केल्याची घटना जरी जुनी असली, तरी त्याकडे कानाडोळा करून चालणार नाही; कारण आज जगभरात ‘हायब्रिड वॉरफेअर’ ही संकल्पना चर्चेत आहे. याचा अर्थ एखाद्या देशाला केवळ सैन्याच्या साहाय्याने नव्हे, तर लष्करी, आर्थिक, सायबर, माहिती, आतंकवाद, अमली पदार्थ, राजकीय हस्तक्षेप आणि मानसशास्त्रीय तंत्र आदींचा एकत्रित वापर करून दुर्बल करण्याची रणनीती ! थोडक्यात काय, तर गोळ्या झाडल्याविना किंवा औपचारिक युद्ध घोषित न करताही शत्रूला अस्थिर करणे, हा आधुनिक युद्धप्रकार आहे. याचा अवलंब पाकसारखी शत्रूराष्ट्रे भारताच्या संदर्भात करत होती, आहेत आणि करत रहातीलही ! त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेचा विचार केवळ सीमेवरील सैनिकांपुरता मर्यादित न ठेवता प्रत्येक नागरिक आणि प्रत्येक सरकारी-प्रशासकीय यंत्रणा या अनुषंगाने करायला हवा. वर्ष २००६ मध्ये गाफील राहिल्याची चूक भारताने पुन्हा करू नये. भारत आता सामर्थ्यवान झाला आहे. विकसित देश म्हणून वाटचाल करत आहे. त्यामुळे ‘त्याने ‘हायब्रिड युद्धा’ची कदापि शिकार होऊ नये’, असे भारतियांना वाटते.

राष्ट्रीय सुरक्षेच्या संदर्भातील निष्काळजीपणा देशाला आता परवडणार नाही. गुप्तचर यंत्रणांकडून मिळालेल्या प्रत्येक महत्त्वाच्या सूचनेची गांभीर्याने नोंद घेतलीच गेली पाहिजे. अमली पदार्थांचा व्यापार, आतंकवादाला आर्थिक पाठबळ आणि परकीय हस्तक्षेप यांविषयी शून्य सहिष्णुतेचे धोरण भारताच्या सुरक्षित भविष्यासाठी आवश्यक आहे. ‘देशहित सर्वप्रथम’ ठेवून सतर्कता बाळगणे, ही काळाची आवश्यकता आहे. सध्या भारताने कठोर भूमिका घेतलेली असल्याने पाकसमवेत द्विपक्षीय क्रिकेट मालिका होत नाही; पण आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये दोन्ही देशांचे संघ समोरासमोर येतात. त्यामुळे अशा स्पर्धांमध्ये राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने दक्षता घेणे अत्यावश्यक ठरते. भारताने भूतकाळातील त्रुटींपासून धडा घेत परदेशी शिष्टमंडळ, खेळाडू आणि अधिकृत प्रतिनिधी यांच्या संदर्भात सुरक्षा अन् गुप्तचर समन्वय यांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. राष्ट्रहितात कोणतीही तडजोड करू नये. शासन, प्रशासन आणि समाज कृतीशील झाल्यासच भारताला प्रत्येक आव्हानाला समर्थपणे तोंड देता येईल.

तत्कालीन काँग्रेसच्या कार्यकाळात पाक क्रिकेटपटूंनी केलेल्या अमली पदार्थतस्करीचे अन्वेषण करून भारत सरकारने वास्तव देशासमोर आणावे !